रोबोट चित्रकार

    20-Oct-2024
Total Views |
robot Ai-Da's painting of alan


एखाद्या चित्रकाराने काढलेल्या चित्राचा लिलाव होणे ही जगासाठी सामान्य गोष्ट आहे. पण एका रोबोट चित्रकाराने काढलेले चित्र लवकरच लिलावात विकले जाणार आहे, ही बातमी ऐकून संपूर्ण जगाला आणि विशेष करून कलाविश्वाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

‘आय-दा’(i-Da) असे या रोबोटचे नाव आहे. 2019 साली ‘एडन मेलर’ यांच्या संकल्पनेतून व ‘इंजिनियर्ड आर्ट्स’च्या या रोबोटिक कंपनीच्या आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संगणक कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधकांच्या प्रयत्नातून एका तरुण युवतीसारखी दिसणारी, चेहर्‍यावर असलेले भाव जीवंत भासणारी ‘आय-दा’ तयार झाली. एक रोबोट तयार करणे हे संशोधकांसाठी त्यावेळी काही नवीन नव्हते. कारण, ‘आय-दा’च्या आधीही जगभरात अनेक रोबोट तयार झाले होते. ते रोबोट अनेक कामेही करत होते. पण ‘आय-दा’ निर्मितीने जगाचे लक्ष वेधून घेतले. कारण, ‘आय-दा’ ही जगातील पहिली ‘कलाकार रोबोट’ आहे. कला सादर करण्यासाठीच तिची निर्मिती केली आहे. ‘जगातील पहिले अल्ट्रा-रिअलिस्टिक ह्युमनॉइड रोबोट कलाकार’ अशा शब्दांत तिचे निर्माते ‘एडन मेलर’ यांनी तिचे वर्णन केले होते.

‘आय-दा’ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने चित्र काढू शकते, रेखाचित्र रेखाटू शकते आणि शिल्पसुद्धा तयार करू शकते. हायड्रॉलिक पद्धतीने तयार केलेले हात आणि डोळ्यांमध्ये बसवलेल्या कॅमेरांच्या मदतीने ती सहज चित्र काढू शकते आणि गेल्या काही वर्षांत तिने अनेक चित्रे काढलेलीसुद्धा आहेत. तंत्रज्ञान जगतातील हा असा पहिलाच प्रयोग असल्यामुळे ‘आय-दा’च्या निर्मात्यांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींनासुद्धा सामोरे जावे लागले. चित्र काढताना ते चुकणे किंवा पॅलेटमधील रंग कागदावर सांडणे अशा चुका तिच्याकडून होत गेल्या. पण, तिच्यामध्ये तांत्रिक बदल केले जात होते आणि त्या बदलांमुले तिच्या चित्रकलेत सुधारणा होत होती. चित्र काढण्यासोबतच ‘आय-दा’मध्ये बसवलेल्या खास फीचर्समुले ती काढलेल्या चित्रांविषयी मौखिक स्पष्टीकरण देऊ शकते आणि चित्र काढण्यामागचा उद्देशसुद्धा सांगू शकते.

एवढेच काय, तर ‘आय-दा’ काव्यसुद्धा रचू शकते, असा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. तिने काढलेल्या चित्रांचे काही ठिकाणी प्रदर्शनसुद्धा भरवण्यात आले होते. आता तर तिने काढलेल्या चित्राची थेट विक्री केली जाणार आहे. प्रसिद्ध गणितज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ ‘लन ट्युरिंग’ यांचे चित्र तिने काढले आहे. संगणकनिर्मिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात ‘लन ट्युरिंग’ यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना मानवंदना म्हणून ‘आय-दा’ने त्यांचे हे चित्र काढले आहे. ‘एआय गॉड’ असे नाव या चित्राला देण्यात आहे आहे. दि. 31 ऑक्टोबर रोजी ‘सोथेबी’ या लिलाव करणार्‍या जगप्रसिद्ध संस्थेतर्फे ‘आय-दा’ने काढलेल्या ‘एआय गॉड’ या चित्राचा लिलाव केला जाणार आहे. एका रोबोटने काढलेल्या या चित्राचा हा जगाच्या इतिहासातील पहिलाच लिलाव असल्यामुळे हे चित्र दीड ते दोन कोटींच्या किमतीत विकले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्याला अचंबित करणारे आणि मानवी बुद्धिमत्तेचे मानवाला आश्चर्य वाटावे असे अनेक शोध रोज जगाच्या पाठीवर लागत असतात. तंत्रज्ञानातील वाढत्या प्रगतीमुळे या शोधांचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आजवर फक्त मानवाशी बौद्धिक स्पर्धा करत होती. पण आता ‘आय-दा’ काढत असलेली चित्रे, त्या चित्रांचे देत असलेले स्पष्टीकरण पाहिले, तर आता ही स्पर्धा भावनिकसुद्धा असणार आहे का, असा प्रश्न अनेक ठिकाणी केला जात आहे. तूर्तास तरी या प्रश्नाचे उत्तर नाही, असेच द्यावे लागेल. कारण कितीही प्रगत झाली तरी कृत्रिम बुद्धिमत्तेला मर्यादत आहेत. पण कलाकाराच्या मेंदूला आणि मनाला त्या नाहीत. ‘आय-दा’सारखे रोबोट त्यांच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या फीचर्सचा वापर करून चित्र काढू शकतात.

पण एखाद्या मनस्वी चित्रकाराप्रमाणे मनातील भावना त्यात उतरवणे किंवा लहरीवृत्तीने एखादा बदल त्या चित्रात करणे त्यांना शक्य नाही. जगप्रसिद्ध चित्रकार ‘लिओनार्डो-द-विंची’ यांनी काढलेल्या मोनालिसाच्या चित्रात प्रत्येकाला वेगळे भाव दिसतात. काहींना ती गंभीर दिसते, तर काहींना ती स्मित करताना दिसते. असे एखादे एक चित्र काढणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अजूनतरी आवाक्याबाहेरचे आहे. पण तंत्रज्ञानातील प्रगती पाहाता असे काहीतरी भविष्यात होऊ शकते, ही शक्यता नाकारूनही चालणार नाही.

दिपाली कानसे