बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे ‘आर्ट कार्निवलचे' आयोजन

    21-Oct-2024
Total Views |

Art carnival  
 
मुंबई : वांद्रे येथील बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे ‘आर्ट कार्निवल’ या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. नामांकित चित्रकरांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ आणि मुंबईतील कलाप्रेमींना सुंदर चित्रे पाहण्याची संधी उपलब्ध करून देणे हे या ‘आर्ट कार्निवलचे’ उद्दिष्ट आहे. या प्रदर्शनात देशभरातील ३५ कलाकारांच्या ९० प्रभावी कलाकृती आहेत, ज्यात रसिकांसाठी जलरंग, ऍक्रेलिक, तैलरंग आणि इतर माध्यम वापरून साकारण्यात आणलेल्या ऍबस्ट्रॅक्ट पासून ते हायपर रिॲलिस्टिक शैलीतील विविध चित्रकृतींचे अनोखे मिश्रण आहे. १८ ऑक्टोबर पासून सुरू झालेले हे प्रदर्शन २४ ऑक्टोबर पर्यंत ११ ते ७ या वेळेत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
 
या वर्षीच्या या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे जाहिरात उद्योगातील तज्ज्ञ श्री. नरेंद्र लिंदाईत यांचे पदार्पण, जे प्रथमच कला प्रदर्शनाच्या दुनियेत पाऊल टाकत आहेत. 'द फ्लेम्स ऑफ लाइफ' आणि 'ल्युमिनस टाइड्स' या त्यांच्या अमूर्त कलाकृतींच्या जोडीने मानवी भावना आणि जीवनाच्या तालांचे सौंदर्य दृश्यमानपणे चित्रित केले आहे. या प्रदर्शनात त्यांना मिळणारी सर्व कमाई मुंबईतील स्वयंसेवी संस्थेला दान केली जाणार आहे.