मोठ्या उत्साहात पार पडला दिव्यांग मुलांचा 'यहाँ के हम सिकंदर' महोत्सव

    21-Oct-2024
Total Views |

Yaha ke hum sikandar 
 
मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक शाखा असणारी बालरंगभूमी परिषद, बृह्नमुंबई शाखा आयोजित 'यहाँ के हम सिकंदर' हा दिव्यांग मुलांचा महोत्सव शनिवार १९ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, माटुंगा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबई जिल्ह्यातील १३ दिव्यांग शाळांमधील २०० दिव्यांग बालकलावंतानी या महोत्सवात या महोत्सवात सहभाग घेऊन आपली कला सादर केली. सहभागी झालेल्या प्रत्येक संघास पाच हजार रुपये मानदेय, सन्मानचिन्ह तसेच सहभागी दिव्यांग कालावंतांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर सहभागी शाळेतील शिक्षकांचा देखील गौरव या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या महोत्सवांतर्गत विविध विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली गेली आणि त्यातून मिळालेली रक्कम त्यांच्या शाळेलाच देण्यात आली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम-शिर्के सामंत, बृहन्मुंबई शाखेचे अध्यक्ष राजीव तुलालवार, कार्यावाह आसेफ अन्सारी, कार्याध्यक्ष ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती निसळ, उपाध्यक्ष सुनील सागवेकर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर, मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष शीतल करदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.