नवी दिल्ली : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनसुार फैजल निसार उर्फ फैजान पोलीस ठाण्यात पोहोचत भारतमातेचा जयघोष केला. 'पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद'च्या घोषणा देणाऱ्या फैजानला उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. तसेच, दर महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या मंगळवारी पोलीस स्टेशन गाठत तिरंग्याला २१ वेळा सलामी द्यावी लागेल आणि ‘भारत माता की जय’ म्हणावे लागेल, अशी अट घातली होती.
दरम्यान, 'पाकिस्तान झिंदाबाद' म्हणणारा फैजान पोलिस ठाण्यात पोहोचत भारत मातेचा जयघोष करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत फैजान २१ वेळा तिरंग्याला सलामी देत असून मी माझी चूक मान्य करतो असे म्हणताना दिसून येत आहे. दि. २२ ऑक्टोबरला फैजानचा व्हिडिओ समोर आला असून जबलपूर पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर तिरंग्याला सलामी देताना दिसत आहे.
विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने घातलेली अट या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहे. या अटीचे पालन करण्यासाठी फैजानने २२ ऑक्टोबरला पहिल्यांदा पोलिस ठाणे गाठले. भारत माता की जय. मी माझी चूक मान्य करतो. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेन. मी पुन्हा अशी चूक करणार नाही, असे माध्यमांशी संवाद साधताना फैजानने सांगितले.