महाराष्ट्रात 'व्हिनचॅट'चे दुर्मीळ दर्शन; सिंधुदुर्गात याठिकाणी दिसला पक्षी

21 Oct 2024 09:42:10
whichat sindhudurg



मुंबई (अक्षय मांडवकर) -
महाराष्ट्रामध्ये 'व्हिनचॅट' या पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन झाले आहे (whinchat). सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधून या पक्ष्याची दुर्मीळ नोंद करण्यात आली आहे (whinchat). पक्षीनिरीक्षकांनी युरोपियन पक्ष्याची केलेली ही नोंद जिल्ह्याचे पक्षीवैभव अधोरेखित करणारी ठरली आहे (whinchat)
 
 
राज्यातील गवताळ आणि पाणथळ अशा दोन्ही अधिवासांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमानाला सुरुवात झाली आहे. यामधील काही पक्षी हे दरवर्षी राज्यात स्थलांतर करुन येतात. मात्र, स्थलांतरित पक्ष्यांच्या काही प्रजाती या स्थलांतराचा मूळ मार्ग भरकटून इतर प्रदेशांमध्ये स्थलांतरित होतात. अशाच प्रकारे व्हिनचॅट नावाचा छोटा स्थलांतरित पक्षी राज्यात दाखल झाला आहे. व्हिनचॅट हा मूळ युरोपातील पक्षी आहे. त्याचा आकार १२ ते १४ सेंटीमीटर असून त्यांचे वजन १३ ते २६ ग्रॅम असते. तो युरोप आणि पश्चिम आशिया देशांमध्ये मे ते आॅगस्ट या काळात प्रजनन करतो. साधारण आॅगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान मध्य आफ्रिकन प्रदेशामध्ये स्थलांतर करतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये हा पक्षी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील काही राज्यांमध्ये भरकटलेल्या अवस्थेत स्थलांतरित झाला आहे. अशाच प्रकारे हा पक्षी सध्या सिंधुदुर्गात दाखल झाला असण्याची शक्यता आहे. कारण, सिंधुदुर्गातील पक्षीनिरिक्षकांना देवगड तालुक्यात या पक्ष्याचे दर्शन घडत आहे.
 
 
व्हिनचॅट हा गवताळ अधिवासामध्ये स्थलांतर करणारा पक्षी आहे. राज्यात दरवर्षी स्थलांतर करुन येणाऱ्या सायबेरियन स्टोनचॅट म्हणजेच गप्पीदास या पक्ष्यांसारखाच हा पक्षी दिसत असल्याने त्याची ओळख पटवण्यामध्ये गल्लत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचऱ्यामधील पक्षी निरीक्षक डाॅ. श्रीकृष्ण मगदूम हे देवगडमध्ये १५ आॅक्टोबर रोजी पक्षीनिरीक्षणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हा पक्षी दिसला. गप्पीदास पक्ष्यापेक्षा या पक्ष्याच्या पाठीवरील रंग आणि आकार वेगळा जाणवल्याने त्यांनी लागलीच त्याची छायाचित्रे टिपली आणि पक्षीतज्त्र आदेश शिवकर यांच्या माध्यमातून त्याची ओळख पटवून घेतली. गप्पीदासपेक्षा व्हिनचॅटच्या छातीचा रंग हा केशरी असून पोटाच्या भागाकडील पांढरा रंग हा त्यामध्ये मिसळलेला असतो. याशिवाय त्याची शेपूट आखूड आणि तिच्या बाहेरील कडा या पांढऱ्या रंगाच्या असतात. तसेच डोळ्याच्या वर दिसेल आणि जाणवेल असा पांढरा पट्टा असल्याची माहिती आदेश शिवकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. महाराष्ट्रामधील या पक्ष्याची ही दुसरी नोंद असून यापूर्वी सोलापूरमधून या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे.
पक्षीनिरीक्षणावेळी पहिल्यांदा हा पक्षी पाहिल्यानंतर तो पाठमोरा असल्यामुळे त्याच्या वेगळेपणाची जाणीव झाली नव्हती. मात्र, त्याने मान वळवून आमच्याकडे पाहताच त्याच्या चेहऱ्यावरील रचनेमुळे हा पक्षी गप्पीदास पक्ष्यापेक्षा वेगळा असल्याचे जाणवले. महाराष्ट्रामध्ये प्रथमच हा पक्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडल्याने जिल्ह्याचे पक्षीवैभव अधोरेखित झाले आहे. - डाॅ. श्रीकृष्ण मगदूम, पक्षीनिरीक्षक


Powered By Sangraha 9.0