स्टीकवाली चिमणी...

20 Oct 2024 21:38:12
indian hockey teams ready to upcoming olympic


कोणत्याही क्षेत्रात सातत्याला अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. हेच सतत्य राखण्यासाठी देशातील महिला व पुरुष संघाचा समावेश असणार्‍या अनेक हॉकी स्पर्धांचे आयोजन देशात होत असून, 2028 च्या ऑलिम्पिक आधी यामुळे भारतीय खेळाडूंना सातत्य राखण्यात मदत होणार आहे. या स्पर्धांचा घेतलेला हा आढावा.

कशातही मध्येच खंड पडला की कितीही नाही म्हटले तरी, सातत्याला बाधा ही येतेच. त्यामुळे विजयाची मालिकाही खंडित होण्याची दाट शक्यता असते. भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाला, त्या बाधेपासून दूर ठेवण्याचा भारतीय हॉकी संघटनेने चंग बांधलेला दिसत आहे. टोकियो 2020 आणि पॅरिस 2024 अशा लागोपाठ झालेल्या ऑलिम्पिकमध्ये, कांस्य पदक मुलांनी मिळवून दाखवले. आता साल 2028 मध्ये, लॉस एन्जलेस ऑलिम्पिकमध्येही पहिल्या तीन क्रमांकात रहायचे, असे त्यांनी ठरवलेले दिसत आहे. भारतीय हॉकीच्या मुली मात्र, 2024 सालच्या ऑलिम्पिकपासून वंचित राहिल्या असून, त्यांना अजून चार वर्षांची वाट बघायला लागणार आहे.

हॉकीचा इफोरिया : जर्मनीविरुद्ध हॉकीच्या दोन सामन्यांची मालिका खेळण्यासाठी, बंगळुरुमध्ये दि. 1 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान, 40 जणांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. पॅरिस 2024 ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत भारत-जर्मनी यांच्यातील सामन्यात, सध्याच्या विश्वविजेत्याकडून भारताने 3-2 असा पराभव स्वीकारला होता. दि. 23 ऑक्टोबर आणि 24 ऑक्टोबरला त्याच विश्वविजेत्या जर्मनीविरुद्ध भारताचे सामने, दिल्लीतील मेजर ध्यानचंद क्रीडागारात होणार आहेत. या स्पर्धेचे शीर्षक प्रायोजकत्व, ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या ‘पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन’ (पीएफसी) यांनी स्वीकारलेले आहे. दुपारी 3 वाजल्यापासून हे सामने ‘डीडी स्पोर्ट्स’वर प्रसारित केले जातील. पी. आर. श्रीजेशनंतर नवीन गोलरक्षकांची ती खरी कसोटी असेल. सध्या इंग्रजीत म्हणतात तसा हॉकीचा इफोरिया (Euphoria) म्हणजेच, उत्फुल्लता, हॉकीबद्दलची आवड, जवळीक वाढताना दिसत आहे. पॅरिसला आपण पदक मिळवून आलो आहोत, आशियाई चषक आपण जिंकला आहे, हॉकीपटूंना लोक आता नावानिशी ओळखू लागली आहेत, अशा या हॉकीमय वातावरणात भारत कशी कामगिरी करतोय याकडे आता सगळे डोळे लावून बसणार आहेत.

हॉकी इंडिया लीगचे पुनरागमन : दरम्यान आता हॉकी इंडिया लीगचेही पुनरागमन झाले आहे. पहिल्यांदा 2013 ते 2017 अशी पाच वर्षे हॉकी इंडिया लीग चालली होती. राष्ट्रीय स्तरावरील मुले आणि मुलींसाठी एकाच वेळेस खेळवली जाणारी यावेळची ही भारतातील पहिलीच लीग असेल. अशी लीग काही आठवड्यांपूर्वी दिल्लीमध्ये क्रिकेट प्रिमिअर लीगमध्ये झाली होती. परंतु, राष्ट्रीय स्तरावरील हॉकी इंडिया लीग ही मुलामुलींसाठी एकाच वेळेस होणारी पहिलीच लीग असणार आहे. एकदम सात-आठ ठिकाणी लीग खेळवली गेली तर संघ मालकांवर एकदम ताण पडू नये म्हणून, मुलांची लीग राऊरकेला येथे, तर मुलींची लीग रांची येथे आयोजित करण्यात आली आहे.

