नवी मुंबई विमानतळाचा विकास दृष्टिक्षेपात

22 Oct 2024 22:15:13
new mumbai airport development
 

मायानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईवरील भार आता दिवसेंदिवस वाढता आहे. हा भार जसा रस्ते, रेल्वे या ठिकाणी जाणवतो, तसाच तो विमानतळावरही जाणवू लागला आहे. त्यामुळेच मुंबईचा भार हलका करण्यासाठी नवी मुंबईत भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहत आहे. त्या विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेणारा हा लेख....

२१व्या शतकात जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी, पायाभूत सेवांचा विकास करणे ही काळाची गरज हवाई वाहतूक क्षेत्र असे आहे की, त्यातील आधुनिकता व तंत्रज्ञान वापरून जर वेगाने विकास साधला तर, देशाच्या आर्थिक स्थितीवर फार चांगला ठसा उमटवता येतो. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेब्रुवारी 2018 साली देशाचे अंदाज पत्रक सादर करताना, जणू काय ही एक भविष्यवाणीच वर्तविली होती. अशा महत्त्वपूर्ण बाबीमुळे नवी मुंबई विमानतळाचे प्रथम पर्वाचे काम, पुढील मार्च 2025 मध्ये पुर्ण होणार हे कळल्यामुळे सर्व नागरिकांना मनस्वी आनंद झाला आहे.

हवाई वाहतूक देशामध्ये झपाट्याने वाढत असून, विमान प्राधिकरणांनी अंदाज व्यक्त केला आहे की, 2040 साली देशातील कमीतकमी 31 शहरांमध्ये दुसर्‍या विमानतळाची गरज भासेल. तर त्याचकाळात देशातील मुंबई व दिल्ली या मोठ्या शहरांकरिता तिसर्‍या विमानतळाची आवश्यकता भासेल, कारण, देशात 2040 साली वार्षिक 110 कोटी हवाई प्रवासी असतील.

2018-19 सालच्या वर्षात सहार विमानतळावर 13.4 दशलक्ष आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी प्रवास करून उच्चांक गाठला होता. हे विमानतळ महाराष्ट्र राज्यातील तीन प्रमुख केंद्रामध्ये, आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर तर, स्थानिक प्रवाशांच्या दृष्टीने क्रमांक तीनवर आले. या विमानतळाची एकूण प्रवासीवहन क्षमता 48 दशलक्ष निर्धारित असली, तरी 48.8 दशलक्ष प्रवासी होणे हे क्षमतेच्या बाहेरचे होते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दैनंदिन प्रवासी संख्या 2018-19 सालच्या नोंदणीनुसार 1.33 लाख होती. या विमानतळावर रोज सरासरी 950 विमानांची ये-जा होती. परंतु त्याहीवेळी नवी मुंबईच्या विमानतळाची फार मोठी आवश्यकता भासतच होती.

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) धावपट्टीची शुक्रवार दि. 11 ऑक्टोबरला यशस्वी चाचणी घेण्यात आली. या विमानतळाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, मार्च 2025 पासून विमानतळावरून विमाने आकाशात झेपावतील,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगीच्या भाषणात व्यक्त केला.

धावपट्टी व तत्संबंधी इतर गोष्टी कार्यरत होण्यासाठी ‘भारतीय हवाई दल’ (IAF) या संस्थेकडून विमानतळाच्या नवीन बांधलेल्या धावपट्टीच्या चाचण्या घेतल्या गेल्या. त्यांनी ‘भारतीय हवाई दला’चे एअरबस सी 295 विमान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरवून तसेच, सुखोई 30 लढाऊ विमानाच्या उड्डाणाची व धावपट्टीवर उतरवण्याच्या उपयुक्त कसोट्या घेतल्या. या कसोट्या सुखरुपपणे पार पडल्यामुळे, हे नवी मुंबईचे विमानतळ सुरक्षित असल्याचे हवाई दलाच्या अधिकार्‍यांनी मान्य केले. या कसोट्या त्या अधिकार्‍यांनी, विजयादशमी व नवरात्राच्या काळात सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पार पाडल्या. त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय विमानसेवा खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट आणि इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. या चाचण्या घेण्याचे काम प्रथम दि. 5 ऑक्टोबरला करण्याचे स्श्चित होते. परंतु मुख्यमंत्रांच्या सांगण्यावरून ते नवरात्र-दसर्‍यासारख्या शुभकाळातच व्हावे, या उद्देशाने ते पुढे ढकलण्यात आले. सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले हे विमानतळ, जगातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी एक होणार आहे. हे समजल्यावर सर्व जमलेल्या लोकांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

