कृषिसंपन्नता

20 Oct 2024 22:12:25
union minister shivraj singh chauhan
 

दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या रब्बी राष्ट्रीय कृषी परिषदेमध्ये, देशातील कृषिमालाचे उत्पादन 341.55 दशलक्ष टन एवढे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली. तसेच देशातील अनेक भागांतील शेतकर्‍यांचे उत्पन्नदेखील निव्वळ दुप्पटीने नव्हे, तर तिप्पट-चौपट वाढले असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले. भारताची अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान आहे. भारतातील या क्षेत्राचे आकारमानदेखील विस्तृत असेच आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांत कृषिक्षेत्राच्या वाढीसाठी अपेक्षित असणारे बदल न केल्याने एवढे मोठे क्षेत्र अर्थव्यवस्थेत हवे तसे योगदान देऊ शकत नव्हते. एक काळ तर भारतीय अर्थव्यवस्था ही निव्वळ सेवाक्षेत्राच्या कामगिरीवर विसंबून होती. मात्र, आता कृषिक्षेत्राचे योगदानही भारताच्या अर्थव्यवस्थेत वाढीस लागले आहे. शेतीच्या विकासासाठी सरकारी नीतींमध्ये आवश्यक असणारा धोरणात्मक बदल सरकारी पातळीवर करण्यास, सातत्याने उदासीनता दाखवल्याने, भारतीय अर्थव्यवस्थेत 1970 सालापासून 43 टक्के योगदान असणारे कृषिक्षेत्र अगदी 15 टक्क्यांपर्यंत रोडावले. त्यानंतरच्या संपुआ सरकारच्या काळात तर, ते अधिक कमी होऊन अगदी 13 ते 13.5 टक्क्यांपर्यंतच राहिले. तर 2023 मध्ये तो पुन्हा 18. 2 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. 2014 नंतर आधुनिक तंत्रज्ञान, क्रयशक्ती, विपणन, तसेच लहान शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेत, सुरु केलेली ‘शेतकरी सन्मान योजना’ असो, यामुळे देशातील फार मोठे क्षेत्र लागवडीखाली आणण्यास रालोआ सरकारला यश आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुणदेखील आता शेतीकडे वळत आहेत. तसेच शेती आता नुसती पिके घेण्यापुरती मर्यादित राहिली नसून, शेतीला परस्परपूरक व्यवसायातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या देशात सहा हजारांवर कृषी आधारित स्टार्टअप असून त्यांच्या नवोन्मषामुळे शेतीचा शाश्वत विकास दृष्टिक्षेपात आला आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या राष्ट्रीय परिषदेतील विश्वास हा याच कामगिरीचा परिपाक आहे. केंद्र सरकारने यावर्षीच्या हंगामात हमीभावामध्ये 100 ते 550 रुपयांपर्यंतची वाढ करतानाच, दुसरीकडे शेतकर्‍यांना थेट मंडईशी जोडण्याचे प्रयत्नही सरकारकडून केले जात आहेत. त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था खर्‍या अर्थाने कृषिप्रधान होताना दिसत आहे.

‘कर’लक्ष्मी

गेल्या दशकभरात करदात्यांच्या संख्येत 86 टक्के वाढ झाल्याचे आयकर विभागाकडून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर देशाच्या तिजोरीत कररुपाने येणार्‍या महसुलामध्येही 182 टक्क्यांची वाढ पहायला मिळाल्याचे विभागाने म्हटले आहे. करदात्यांची संख्येत वाढ होणे ही देशाची अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक चांगले लक्षण आहे. मुळातच करदात्यांच्या संख्येबरोबर करसंकलनही वाढणे हे सरकारवरच्या नागरिकांच्या विश्वासाचेच द्योतक. मुळातच कर घेणे हा सरकारचा अधिकार आहे. मात्र, तो घेताना सर्वसमावेशक बाबी डोळ्यांसमोर ठेवूनच करआकारणी करण्याची जबाबदारीही सरकारची आहे. कराचे भरमसाठ ओझे वाहत असताना, आपला पैसा भ्रष्टाचाराच्या नावाने काही राजकीय नेत्यांच्या खिशात जात असेल, अशावेळी सहाजिकच करचोरी वाढीस लागते. मात्र, रालोआ सरकारच्या काळातील वाढत्या करसंकलनाचे वाढते आकडे, सरकारच्या पारदर्शक कारभाराचे प्रतिबिंब अधिक सुस्पष्ट करतात. एकीकडे सरकारकडील प्रत्यक्ष करसंकलन वाढत असताना, दुसरीकडे वस्तू आणि सेवाकरासारखे अप्रत्यक्ष करही केंद्र तसेच राज्याला अधिक महसुल मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलत आहेत. त्यामुळे एका गोष्टीकडे ध्यानाकर्षण करणे अनिवार्य ठरते; ते म्हणजे लोकांचे वाढलेले उत्पन्न! प्रत्यक्ष कराबरोबरच अप्रत्यक्ष करामध्ये होणारी वृद्धी ही देशातील नागरिकांच्या वाढलेल्या क्रयशक्तीचेही द्योतक आहे. सरकारच्या विविध सवलती, लघु कर्ज तसेच व्यवसायसुलभतेच्या पारदर्शी पद्धतीने राबवलेल्या योजना यांमुळे आज देशातील जवळपास प्रत्येक नागरिक बहुपर्यायी उत्पन्नाचा विचार करू लागला आहे. त्यामुळे सहाजिकच नागरिकांच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसून येते. असे असले, देशात आर्थिक समावेशनाचा प्रयत्न होण्यास 2014 साल उजडावे लागले होते, हे विसरून चालणार नाही. तोपर्यंत प्रदीर्घ काळ देशातील बहुसंख्य गरीब जनतेसाठी बँक खाते हे दिवास्वप्न होते. त्यामुळेच ही जनता दीर्घकाळ देशाच्या आर्थिक विकासाच्या नकाशावर फक्त शिरगणतीसाठीच राहिली होती. त्यामुळे करसंकलन आज वाढत असले तरी, एकूण लोकसंख्येच्या ते पाच टक्केही नाही. त्यामुळे अपेक्षित विकास साध्य करण्यासाठी, निरंतर रालोआ सरकारच्याच सर्वसामावेशी आर्थिक धोरणांची देशाला नितांत गरज आहे हे निश्चित.

कौस्तुभ वीरकर 
Powered By Sangraha 9.0