सहकार्याची सुरूवात! भारत आणि चीन मध्ये नियंत्रण रेषेच्या व्यवसथेसाठी करार

21 Oct 2024 19:10:33

india china

नवी दिल्ली:(India and China) भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळण्याची आशा आहे. भारत आणि चीन या दोन देशांमध्ये अखेर पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेवरील सुरक्षाव्यवसथेवर करार झाला आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना या संदर्भात माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांच्या ब्रिक्स दौऱ्याच्या पूर्वसंध्येला हा करार झाला असून पंतप्रधान मोदी चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेण्याची शक्यता सुद्धा वर्तवीली जात आहे.

परराष्ट्र सचिवांच्या मते, या करारामुळे सीमेवरील तणाव अखेर कमी होईल. गेले अनेक आठवडे या विषयावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होती. डेपसांग आणि डेमचोक या परिसरातील सीमालगतच्या भागावरून गेले काही दिवस वाद सुरू होता. अखेरीस, तोडगा काढत समन्वय साधन्यात आम्हाला यश आले आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. तेव्हापासून, भारत आणि चीन यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता.

मोदी-जिनपिंग भेट होणार?
रशिया मध्ये पार पडणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत, पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. याच परिषदेत, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग सुद्धा सहभागी होणार असून दोघांमध्ये बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिखर परिषदेत, जागतिक विकास आणि सुरक्षिततेसाठी बहुपक्षीयता मजबूत करण्यावर चर्चा केली जाणार आहे. परराष्ट्रमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही शिखर परिषद ब्रिक्स उपक्रमांवरील प्रगतीचा आढावा घेण्याची आणि सहकार्यासाठी नवीन क्षेत्रे शोधण्यासाठी नवी संधी आहे. पंतप्रधान मोदी ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर सहभागी राष्ट्रांसोबत द्विपक्षीय बैठकीत चर्चा करणारा आहे.


 
Powered By Sangraha 9.0