साहित्य संघाचा मानाचा 'यशवंत पुरस्कार' वासुदेव कामत यांना जाहीर

21 Oct 2024 14:47:59
 
वासुदेव कामत
 
मुंबई : मराठी साहित्य संघातर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा 'यशवंत पुरस्कार' या वर्षी प्रसिद्ध चित्रकार आणि संस्कार भारतीचे अध्यक्ष वासुदेव कामत यांना जाहीर झाला आहे. मुंबई मराठी साहित्य संघाचा ८९ वा वर्धापनदिन शनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता गिरगावातील साहित्य संघाच्या भालेराव नाट्यगृहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात साहित्य संघाच्या अध्यक्षा अचला जोशी यांच्या हस्ते वासुदेव कामत यांना हा पुरस्कार बहाल केला जाणार आहे. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात वासुदेव कामत विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून ‘मी, चित्रकला आणि चित्रांची भाषा’ या विषयावर ते व्याखान देणार आहेत.
 
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे मराठी विश्वातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व यशस्वी व्यक्तींना दरवर्षी ‘मराठी यशवंत पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते. रोख २५ हजार रुपये, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याआधी हा पुरस्कार चित्रपट व नाट्य दिग्दर्शक विजया मेहता, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव चितळे, उद्योजक सुभाष दांडेकर, संगीतकार यशवंत देव, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर अशा नामवंतांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष वासुदेव कामत चित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यक्तिचित्रकार आणि निसर्गचित्रकार म्हणून ते विशेष प्रसिद्ध आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या अनेक दिग्गजांना त्यांनी समक्ष बसवून चित्र काढलेली आहेत. आजवर अनेक ठिकाणी त्यांची चित्र प्रदर्शने भरलेली आहेत.
Powered By Sangraha 9.0