मराठीचे अभिजातपण टिकवणे महत्वाचे

    20-Oct-2024
Total Views |
classical language marathi

 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण यामुळे मराठी भाषेसमोरचे सर्व प्रश्न सुटले नाहीत. कोणतीही भाषा दीर्घकाळ टिकण्यासाठी तिचा वापर होणे, त्यात साहित्यनिर्मिती होणे महत्वाचे असते. त्यासाठी अधिकाधिक लोकांनी ती भाषा बोलणे आवश्यक असते. मराठीचे मिळालेले अभिजातपण टिकवण्यासाठीच्या उपाययोजनांचा उहापोह करणारा लेख...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, या मराठी भाषिकांच्या मागणीवर अखेर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब करत दर्जा बहाल केला. हा दर्जा बहाल करताना, केंद्रसरकार अभिजात भाषा संवर्धनासाठी दरवर्षी 500 कोटी रुपये देणार असल्याचीच चर्चा अधिक होत आहे. कोणतीही भाषा केवळ पैसा दिला म्हणजे समृद्ध होते, असे घडत नाही. त्यासाठी भाषेत उच्चतम दर्जाचे साहित्य, त्या भाषेच्या माध्यमातून होणारी शिक्षण प्रक्रिया, भाषा विकासासाठीचा विचार, चिंतन, भाषेची रोजगारनिर्मितीची क्षमताही महत्त्वाची ठरणार आहे. हा सारा प्रवास शिक्षणाच्या व्यापक प्रक्रियेतून घडत असतो. वर्तमानात मराठी भाषा माध्यमातील उत्तम दर्जाच्या शिक्षणाचा विचार केला नाही, तर भाषा विकासाची प्रक्रिया घडण्याची शक्यता नाही. भविष्याच्या दृष्टीने, भाषेच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीची क्षमता प्राप्त करून देण्यासाठी, भाषा समृद्ध व्हायला हवी. समृद्धतेचा प्रयत्न झाला नाही, तर रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेले तरुण ती भाषाच नाकारण्याची शक्यता अधिक आहे. एकीकडे भाषेच्या माध्यमातून शिक्षण घेऊन रोजगार मिळू शकला नाही, ज्ञानाची देवाणघेवाण होण्यासाठी भाषेत सक्षमता नसेल, तर भाषेपासून दूर जाण्याचा प्रवास होण्याची शक्यता अधिक आहे. वर्तमानात भाषिक संवादाची गरज अधिक आहे. अधिकाधिक भाषिक संवादाचा मार्ग अनुसरू शकलो, तर भाषा गतिमान होण्यास मदत होत असते.

आज दुर्दैवाने आपल्या भाषेची अस्मिता जोपासण्याचा प्रयत्न फारसा होताना दिसत नाही. दक्षिणेतील प्रांतांमध्ये भाषेविषयी जितके प्रेम आणि अस्मिता आहे, तेवढी आपण जोपासत नाही. भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी म्हटले आहे की, “आपलीच भाषा नाकारणार्‍यांच्या यादीत आपण अधिक पुढे आहोत. आपल्या भोवताली आपण निरीक्षण केले तर सहजतेने लक्षात येते की, समोरच्या व्यक्तीने जर दुसर्‍या भाषेत संवाद केला, तर आपण त्याच्या भाषेत प्रतिसाद देण्यासाठी पाऊल टाकतो. आपल्याला आपल्या भाषेतून त्यांच्याशी संवाद साधावा असे खरंच वाटत नाही का? दोन शिक्षित मराठी माणसे एकत्र आली तर, ते मराठी भाषेत बोलणार्‍यांचे प्रमाण किती? मराठी भाषेतील साहित्य वाचणार्‍यांचे प्रमाण किती? जे वाचले जाते ते केवळ परीक्षेच्या दृष्टीने वाचले जाते की, साहित्य म्हणून वाचले जाते? यांचा विचार करण्याची गरज आहे. आज मराठीत जी पुस्तके विकली जातात, त्यात केवळ माहितीसंपन्न असलेल्या पुस्तकांची संख्या अधिक आहे. मुळात आपण मराठी माध्यमातून शिक्षणविचाराची पेरणी केली, तरच ‘अभिजात’ भाषेचा समृद्ध प्रवास घडण्याची शक्यता आहे. त्यासाठी तशी पावले टाकावी लागतील. आज महानगरांबरोबर अनेक शहरी भागातही मराठी शाळा, शेवटच्या घटका मोजू लागल्या आहेत. त्या टिकवण्यासाठी आणि गुणवत्तेच्या दृष्टीने समृध्द होण्यासाठी, पावले पडायला हवीत.त्यासाठी सरकार, पालक आणि शिक्षकांनी आग्रही भूमिका घेण्याची गरज आहे.”