या धावपट्टीवर बसविण्यात आलेल्या इन्स्ट्रुमेंट लँडिंग प्रणालीचीही तपासणी करण्यात आली. ही प्रणाली इलेक्ट्रॉनिक्सवर आधारित व स्वयंचलित धावपट्टीसारखी असते. हवेतील दृष्यता कमी झालेली असताना, वैमानिक त्याचे विमान खाली उतरवू शकत नाही. अशा द्विधा स्थितीत ही यंत्रणा उभी ठाकते. वैमानिकांसमोरील स्क्रीनवर, विद्युत लहरींच्या आधारे आभासी धावपट्टी तयार केली जाते. अशा योग्य मदतीच्या आधारामुळेच वैमानिक विमान खाली उतरवू शकतो अथवा आकाशात झेपवू शकतो. या यंत्रणेची चाचणीही या माध्यमातून करण्यात आली. याशिवाय हवाईदलाच्या ‘सुखोई 30 एमकेआय’ या विमानाने केलेला फ्लायपास्ट, धावपटीचे निरीक्षण करणारा होता. त्याआधारे धावपट्टीची लांबी-रुंदी तपासली गेली असल्याची माहिती, हवाई क्षेत्राशी निगडित असलेल्या अधिकार्‍यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या विमानाच्या चाचण्या दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर करायला मिळाल्यामुळे, महायुती सरकारकडून जनतेला या विमानतळाची भेट देण्याची उत्तम संधी आम्हाला मिळाली. हे नवी मुंबईचे विमानतळ भविष्यात नक्कीच क्रमांक एकचे राहाणार. या विमानतळावरून पूर्ण विकासानंतर दरवर्षी अंदाजे नऊ कोटी प्रवासी सुखाने प्रवास करू शकतील. तसेच या विमानतळावरून वार्षिक 2.5 दशलक्ष टन मालवाहतूक होऊ शकते, इतकी या विमानतळाची क्षमता असल्याचे सांगतले. तसेच हे आंतरराष्ट्रीय विमानतळ शिवडी, न्हावाशिवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गांना जोडले जाणार असून, हा देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार असल्याचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या विमानतळाकडे जाण्यासाठी व मुंबईच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’शी पोहोचण्यासाठी, मेट्रोची व टर्मिनल ते टर्मिनल जाण्यासाठी प्रवाशांना सर्व सोई उपलब्ध केल्या जाणार आहेत. मुंबईत आता अटल सेतू आल्यामुळे (MTHL) मुंबईच्या विमानतळ अधिक जवळ आला आहे. नवी मुंबई आणि मुंबई विमानतळ एकमेकांशी मेट्रो रेल्वेद्वारेही जोडले जाणार आहेत.

नवी मुंबई विमानतळ बांधण्याकरिता उलवे नदीचे पात्र वळविणे, उच्च दाबाच्या इलेक्ट्रिक वाहिन्या स्थलांतरित करणे व अतिरिक्त टेकडी सपाटीकरण करण्यासाठी 3 हजार, 600 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती, सिडकोचे व्यवस्थाकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. सार्वजनिक भागीदारीच्या धर्तीवर देशाच्या प्रगतीकरिता हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सिंघल म्हणाले.

तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सध्याच्या मुंबई सहार विमानतळाला पर्यायी म्हणून मुंबई महानगरात कार्यरत होणार असल्याचे ही सिंघल यांनी सांगितले. तसेच या विमानतळावरून भविष्यातील 2030 सालातील अंदाजे 100 दशलक्ष हवाई प्रवाशांना सेवा दिली जाणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. हे विमानतळ दोन पर्वामध्ये बांधले जाणार आहे. या विमानतळाला 1 हजार, 160 हेक्टर जागा लागणार आहे. सध्या बांधलेल्या दोन समांतर धावपट्ट्या वेगळ्या किंवा एकाचवेळी काम करण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. सध्या दोनच धावपट्ट्या तयार असल्या, तरी पुढील पर्वात आणखी तीन धावपट्ट्या आणि दोन टॅक्सी वे तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 60 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहेत. या विमानतळामुळे सभोवारच्या प्रदेशात थेटपणे एक लाख आणि तत्संबंधी व्यवहारामुळे, दोन लाख रोजगार उप्लब्ध होणार आहेत. विमानतळाच्या पहिल्या पर्वाचे काम सध्या जोरात सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल. पहिल्या पर्वात दरवर्षी 6 कोटी प्रवासी व 1.5 दशलक्ष मालवाहू सेवा उपलब्ध होऊ शकेल. सर्व टर्मिनल इमारती एकमेकांना रेल्वेने जोडलेल्या असणार आहेत. हे विमानतळ देशातील सर्वात अत्याधुनिक विमानतळ असेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 
’नैना’ पालटणार नवीन मुंबईतील विमानतळाभोवतीचे रुपडे

येत्या काळात देशातील सर्वात मोठे विमानतळ ठरणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले जात असलेल्या भागात, ’नैना’ शहर प्रकल्प विकसित होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईचे रुपडे पालटणारे हे विमानतळ ठरणार आहे, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला. नवी मुंबई विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये ’नैना’हे नवे शहर, राज्य सरकारच्या माध्यमातून सिडको विकसित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शहराची कोनशिला बसवली आहे. हे तब्बल 225 चौरस किमीचे विस्तारलेले शहर असेल. हे नियोजन आधीचे असले तरी, आता ते दृष्टिपथास येत आहे. या ’नैना’ प्रकल्पात ऐरो सिटीच्या धर्तीवर बिझनेस कॉम्प्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, रुग्णालये, एकात्मिक कार्पोरेट पार्क, कनव्हेक्शन सेंटर, वैद्यकीय सुविधा अशा काही बाबी, सुनियोजित पद्धतीने केल्या जाणार असून, याद्वारे एकप्रकारे नवीन वांद्रा-कुर्ला संकूल उदयास येईल.

प्रस्तुत केले जाणारे नवीन ’नैना’ शहर हे, अत्याधुनिक, टिकणारे आणि जगातील सर्व पायाभूत सेवांनिशी उत्तम स्मार्ट शहर बनणार आहे. सिडको कडून स्पेशल टाऊन प्लानिंग अ‍ॅथॉरिटी म्हणून, हे शहर वसविले जात आहे. त्यात 12 टाऊन प्लानिंग स्किम्स आहेत. या शहराचे क्षेत्रफळ 225 चौ. कि.मी. असून, त्यांची बांधणी रायगड जिल्ह्यातील पनवेल उरण तालुक्यामधील 96 रेव्हेन्यु गावांमधून होणार आहे. हे शहर विकसित करण्याचा मुख्य उद्देश विमानतळाभोवती सुनियोजितपणे विकास होईल आणि कोठेही तो आकस्मिकपणे अनियोजित राहू नये हा आहे.


Powered By Sangraha 9.0