अमित ठाकरेंच्या विरोधात उबाठा गटाचा उमेदवार जाहीर!

    23-Oct-2024
Total Views |
 
Thackeray
 
मुंबई : मनसेने अमित ठाकरेंना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, आता उबाठा गटाने अमित ठाकरेंच्या विरोधात आपला उमेदवार मैदानात उतरवला आहे. उबाठा गटाने महेश सावंत यांना माहिममध्ये उमेदवारी जाहीर केली.
 
२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी मनसेने वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. यावेळी अमित ठाकरेदेखील पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात उबाठा गटाकडून उमेदवार देण्यात येणार नाही, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, "अमित ठाकरे जर निवडणूकीला उभे असतील तर तरुणांचं राजकारणात स्वागत करावं, ही आमची परंपरा आहे. पण दादर-माहिम मतदारसंघात शिवसेना लढणार नाही, असं कधी होत नाही," असं वक्तव्य करत संजय राऊतांनी अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देण्याचे संकेत दिलेत.
 
हे वाचलंत का? -  बारामतीत काका विरुद्ध पुतण्या थेट लढत! अजित पवारांविरोधात 'हा' उमेदवार
 
त्यानंतर थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंनी महेश सावंत यांना माहिममध्ये अमित ठाकरेंच्या विरोधात तिकीट दिल्याची माहिती पुढे आली. शिवाय दादरमध्ये भगवा फडकवण्याच्या सुचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे आता माहिम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. शिवसेना, मनसे आणि उबाठा गट अशी ही लढत असेल. यात कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.