बुलेट ट्रेन प्रकल्पात मेक इन इंडियाला चालना

23 Oct 2024 21:41:26

bullet train
मुंबई, दि.२३ : प्रतिनिधी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागात ६० मीटर लांबीच्या ‘मेक इन इंडिया’ स्टील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने २२ ऑक्टोबर २०२४ रोजी आणखी एक स्टील पूल यशस्वीरित्या लॉन्च केला. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पश्चिम रेल्वेच्या बाजवा - छायापुरी कॉर्ड लाइन, गुजरातमधील वडोदरा येथे ६० मीटर लांबीचा हा मेक इन इंडिया पूल उभारण्यात आला आहे.

दरम्यान एनएचएसआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, हा पूल १२.५ मीटर उंच आणि १४.७ मीटर रुंद असून ६४५ मेट्रिक टनाचा पोलादी पूल आहे. हा पूल गुजरातमधील भचाऊ येथील कार्यशाळेत तयार करण्यात आला आहे. इथे तयार करून हा पूल लॉन्च करण्यासाठी साईटवर आणण्यात आला. हा पुलाचे आयुष्य तब्बल १०० वर्षे असेल अशा पद्धतीने हा डिझाईन करण्यात आला आहे. सुरक्षितता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे सर्वोच्च मानक राखत हा प्रकल्प काटेकोरपणे राबविला जात आहे. जपानी कौशल्याचा वापर करून भारत 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वत:च्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा स्टील पूल हे या प्रयत्नाचे मोठे उदाहरण आहे. एमएएचएसआर कॉरिडॉरसाठी नियोजित २८ स्टील पुलांपैकी हा पाचवा स्टील पूल आहे.
Powered By Sangraha 9.0