सात वर्षांच्या खंडानंतर डिसेंबर महिन्यात आता एच. आय. एल. ही नव्या स्वरुपात दिसणार आहे. त्यासाठीही खेळाडूंचे लिलाव नुकतेच दिल्लीत रंगले होते. पुरुषांचे आठ संघ, तर सहा संघ महिलांचे त्यात सहभागी होत आहेत. दि. 28 डिसेंबरपासून दि. 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत, राऊरकेला आणि रांचीमध्ये ही एच. आय. एल. अर्थात हॉकी इंडिया लीग रंगणार आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात क्रिकेट एवढेच, हॉकीचेही वातावरण तयार होत आहे. भारतीय हॉकीचा आलेख चढता ठेवण्यासाठी ‘भारतीय हॉकी संघटना’ही पुढे सरसावत आहे.

पुन्हा सरपंच आघाडीवर : जागतिक क्रीडाक्षेत्रात क्रिकेटच्या टी-ट्वेंटी स्पर्धांसाठी आयोजित करण्यात येणारी, इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय. पी. एल. ही जगात सर्वांत धनाढ्य व प्रसिद्ध म्हणून ओळखली जाते. पुढील महिन्यात त्या स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंना आपल्या संघात घेण्यासाठी, बहुप्रतीक्षित लिलाव रंगणार आहेत. त्या लिलावातल्या बोलींचे आकडे, बाकीच्या लिलावांच्या तुलनेत डोळे दिपवतील असे असतात. क्रिकेटशी तुलना केली नाही, तर हॉकीचा स्वतंत्र विचार करता, ही लीग महत्त्वाची आहे. जगभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावण्याची, त्यांच्या विचार करण्याच्या आणि खेळण्याच्या पद्धतीतील सूक्ष्म फरक पाहण्याची, या खेळाडूंच्या चांगल्या आत्मसात करण्याची ही तरुणांसाठी एक नामी संधी आहे.
एच. आय. एल.साठी खेळाडूंचा लिलाव, दि. 13 ऑक्टोबर ते दि. 15 ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडला आहे. प्रत्येक फ्रँचायझी 24 खेळाडूंचा संघ तयार करत आहेत. यामध्ये किमान 16 भारतीय खेळाडू असतील, चार कनिष्ठ खेळाडूंचा समावेश अनिवार्य असेल आणि आठ आंतरराष्ट्रीय तारे. लिलावात प्रत्येकी दोन, पाच आणि दहा लाख या मूळ किमतीसह, खेळाडूंना विभागण्यात आले आहे. पुरुषांमध्ये भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरपंच हरमनप्रीत सिंगवर 48 लाख रुपयांची बोली लावून, त्याला ‘सूरमा हॉकी क्लब’ने आपल्या संघात दाखल करुन घेतले आहे. तर मुलींमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची बचावपटू उदिता हिने अनेक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय हॉकी स्टार्सना मागे टाकत ’श्राची राह बंगाल टायगर्स’ची वाट धरली आहे. ’श्राची राह बंगाल टायगर्स’ने 32 लाखांमध्ये तिला लिलावात सर्वाधिक रकमेला संघात घेतले आहे. पुरुष आणि महिला एच. आय. एल. एकाचवेळी खेळल्या जातील, जे इतर कोणत्याही खेळात यापूर्वी घडले असेल, असे मला वाटत नाही. हॉकी इंडियाने नेहमीच हे सुनिश्चित केले आहे की, पुरुष आणि महिला दोन्ही संघांना समान वागणूक दिली जाईल. उदाहरणार्थ, जेव्हा पुरुष आणि महिला संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर सामने किंवा स्पर्धा जिंकतात, तेव्हा बक्षिसाची रक्कम दोघांसाठी समान असते. हे हॉकी इंडियाच्या क्रीडा क्षेत्रातील लैंगिक समानतेला चालना देण्याच्या समर्पणाबद्दल खूप काही सांगते. एक खेळाडू म्हणून, महिला खेळाडूंच्या योगदानाला त्यांच्या पुरुष खेळाडूंइतकेच महत्त्व देणार्‍या संस्थेचा भाग बनणे महत्वाचे वाटते.

चिमण्या मैदानात:

खेलो इंडिया - पॅरा गेम्स सन 2022 मध्ये आयोजित करण्यात आले होत्या. त्यात अर्थातच हॉकीचा समावेश नव्हता. तसे असले, तरी त्या स्पर्धांच्या शुभंकरचे अनावरण करण्यासाठीच्या समारंभात, भारतीय महिला हॉकी संघाची तेव्हा नुकतीच निवृत्त झालेली राणी रामपालदेखील होती. त्या स्पर्धांचा अधिकृत शुभंकर म्हणून, ’उज्ज्वला-एक चिमणी’चे अनावरण करण्यात आले होते. ती छोटी चिमणी दिल्लीच्या अभिमानाचे प्रतीक ठरली होती. त्या उज्ज्वलाने तेव्हा आठवण करून दिली होती की, शक्ती अनेक रूपांत येते आणि मानवी चैतन्य अतूट आहे.

