मुंबई विमानतळावर 'हॉर्नबिल' पक्ष्यांची तस्करी; तस्करीचा मार्ग होता...

22 Oct 2024 12:50:37

hornbill trafficking


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सोमवारी सायंकाळी बॅंकाॅकवरुन मुंबईत आलेल्या विमानातून सीमाशुल्क विभागाने चार हाॅर्नबिल म्हणेजच धनेश पक्षी ताब्यात घेतले (hornbill trafficking). या प्रकरणी दोन भारतीय प्रवाशांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे (hornbill trafficking). या प्रवाशांनी बेकायदा पद्धतीने या धनेश पक्ष्यांची वाहतूक केल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेले धनेश पक्षी हे संकटग्रस्त प्रजातींमधील आहेत. (hornbill trafficking)
 
 
सोमवारी सायंकाळी बॅंकाॅवरुन मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या विमानातील सामानकक्षात सीमाशुल्क विभागातील अधिकाऱ्यांना काही संशयास्पद बॅग आढळल्या. चाॅकलेटने भरलेल्या दोन पिशव्यांमध्ये अधिकाऱ्यांना प्लास्टिकचे मोठे डब्बे आढळून आले. या डब्ब्यांची पाहणी करताच अधिकाऱ्यांना त्यामध्ये चार धनेश पक्ष्यांची पिल्ले आढळली. त्यांनी लागलीच याची माहिती 'केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागा'च्या (डब्लूसीसीबी) अधिकाऱ्यांना दिली. 'डब्लूसीसीबी'च्या अधिकाऱ्यांनी विमानतळावरुन येऊन धनेश पक्ष्यांची पाहणी केल्यावर त्यांना हे धनेश पक्षी विदेशी असल्याचे लक्षात आले. या पक्ष्यांची ओळख पटवल्यानंतर त्यामधील दोन पक्षी हे सुलावेसी हाॅर्नबिल प्रजातीचे आणि उर्वरित दोन पक्षी हे विसायन प्रजातीचे असल्याचे समजले. यामधील विसायन प्रजातीच्या धनेश पक्ष्यांची नोंद जगातील 'संकटग्रस्त' पक्ष्यांच्या प्रजातींच्या यादीत करण्यात आली आहे. मुंबईतील 'राॅ' या संस्थेच्या मदतीने या पक्ष्यांची विमानतळावरच काही काळासाठी देखभाल करण्यात आली आणि मंगळवारी सकाळच्या विमानाने या चारही पक्ष्यांना पुन्हा बॅंकाॅकला रवाना करण्यात आले आहे.
 
 
बॅंकाॅकवरुन या धनेश पक्ष्यांना मुंबईत आणणाऱ्या दोन प्रवाशांना सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, या निमित्ताने परदेशातून भारतात होणाऱ्या वन्यजीवांच्या तस्करीचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. जगातील वेगवेगळ्या प्रजातीचे धनेश हे पाळले जातात. त्यामुळे वन्यजीव तस्करीमध्ये त्यांना मोठी मागणी आहे. मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलेले विसायन धनेश पक्षी हे फिलिपिन्स आणि विसायस द्वीपसमूहातील काही बेटांवर आढळतात. पक्ष्यांच्या आतंरराष्ट्रीय तस्करीमध्ये धनेशाच्या या प्रजातीला मोठी मागणी असल्याने त्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आययूसीएनने या प्रजातीला 'संकटग्रस्त' प्रजातींच्या यादीत स्थान दिले आहे. सुलावेसी धनेश पक्षी हे इंडोनेशियामध्ये आढळतात.
 
 
Powered By Sangraha 9.0