विमानात बॉम्बच्या अफवाविरोधात केंद्र सरकार कायदा करणार

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालय सक्रिय

    21-Oct-2024
Total Views |
 
aircraft
 
नवी दिल्ली : ( Ministry of Civil Aviation ) विमानात बॉम्ब असल्याच्या खोट्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कायदा करणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी दिली आहे.
 
गेल्या आठवड्याभरात जवळपास १०० विमानांमध्ये बॉम्ब असल्याचे फोन विविध विमान कंपन्यांना आले होते. त्यातील सगळे फोन हे खोटे असल्याचे तपासाशेवटी उघड झाले आहे. मात्र, या प्रकारांविरोधात केंद्र सरकार कठोर कायदा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नायडू यांनी सांगितले आहे.
 
विविध विमान कंपन्यांना आलेल्या धमक्या खोट्या सिद्ध झाल्या असल्या तरीदेखील मंत्रालय आणि विमान कंपन्या कठोर प्रोटोकॉलचे पालन करतात. अशा धमक्यांमुळे हे प्रकरण अतिशय संवेदनशील बनते. फोन कॉल्स सुरू झाल्यापासून संबंधितांसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. केंद्र सरकार त्यासाठी विमान सुरक्षा नियमांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे. अशा धमक्या देणाऱ्या लोकांना ओळखणे आणि त्यांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकणे हा त्याचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे हा गुन्हा दखलपात्र श्रेणीत टाकण्यात येणार आहे. त्यासाठी या विषयाशी संबंधित अन्य मंत्रालयांसोबतबही चर्चा सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री नायडू यांनी सांगितले आहे.