उज्ज्वला पाठोपाठ आता गुडिया : उज्ज्वला चिमणी स्टिकने खेळू शकली नव्हती, पण आता ती उणीव गुडिया नावाची एक चिमणी भरुन काढणार आहे.

बालपणापासूनच आपल्याला चिमण्या आवडतात. भारतभर विविध प्रकारच्या, रंगांच्या चिमण्या आपल्याला आढळतात. तासाला 32 ते 48 किलोमीटर वेगाने भुर्रर्र उडणार्‍या, या चिमण्यांचे दर्शन मात्र आज दुर्लभ होत चालले आहे. तसे म्हटले तर, चिमणीला माणसांची गरज नसते, तर माणसाला तिची गरज असते. तरीदेखील आपण तिचा रहिवास अवघड करुन आपलेच नुकसान करुन घेतले आहे.

खेलो इंडिया - पॅरा गेम्समध्ये उज्ज्वलाच्या स्वागताला अनेक मान्यवरांप्रमाणेच, भारतीय हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपालच्या हातात तेव्हा हॉकी स्टिक नव्हती. कारण पॅरा खेळाडूंच्या क्रीडाप्रकारात हॉकीचा समावेश नव्हता. पण या शुभंकरच्या उद्घाटनाला मुलांबरोबर मुलीदेखील होत्या.

उज्ज्वला आणि नंतरची गुडिया, या दोन्ही चिमण्या भारतीय क्रीडाविश्वात शुभंकर बनून त्यांना प्रेरित करत आहेत. भारतातील बिहारसारख्या हिंदी भाषिक पट्ट्यातील लोकांमध्ये, वापरला जाणारा प्रेमाचा ‘गुडिया’ हा शब्द सर्व वयोगटातील महिलांचा जिव्हाळा दर्शवतो. ‘हाऊस स्पॅरो’ या लुप्तप्राय होत असलेल्या पक्ष्याप्रति जनतेचा जिव्हाळा परत वाढवण्यासाठी, त्या चिमणीला क्रीडाक्षेत्रात ‘शुभंकर’ म्हणून निवडण्याचे बिहारच्या सरकारने ठरवले आहे. त्या शुभंकर चिऊताईला ’गुडिया’ या नावाने संबोधले जात आहे. पाटण्याला दि. 5 ऑक्टोबर रोजी, बिहारच्या मुख्यमंत्री निवासस्थानी एका समारंभात, महिला आशियाई हॉकी विजेत्याला देण्यात येणार्‍या चषकाच्या अधिकृत प्रतीक चिन्हाचे (लोगोचे) आणि ’गुडिया’ या आकर्षक ’शुभंकर’चे अनावरण करण्यात आले होते. भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार सलीमा टेटे आणि उपकर्णधार नवनीत कौर या समारंभाला उपस्थित होत्या. राजगीर हे बिहारमधील एक ऐतिहासिक शहर, आशियातील हॉकीला पॉवरहाऊस बनवण्यास सज्ज होत आहे. दि. 11 नोव्हेंबर ते दि. 20 नोव्हेंबर या कालावधीत, महाद्वीपीय वैभवासाठी हॉकीच्या स्पर्धा होणार आहेत.

चिमण्यांना संरक्षण : क्रीडा आणि वारसा यांचे मिश्रण असलेले प्रतीक चिन्ह, क्रीडा आणि महिला सक्षमीकरणासाठी बिहारची बांधिलकी दर्शविते. प्रतीक चिन्हातील चित्रात मध्यभागी बोधी वृक्ष दाखवला असून, तो बिहारच्या अध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. त्याच्या गुंफलेल्या फांद्या वाढ आणि लवचिकता दर्शवितात, हे चित्र एखाद्या खेळाडूच्या प्रवासाला प्रतिबिंबित करते. धोक्यात असलेल्या त्या चिमण्यांच्या प्रजातींचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे, त्यातून प्रकट करायचे आहे. गेल्या काही वर्षांच्या काळात, आपल्या घरात व अंगणात दाणे टिपणारी चिमणी अचानक जी भुर्रर्रकन उडून गेली आहे, ती अजूनही परत आलेली नाही. याला कारण म्हणजे आजचे शहरीकरण. ग. दि. माडगूळकरांनी त्यांच्या एका कवितेत म्हटले होते की, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे आपल्या...’ एक आई आपल्या लेकीला आजच्या जमान्यापासून सांभाळून रहायला शिकवणारे हे त्यांचे काव्य, तसेच ‘दार उघड दार उघड चिऊताई चिऊताई, दार उघड!’ हे मंगेश पाडगावकरांचे काव्य स्मरणात आले की, या चिमण्यांचे आपल्या जीवनातले स्थान आठवते.

