मंदिर स्वच्छता सेवा अभियानाला समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

21 Oct 2024 17:03:21

Mandir Swacchata Sewa Abhiyan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर अर्चक पुरोहित आयामाने केलेल्या मंदिर स्वच्छता अभियानाच्या (Mandir Swacchata Sewa Abhiyan) आवाहनाला महाराष्ट्र व गोवा राज्यात समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यात ६५६० मंदिरे आदि धार्मिक स्थानाच्या स्वच्छतेसाठी विविध संस्था संघटनाचे साधारण ६० हजार कार्यकर्ते सेवाकार्यात सहभागी झाले होते. रविवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते अकरा या वेळेत हे अभियान सर्वदूर राबवले गेले. अभियानाचे हे यंदाचे दुसरे वर्ष आहे.

हे वाचलंत का? : ६४ वर्षांनंतर पाकिस्तानातील हिंदू मंदिराचा होणार जीर्णोद्धार

देवगिरी प्रांतात १८५०, कोकणमध्ये १५००, विदर्भात १२१०, पश्चिम महाराष्ट्र प्रांतात ८५० व गोवा राज्यात १५० संख्येने मंदिर स्वच्छता सेवा देण्यात आली. यावेळी महिला आणि पुरुषांनी मिळून मंदिरे, बौद्ध विहार, जैन स्थानक, गुरुद्वारे तसेच हिंदू धर्मातील सर्व धार्मिक स्थानांच्या स्वच्छतेसाठी उस्फूर्त सहभाग नोंदवला. मागील वर्षापासून मंदिर आयामाच्या वतीने उपक्रम राबवणे सुरू झाले आहे. मागच्या वर्षी ५५० मंदिरांमध्ये स्वच्छता सेवा देण्यात आली होती.


Mandir Swacchata Sewa Abhiyan

मंदिर स्वच्छता अभियानासाठी गेल्या महिन्याभरापासून तयारी सुरु झाली होती. यासाठी विविध संस्था संघटनांबरोबर बैठका संपन्न झाल्या. मंदिरांसह सर्व धार्मिक स्थानांच्या याद्या तयार करण्यात आल्या. मंदिर स्वच्छतेसाठी आवश्यक ते साहित्य झाडू, खराटे, पोछा, इलेक्ट्रिक ब्लोअर इत्यादीची उपलब्धता स्थानिक स्तरावर करण्यात आली. मंदिर व्यवस्थापनामध्ये भाविकांचा सहभाग वाढवणे हा या अभियानाच्या मागचा हेतू होता.

साडेतीन हजार बॅनरद्वारे आवाहन
मंदिर स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभाग नोंदवावा अशा आशयाचे साडेतीन हजार बॅनर मंदिरांवर लावण्यात आले होते. ते वाचून अनेक भाविक महिला पुरुष अभियानात सहभागी झाले. अनेक मंदिरांनी आपल्या मंदिरांसोबत दुसऱ्या मंदिराची जबाबदारी घेऊन तिथे पण स्वच्छता सेवा केली. अनेक व्यक्ती समूह यांनी आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वयंपूर्ण आपापल्या परीने आपापल्या परिसरात हे स्वच्छता सेवेसह महाभियान राबविले.

मंदिरावर ध्वज, रोषणाई आणि तरुण जोडप्यांच्या हस्ते ध्वजपूजन
सर्व मंदिरांशी संपर्क करून त्यांनी दिवाळीच्या आधी मंदिरावर नवीन ध्वज लावावा आणि दीपावलीच्या काळात चार दिवस रोषणाई करावी आणि समाजाच्या विविध जातींच्या तरुण जोडप्यांच्या हस्ते ध्वज पूजन करावे आणि हे मंदिर प्रत्येक हिंदू समाजाची आहे. प्रत्येकाला त्यात स्थान आहे. समरसतेचा भाव कृतीतून जागृत करावा, अशी विनंती सर्व मंदिर विश्वस्तांना करण्यात आली.

Powered By Sangraha 9.0