श्रीरामजन्मभूमी प्रकरणी CJI डी.वाय.चंद्रचूड यांचे महत्त्वाचे विधान

21 Oct 2024 15:59:03

CJI DY Chandrachud on Ram Mandir

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (CJI DY Chandrachud on Ram Mandir)
श्रीराम जन्मभूमीच्या वादाचा तोडगा परमेश्वरानेच काढला असून देवाच्या कृपेने हा वाद मिटवणे शक्य झाल्याचे भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटले आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील त्यांच्या कन्हेरसर या मूळ गावी एका कार्यक्रमात ग्रामस्थांना संबोधताना चंद्रचूड यांनी रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाशी संबंधित त्यांचे अनुभव सांगितले.
सरन्यायाधीश चंद्रचूड उपस्थितांना संबोधत म्हणाले, की अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीचा वाद माझ्यासमोर तीन महिने चालला होता आणि तो अतिशय संवेदनशील विषय होता. मी देवासमोर बसलो आणि या वादावर तोडगा काढण्यासाठी त्याला प्रार्थना केली. या ऐतिहासिक खटल्याचा निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा भाग असलेले सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यावेळच्या अडचणींचा उल्लेख करताना सांगितले की, हा खटला अत्यंत गुंतागुंतीचा होता, परंतु तो विश्वास आणि समर्पणाने सोडवला गेला.

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी श्रीरामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर ऐतिहासिक निकाल दिला. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा केला. याच निर्णयात न्यायालयाने अयोध्येत पर्यायी पाच एकर जागेवर मशीद बांधण्याचे आदेशही दिले आहेत. हे प्रकरण शतकाहून अधिक काळ वादाच्या भोवऱ्यात अडकले होते आणि या निर्णयाने शेवटी तोडगा काढला. सरन्यायाधीश चंद्रचूड हे देखील या महत्त्वपूर्ण खंडपीठाचा एक भाग होते.

Powered By Sangraha 9.0