अदर पूनावाला आता चित्रपट निर्मितीत, करण जोहरच्या ‘धर्मा’सोबत केलं डील! कोण असेल सीईओ?

    21-Oct-2024
Total Views |

poonawala  
 
मुंबई : करोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्युटचे अदर पुनावाला यांनी आता हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. हिंदीतील लोकप्रिय दिग्दर्शक-निर्माते करण जोहरच्या कंपनीमध्ये अर्थात धर्मा प्रोडक्शनमध्ये अदर पुनावाला यांनी ५० टक्के भागीदारी विकत घेतली आहे. अदर पुनावाला आणि धर्मा प्रोडक्शनमधील ही डील १००० कोटी रुपयांना केल्याची माहिती मिळत आहे. रॉयटर्सच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
 
अदर पुनावाला यांचं सिरीन प्रोडक्शन हे प्रोडक्शन हाऊस असून याच प्रोडक्शन हाऊसने धर्मा प्रोडक्शन आणि धर्माटिक एंटरटेनमेंट मध्ये १ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. सेरेन प्रोडक्शनच्या निवेदनात लिहिले आहे की, धर्मा प्रोडक्शनचं मूल्य दोन हजार कोटी रुपये आहे. त्यापैकी ५० टक्के अदर पुनावाला यांनी शेअर्स घेतले आहेत.
 
दरम्यान, या संदर्भात पुनावाला म्हणाले की, “आम्ही धर्मा प्रोडक्शनची उभारणी व विकास करू आणि आगामी वर्षांत आणखी उंची गाठू अशी आशा आहे.” दरम्यान, उर्वरित ५० टक्के मालकी कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या करण जोहर यांच्याकडेच राहील. “ही भागीदारी म्हणजे जागतिक मनोरंजनाचे भविष्य पाहताना आपल्या मूल्यांचा अन् परंपरांचा सन्मान करण्यासारखे आहे,” असं धर्मा प्रोडक्शनचे अपूर्व मेहता म्हणाले. ते करण जोहरसह या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत.
 
करण जोहरच्या नेतृत्वाखाली धर्मा प्रॉडक्शनची स्थापना वडील आणि चित्रपट निर्माते यश जोहर यांनी १९७६ मध्ये केली. पूर्वी मालकी संरचनेत ९०.७ टक्के करण जोहर आणि ९.२४ टक्के त्यांची आई हिरू जोहर यांचा समावेश होता. आताही पुनावाला यांनी हातमिळवणी केली असली तरी करण जोहरच कंपनीचा सीईओ म्हणून काम करेल तर अपूर्व मेहता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील.