६४ वर्षांनंतर पाकिस्तानातील हिंदू मंदिराचा होणार जीर्णोद्धार

21 Oct 2024 16:23:18

Hindu Temple in Pakistan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hindu Temple in Pakistan)
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका हिंदू मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल एक कोटी पाकिस्तानी रूपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ६४ वर्षांनंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा पहिला टप्पा सुरू होणार असल्याची माहिती आहे. 'डॉन न्यूज' नामक एका वृत्तवाहिनीद्वारा याबाबत सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील मंदिरांवर देखरेख करणारी संघीय संस्था इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ETPB) ने पश्चिमेकडील नारोवाल शहरातील जफरवाल नगरमधील बाओली साहिब मंदिर ताब्यात घेतले आहे. सध्या नारोवाल जिल्ह्यात एकही हिंदू मंदिर नाही, त्यामुळे हिंदू समुदायाला घरी धार्मिक विधी करावे लागतात किंवा त्यासाठी सियालकोट आणि लाहोरमधील मंदिरांमध्ये जावे लागते.

हे वाचलंत का? : श्रीरामजन्मभूमी प्रकरणी CJI डी.वाय.चंद्रचूड यांचे महत्त्वाचे विधान

पाक धर्मस्थान समितीचे माजी अध्यक्ष रतन लाल आर्य म्हणाले की, बाओली साहिब मंदिरावर ईटीपीबीच्या नियंत्रणामुळे ते मोडकळीस आले आणि नारोवालमधील १,४५३ हून अधिक हिंदूंना त्यांच्या प्रार्थनास्थळापासून वंचित राहावे लागले. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर नारोवाल जिल्ह्यात 45 मंदिरे होती, परंतु ती सर्व दुरुस्तीअभावी मोडकळीस आली. पाक धर्मस्थान समिती गेल्या २० वर्षांपासून बाओली साहिब मंदिराच्या नूतनीकरणासाठी वकिली करत आहे. हिंदू समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने मंदिराच्या दुरुस्तीसाठी पावले उचलली आहेत.

या दुरुस्तीच्या प्रयत्नात सर्वोच्च न्यायालयाच्या 'वन मॅन कमिशन'चे अध्यक्ष शोएब सिद्दल आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य मंजूर मसीह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाक धर्मस्थान समितीचे अध्यक्ष सावन चंद म्हणाले की बाओली साहिब मंदिराच्या नूतनीकरणामुळे हिंदू समुदायाची दीर्घकाळची मागणी पूर्ण होईल आणि त्यांना पूजास्थळी धार्मिक विधी करण्याची परवानगी मिळेल.
Powered By Sangraha 9.0