महारेराचा गृहखरेदीदारांशी सलोखा वाढला

23 Oct 2024 21:19:00

Maharera



मुंबई,दि.२३ :
महारेराने घर खरेदीदारांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडविण्यासाठी गठीत केलेल्या सलोखा मंचांनी राज्यातील १७४९ घर खरेदीदारांच्या तक्रारी यशस्वीपणे निकाली काढल्या आहेत. महारेराकडे नोंदवलेल्या तक्रारीची ज्येष्ठता आणि हक्क अबाधित राहत असल्याने तक्रारदारांचा सलोखा मंचला वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच सध्या राज्यात ५२ सलोखा मंचांकडे ५५३ प्रकरणांची सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत एकूण ५९५८ प्रकरणांपैकी १७४९ प्रकरणे निकाली निघाली आहेत.

सुरूवातीला हे सलोखा मंच पुरेशा तज्ज्ञ मनुष्यबळ अभावी मुंबई, पुणे क्षेत्रातच कार्यरत होते. राज्यभरातील प्रकरणे या मंचांमार्फतच हाताळली जात होती.आता याची व्याप्ती वाढविण्यासाठी महारेरा प्रयत्नशील असून आता नाशिक, नागपूर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पालघर, रायगड, वसई , मिरा रोड येथेही सलोखा मंच कार्यरत झालेले आहेत. सलोखा मंचांची उपयुक्तता लक्षात घेता गुजरात, उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा अशा अनेक राज्यांतही सलोखा मंच कार्यरत आहेत. शिवाय इतरही अनेक राज्ये ही योजना समजून घेण्यासाठी महारेराच्या संपर्कात आहेत.

तक्रारदार आणि विकासक यांच्या सलोख्यातून उभयमान्य तोडगा शक्य असल्यास तो निघावा म्हणून तक्रारदाराला पहिल्या सुनावणीच्या वेळीच ते सलोखा मंचच्या पर्यायासाठी तयार आहेत का? याबाबत विचारणा केली जाते. तक्रारदार आणि विकासक दोघेही यासाठी तयार असतील, तरच हा पर्याय स्वीकारला जातो. काही कारणास्तव यातून मार्ग निघू शकला नाही तरी तक्रारदाराचे काही नुकसान होत नाही. कारण त्यांच्या तक्रारीचा ज्येष्ठता क्रम कायम असतो. सलोखा मंचामुळे तक्रार सोडवून घेण्याचा एक पर्याय उपलब्ध झाल्यामुळे सध्या अनेक ग्राहक या पर्यायाचा स्वीकार करीत आहेत

- मनोज सौनिक, अध्यक्ष, महारेरा
Powered By Sangraha 9.0