न्यायभक्ती

22 Oct 2024 21:29:35
cji dy chandrachud statement
 

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा नुकताच त्यांच्या पुणे जिल्ह्यातील कनेरसर गावी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चंद्रचूड यांनी अयोध्या श्रीरामजन्मभूमी खटल्याच्या ऐतिहासिक निकालापूर्वी त्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. अयोध्येचा निकाल देणार्‍या तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठात चंद्रचूड यांचाही समावेश होता. साहजिकच या खटल्याच्या निकालाकडे देशासह जगाचेही लक्ष लागून होते. कारण, हा प्रश्न आस्थेचा, धर्माचा आणि संस्कृतीचा होता. त्यामुळे न्यायाधीशांवरही एकप्रकारे त्याचे दडपण असणे म्हणा स्वाभाविकच. या अनुषंगाने बोलताना चंद्रचूड म्हणाले की, “मी परंपरेमुळे नियमित पूजा करतो. अनेक वेळा कोर्टात काम करताना पर्याय सूचत नाही. जेव्हा अयोध्येचे काम माझ्या पुढे आले, त्यावेळी आम्ही तीन महिने अयोध्या प्रकरणावर विचार करत होतो. शेकडो वर्षे अयोध्या प्रकरणावर मार्ग सापडला नव्हता. ते काम आमच्यासमोर आले होते. त्यावेळी मी माझी रोजची पूजा करताना भगवंतासमोर बसलो. देवाला सांगितले, आता मार्ग तुम्हीच शोधून द्या. आपली आस्था असेल, आपला विश्वास असेल, तर भगवंतच मार्ग शोधून देतात.” पण, सरन्यायाधीशांच्या या वक्तव्यानंतर पुरोगामी आणि विरोधकांना एकाएकी पोटशूळ उठला. खरे तर चंद्रचूड यांनी त्यांच्या मनातील भावना अतिशय प्रामाणिकपणे व्यक्त केली. बरेचदा जीवनातील अशा कसोटीच्या प्रसंगी कुठलाही मार्ग समोर दिसत नसताना, देवासमोर बसून आपण योग्य तो मार्ग दाखवण्याची मनोभावे प्रार्थना करतो. एवढेच काय तर विद्यार्थीजीवनातही अगदी परीक्षेपूर्वी देवासमोर हात जोडून पेपर नीट जाऊ दे, हे तर आपले बालपणीचे संस्कार. मग अशा ऐतिहासिक निकालापूर्वी जर भक्तिभावाने न्यायमूर्तींनी देवासमोर मार्ग दाखवण्याची प्रार्थना केली, तर मुळी त्यावर आक्षेप घेण्याचे कारणच काय? पण, न्यायदान करणारी व्यक्तीच मुळी सश्रद्ध असणे, हीच पुरोगाम्यांची खरी पोटदुखी. कारण, त्यांच्या लेखी भक्ती, श्रद्धा हे जणू न्यायदानातील धोंडेच! त्यामुळे काळ्या कोटातील न्यायमूर्ती यापलीकडे जाऊन, चंद्रचूड यांनी एक सामान्य व्यक्ती म्हणून केलेल्या प्रार्थनेवरही शिंतोडे उडवण्याचा हा अश्लाघ्य प्रकार सर्वस्वी निंदनीयच!
 
न्यायसक्ती
 
एखाद्याची श्रद्धा, उपासना, भक्ती हा त्या व्यक्तीचा सर्वस्वी व्यक्तिगत विषय, मग ती व्यक्ती अगदी कुठल्याही पदावर का असेना. एखादे संविधानिक पद मिळाले की, त्या व्यक्तीने त्याचा धर्म, संस्कार, संस्कृती खुंटीला टांगून ठेवावे, असा काही नियम नाही. पण, दुर्दैवाने काँग्रेसच्या शासनकाळात एखाद्या सरकारी-शासकीय पदावरील व्यक्तीने आपला धर्म, भक्तीला चार भिंतीत कुलुपबंद करण्याची कुप्रथाच सामान्य झाली. पण, 2014 सालानंतर हे चित्र पालटले. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ ही सामाजिक, धार्मिक भावना पुनर्जागृत झाली. पण, वेळोवेळी त्यावरुनही हिंदूंना, हिंदूंच्या संस्कृतीला दूषणे देण्याचे करंटे प्रकार काही थांबले नाहीत. मग शासकीय कार्यालयांमध्ये देवांच्या तसबिरी ठेवण्यावरील आक्षेपांपासून ते अगदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये राफेल विमानांवर स्वस्तिक काढून केलेल्या शस्त्रपूजनावरही पुरोगाम्यांनी शरसंधान साधले. आताही सरन्यायाधीशांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्यावर अशाच विचित्र प्रतिक्रिया उमटल्या. यात कहर केला तो समाजवादी पक्षाचे खा. राम गोपाल यादव यांनी. त्यांनी तर चक्क चंद्रचड यांना शिवी घातली. एवढेच नाही तर “मेलेल्यांना पुन्हा जिवंत केले, तर त्यांची भूतं लोकांच्या मानगुटीवर येऊन बसतात,” असेही धक्कादायक विधान केले. यावरुन वादंग उठताच, यादव यांनी विधानावरुन घुमजाव करण्याचा प्रयत्न केला खरा. पण, मुळात यावरुन समाजवादी पक्षाची राममंदिरविरोधी भूमिका पुनश्च अधोरेखित व्हावी. कारण, याच समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री असताना त्यांनी कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते आणि शरयू नदी रामभक्तांच्या रक्ताने लाल झाली होती. त्यामुळे एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवाधिकार वगैरेच्या मोठ्या गप्पा ठोकणारी हीच मंडळी आज देशाच्या सरन्यायाधीशांच्या धार्मिक भावनांची अशी टिंगलटवाळी करताना, त्यांच्या न्यायदानाच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसते, यापेक्षा दुर्दैव ते काय... त्यामुळे ‘सर्वोच्च न्यायालयाने देशात विरोधी पक्षाची भूमिका निभावावी, ही अपेक्षाच मुळी गैर आहे,’ हे चंद्रचूड यांनी ‘आमच्याच बाजूने न्याय हवा’ या विरोधकांच्या न्यायसक्ती’वर नुकतेच केलेले विधान डोळ्यांत अंजन घालणारे ठरावे.


Powered By Sangraha 9.0