गोंधळी समाजाच्या विकासासाठी...

21 Oct 2024 23:24:28
 
Vishwas Dorvekar
 
 
भटके विमुक्त जाती त्यातही गोंधळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे मुंबईचे विश्वास दोरवेकर. भटक्याचे जगणे काय असते, याची साक्ष देणार्‍या त्यांच्या संघर्षाचा घेतलेला मागोवा...
 
श्वास यांचे आजोबा त्यांच्या भावांसह पुण्यात आले. पुण्यात ते बाजारात गोंदवण्याचे काम करू लागले. त्यांचा मुलगा गुणवंत सैन्यात भरती झाले. मात्र, त्यांनी नोकरी काही पूर्ण केली नाही.उदरनिर्वाहासाठी गुणवंत यात्रा-जत्रेत गोंदवण्याचा व्यवसाय करायचे. अख्या महाराष्ट्रभर फिरायचे. पण, व्यसनामुळे पैसा टिकायचा नाही. दारिद्य्राच्या चटक्यांनी कुटुंब रसातळाला गेले. गुणवंत यांची पत्नी लेकीला घेऊन माहेरी गेली, तर गुणवंत इतर तीन मुलांना घेऊन, रानोमाळ फिरू लागले. वयाच्या १२ वर्षांपासून विश्वास, यात्रा-जत्रते गोंदण काढण्याचे काम करू लागले. दोन भावांमधील एक भाऊ दिव्यांग तर, इतर दोन भावांना ते सांभाळायचे. स्वत: स्वयंपाक बनवायचे व रस्त्यावरच्या चुलीवर कशीबशी बनवलेली खिचडी खायचे. अन्न,वस्त्र निवारा, या मुलभूत गरजाही त्यांच्याकडे नव्हत्या, तर त्यांच्यासाठी ते कधीही पूर्ण न होणारे स्वप्न होते. याच काळात त्यांनी दोन भावांना बोर्डिंगमध्ये शिकवण्यासाठी घातले.
 
विश्वास हे सुद्धा आता एकटे यात्रा-जत्रेत गोंदण काम करण्यासाठी जाऊ लागले. ते कुठेही असले तरीही, बोर्डिंगमध्ये असलेल्या दोन भावांना भेटायला जायचे. १३ ते १६ वर्षांपर्यंत त्यांनी त्यांचे आयुष्य, महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील यात्रा-जत्रेत काढले. त्यानिमित्ताने रस्त्यावर उघड्यावर राहणे आलेच. या काळात त्यांना वाईट संगत लागली. त्यातून बाहेर कसे पडावे? हे विश्वास यांना सुचत नव्हते. त्याचवेळी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत त्यांना त्यांचे दूरचे भाऊ रमेश भेटले. विश्वास यांना पाहून रमेश म्हणाले, “अरे तुला काय झाले? चल माझ्यासोबत.” विश्वास त्यांच्यासोबत राहू लागले. रमेश यांनी सांगितले की, ”बघ आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगले करायचे आहे, म्हणूनच इतक्या खडतर जीवनात सुद्धा आपण जिवंत आहोत. तू व्यायाम करत जा, प्रकृती सुधारेल.” मग विश्वास व्यायाम करायला लागले. दोन वर्षांच्या कालावधीत ते व्यायामामध्ये इतके गुंतले की, दहा हजार सूर्यनमस्कार घालण्याचा त्यांनी विक्रम केला. पुढे त्यांचा विवाहही झाला. त्यावेळी ते आणि त्यांचे बाबा एका पाण्याच्या प्याऊच्या स्वच्छतेचे कामही करत आणि तिथेच राहत असत. मात्र, कालांतराने त्यांना ती जागा सोडावी लागली. बायकापोरांना घेऊन कुठे जायचे? म्हणून पत्नीचे मंगळसूत्र आणि सोबत असलेले सगळे किडूक-मिडूक विकून त्यांनी, सात हजार रूपये देऊन जागा विकत घेतली. काही वर्षे ठिक गेली. मात्र, ज्याच्याकडून त्यांनी ती जागा विकत घेतली होती, त्याने जागा सोडण्यासाठी दमदाटी सुरू केली. जागा खाली करावी, यासाठी गुंडांकडून त्यांना मारहाणही करवली. सगळ्या घरादारावर ‘चॅप्टर’ केसही टाकली. विश्वास यांना कळेचना की, ज्याच्याकडून जागा विकत घेतली तोसुद्धा आपल्यासारख्याच शोषित समाजाचा. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ म्हणत जगणारा. त्याने आपला असा विश्वासघात का करावा?
 
छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे दिवस रात्र फिरताना विश्वास यांनी पाहिले होते की, आझाद मैदानात लोक त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करतात, मग त्यांच्या मागण्या पूर्ण होतात. विश्वास यांनीही आंदोलन सुरू केले. मात्र काही दिवसांनी त्यांना जाणवले की, माणसे एकटी आंदोलनाला बसत नाहीत, तर त्यांच्या काही संघटना असतात. तसेच प्रत्येक जण आंदोलनात त्यांच्या जातीचे नाव घेतो, जातीच्या महापुरूषाचे नाव घेतो, आरक्षणाबद्दल महामंडळाबद्दल सवलतीवर बोलतो. या सगळ्यात आपण आणि आपली जात कुठे आहे? त्यातूनच मग त्यांनी समाज संघटित करण्याचे काम सुरू केले. महाराष्ट्र-कर्नाटकमधील प्रत्येक गावातील गोंधळी कुटुंबाशी संपर्क होताच. समाजात अनेक लोक शिकून मोठ्या पदावर गेली होती. गोंधळी समाजात तुळजाभवानी मातेला मानणारा कदम गोंधळी आणि रेणुका मातेला मानणारा रेणुराई गोंधळी, असे दोन भाग आहेत. या दोघांनाही एकत्र आणून, एकमेकांच्या साथीने समाज पुढे कसा आणता येईल, यासाठी त्यांनी काम सुरू केले. समाजाला भेडसावणार्‍या प्रश्नांवर काम करणे सुरू केले. समाजाचे पारंपरिक काम गोंधळ घालणे, त्यात शुद्ध धार्मिकता आहे, पावित्र्य आहे. त्या पारंपरिक पावित्र्याचा वारसा पुढच्या पिढीत यावा, यासाठी ते काम करतात. जातीचा दाखला मिळवणे हे आजही समाजासाठी बिकट काम आहे. समाजातील प्रत्येक कुटुंबाला जातीचा दाखला कसा मिळेल यासाठीही त्यांनी प्रयत्न केले आणि करत आहेत. समाजातील व्यसनाधिनता कमी व्हावी म्हणून, त्यांनी संघटनेच्या माध्यमातून काम सुरू केले. समाजातील युवकांनी आणि महिलांनी हे काम सहर्ष मनाने स्वीकारले. ते काम म्हणजे गोंधळी समाजाचा वेष आणि कपाळी टिळा लाऊन, जर कोणी दारूच्या गुत्त्यात आढळला, तर त्याला तिथल्या तिथे चोपणे. समाज बुद्धिमान आणि कलावंत आहे. समाजात आजही इज्जत हीच श्रीमंती आहे. त्यामुळे दारू प्यायल्यामुळे भर बाजारात जर कुणी अपमान केला तर इज्जत जाईल, म्हणून आता अनेकजण या व्यसनापासून दूर झाले आहेत. तर केवळ जातीशी नाही, तर मातीशी, संस्कृतीशी आणि धर्माशी नाळ जुळलेले, विश्वास हे ‘विश्व गोंधळी परिषद संस्थे’चे अध्यक्ष संस्थापक आहेत. भटक्या व विमुक्त जाती संघाचे कार्याध्यक्ष आहेत. तसेच, बृहन महाराष्ट्र गटई कामगार संघटनाचे सरचिटणीस आहेत. आई तुळजाभवानी, आई रेणुकाआई विश्वास यांचे गोंधळी समाजाच्या विकासाचे स्वप्न नक्की पूर्ण करो याच दै. मुंबई तरुण भारतच्या शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0