नवोदित कलाकारांना मालिका-चित्रपट हवे, पण नाटकात काम नको; प्रशांत दामलेंनी व्यक्त केली खंत

    21-Oct-2024
Total Views |
 
prashant damle
 
 
मुंबई : 'मु. पो. बोंबिलवाडी' या लोकप्रिय नाटकाचे आता चित्रपटात रुपांतर होणार आहे. नाटकाचे दिग्दर्शक परेश मोकाशीच चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून मयसभा करमणूक मंडळी आणि विवेक फिल्म्स या चित्रपटाची निर्मीत करणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत दिसणार आहेत. रंगभूमीवर गेली अनेक वर्ष सातत्याने काम करणारेरंगभूमीवरील विक्रमवीर प्रशांत दामले म्हणाले की, 'नाटक करताना तुम्हाला मिळणारी शिकवण महत्त्वाची आहे. रंगभूमी कलाकारांना प्रगल्भ बनवते.
 
महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत दामले म्हणाले की, “'मी फार कमी चित्रपट केले आहेत; पण चित्रपट असो किंवा नाटक; दिग्दर्शक सांगेल तसं काम करण्याचा माझा स्वभाव आहे. तो सांगेल तेच मी करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. प्रत्येक वेळी कोरी पाटी घेऊन बसलं की काम करायला सोपं जातं. या सिनेमात बरेचसे कलाकार नाटकामधलेच असल्यामुळे नाटकाचंच चित्रीकरण करतोय की काय असा भास होतोय.'
 
पुढे नवोदित कलाकारांना चित्रपट, मालिकांमध्ये काम करण्याची इच्छा असते. हे कलाकार नाटकात काम करण्यास मात्र फारसे उत्सुक नसतात. याबद्दल बोलताना प्रशांत दामले म्हणाले, 'रंगभूमी कलाकारांना प्रगल्भ बनवते. कलाकारांनी कमीत कमी चार वर्षं नाटकात काम करायला हवं. नाटकं हे असं एकमेव माध्यम आहे; ज्यामध्ये प्रत्येक प्रयोगाच्या वेळी कलाकारांना पैसे घेऊन शिकता येतं. काहीतरी नवीन करण्याची संधी मिळते. अशा पद्धतीनंच एक उत्तम कलाकार घडत असतो. या सगळ्याचा विचार करणं आवश्यक आहे. वेळेचं योग्य नियोजन केल्यास चित्रपट आणि नाटक दोन्हीकडे काम करणं शक्य आहे. आपण जे काम करतोय त्यात स्पर्धा नसावी. मर्यादित गरजा असल्या की, छान काम करता येत असं माझं ठाम मत आहे.'