आपला त्यांच्याबद्दल लळा, जिव्हाळा वृद्धिंगत होतो. आज आपल्यापासून आपणच दूर केलेल्या चिमणीला, आपण क्रीडा क्षेत्रातही शुभंकरच्या स्वरुपात स्थान देत आहोत. बिहारमधील समारंभात गुडिया या शुभंकरचे अनावरण करण्यात आले आहे. लहान मुलींना प्रेमाने संबोधित करण्यासाठी, सामान्यतः सर्वत्र वापरला जाणारा प्रेमाचा शब्द, गुडिया सर्व वयोगटातील महिलांशी भावनिकरित्या जुळला आहेच. हाऊस स्पॅरो एक लुप्तप्राय प्रजातीपासून प्रेरित शुभंकर बिहारचा नैसर्गिक वारसा प्रतिबिंबित करतो आणि लवचिकता, शक्तीचे प्रतीक म्हणून तो शुभंकर उभा आहे. गुडियाची धाडसी भूमिका आणि आत्मविश्वासपूर्ण अभिव्यक्ती, खेळाडूंचा दृढनिश्चय महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या भावनेला मूर्त रूप देते. शुभंकरची ही निवड, केवळ स्थानिक संस्कृतीशीच जोडली जात नाही, तर क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या सशक्तीकरणाला चॅम्पियन बनवते. धोक्यात असलेल्या प्रजातींचे संरक्षण देण्याची आज गरज आहे. त्यासाठी ही चिमणी सर्वांना तसे आवाहन करत आहे. टोकियो ऑलिम्पिक हॉकीमध्ये, भारतीय मुलींनी चमकदार कामगिरी केली होती. त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण शेवटी त्यांना पदक मिळवता आले नव्हते. त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्या मुलींच्या विजयाच्या मालिकेत तेव्हा खंड पडला. भारतीय महिला संघाला त्या बाधेपासून दूर ठेवण्याचा, भारतीय हॉकी संघटनेने आणि खुद्द या गुडियांनी चंग बांधलेला दिसत आहे.

ब्लेसिंग इन डिसगस् : (Blessing in Disguise) भारतीय महिला हॉकी संघाचे आता वेळीच डोळे उघडले आहेत, असे दिसत आहे. आपल्या मुलींना 2028 सालच्या ऑलिम्पिकचे तिकीट कसे मिळवायचे, यासाठी स्वतः मुली आणि त्यांचे प्रशिक्षक आतापासूनच सजग झाले आहेत. लहान-मोठ्या प्रत्येक स्पर्धेत कसे वागावे आणि कसे वागू नये, हे त्या शिकत आहेत. दुर्भाग्यातून काही चांगले घडते आणि त्याची अनुभूती आपल्याला कालांतराने येते, अन् आपले डोळे उघडतात. पॅरिसमध्ये पोहोचण्यात भारतीय महिला हॉकी संघ अपयशी ठरणे, हे Blessing in Disguise या एका इंग्रजी म्हणीतून आपल्या मुलींनी आता जाणून घेतले असावे, तसे नसेल तर त्यांनी वेळीच शहाणे व्हायला हवे. आपण सगळे त्यासाठी त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे असल्याचे दाखवून देऊ. असे केले तरच, भारतीय मुलींची व मुलांचीदेखील हॉकी लॉस एन्जलेसमध्ये पहिल्या तीन पदकांत नक्की दिसेल.

चला तर आपण सारे क्रीडाप्रेमी त्या चिमणीच्या इच्छेनुसार चिमण्यांना परत आपल्यात आणत, आपल्या मुलींना पुढच्या ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्याच्या कार्यात आतापासूनच प्रारंभ करु आणि भारताला पुन्हा हॉकीत अग्रेसर करु.

श्रीपाद पेंडसे  
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकी पटू आहेत)
9422031704
Powered By Sangraha 9.0