मुंबई : अभिनेता सलमान खान आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई यांच्यात सध्या वाद सुरु आहे. १९९८ साली झालेल्या काळवीट हत्या प्रकरणाचा वाद आजही सुरुच आहे. या प्रकरणामुळेच सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून काही महिन्यांपूर्वी त्याच्या घराबाहेरही गोळीबार करण्यात आला होता. तर, काही दिवसांपूर्वी त्याचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची देखील गोळ्या झाडून हत्या करत लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात आता भजनसम्राट अनुप जलोटा यांनी सलमान खानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी अशी मागणी केली आहे.
भजनसम्राट अनुप जलोटा यांनी एबीपी न्यूजसोबत बोलताना सांगितलं की, “सलमानने काळवीट मारलं की नाही, हे बाजूला ठेवलं पाहिजे. सलमानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी. हा आता अहंकाराचा विषय राहिला नाही”.
तसेच, सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने एबीपीसोबत बोलताना अनेक खुलासे केले आहेत. सलमाननेच काळवीट मारल्याचं तिने सांगितलं असून सोमी म्हणाली की, “त्यावेळी ती आणि सलमान खान रिलेशनशिपमध्ये होते. पण बिश्नोई समाजात काळवीटाची पूजा केली जाते हे सलमान खानला माहित नव्हतं”.
काय म्हणाले सलीम खान?
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात सलमानचे वडिल सलीम खान म्हणाले होते की, “जर सलमानने कोणत्याही प्राण्याची हत्या केली नसेल तर माफी का मागायची. माफी मागणे म्हणजे सलमानने ती चूक मान्य केली आहे. तर सलमानने असं काहीही केलेलं नाही”.