अभिजात भाषेच्या दृष्टीने केंद्र सरकारने जे निकष निश्चित केले आहेत, त्या निकषाची पूर्ती करण्याच्या दृष्टीने, राज्य सरकार आणि नियुक्त समितीने पुरेपूर अभ्यासपूर्वक मांडणी करत पुरावे सादर केले. आपली भाषा 1 हजार 500 ते 2 हजार 500 वर्षे जुनी आहे. भाषेने सरकारी निकष पूर्ण केले आहे. इतिहासातील समृद्ध असलेली आणि स्वयंभूपण लाभलेली भाषा म्हणून शिक्का मोर्तब झाले आहे. इतिहास उज्ज्वल होताच मात्र, भविष्याच्या भाषिक प्रगतीसाठी वर्तमानात मराठी भाषा अभ्यासक आणि मराठी भाषक यांना, अधिक काम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. भाषेसाठी सारे काही सरकारने करावे, असे म्हणून मोकळे होता येईल. पण, भाषा केवळ सरकारने आपल्या व्यवहारात उपयोगात आणली, शासन निर्णय काढले, म्हणजे ती टिकते अथवा तिचा सन्मान होतो, असे घडत नाही. मुळात भाषा ही जनमनाची भाषा व्हायला हवी. किमान आपल्याच राज्यात, आपल्याच मराठी भाषेचा प्रवास अधिक उत्तम आणि समृध्द असायला हवा. मराठी भाषेचा अभिमान वाटावा यासाठी प्रयत्न व्हायला हवा. भाषा समृद्ध करण्याचा मार्ग आणि भाषेचे संवर्धन होण्यासाठी शाळा, महाविद्यालय अधिक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आज आपल्याच राज्यात मराठी माध्यमांच्या अनेक शाळा, विद्यार्थ्यांच्या अभावी बंद पडू लागल्या आहेत. इतर माध्यमांच्या शाळांना मराठी सक्तीची केली असली, तरी अनेक शाळांमध्ये मराठी भाषा सरकारी आदेशापूर्ती शिकवली जात आहे. त्यामुळे भाषा ही प्रभावी आणि परिणामकारक शिकवली जात नाही, हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. तेथे केवळ सरकारची सक्ती म्हणून मराठी भाषा शिकवली जाते इतकेच. पालकांनादेखील आपल्या पाल्यांना, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकवावे असे वाटत नाही. मराठी भाषिक पालकांच्या पाल्यांना इंग्रजी आली नाही, तर त्याची खंत वाटते. पण, आपल्या पाल्याला उत्तम मराठी येत नाही, याची थोडीदेखील खंत वाटत नाही, ही भावना अधिक उंचावते आहे.
 
आज आपल्याच राज्यात मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या खालावत चालली आहे, हेही वास्तव आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या अधिक असली, तरी विद्यार्थ्यांची संख्या मात्र ऱोडावताना दिसत आहे.सरकारी आणि खासगी अनुदानित शाळा वगळता, उर्वरित विनाअनुदानित शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या सर्वाधिक आहे. पालकांचा ओढादेखील मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आहे. आपल्या राज्यात, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सुमारे 25 टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंग्रजी माध्यमात शिकणारे विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या सधन समूहातील आहेत, ज्यात कुटुंबात साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. जेथे दुसरी, तिसरी पिढी शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी आहेत, जेथे पुस्तके विकत घेण्याची, वाचनाची आर्थिक क्षमता आहे, तेथील विद्यार्थीच इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. इंग्रजी माध्यमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना, पुस्तके वाचनासाठी मराठी पुस्तकांऐवजी इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचनाकडे अधिक कल असणे, हे भविष्यात घडणार आहे. एका अर्थाने इंग्रजी माध्यमांतील शिक्षण फक्त शाळांवर परिणाम करत नाही, तर भविष्यातील मराठी पुस्तकांच्या वाचनापासून दूर घेऊन जाण्यास मदत करणारे ठरते. त्यामुळे आज आपल्या मराठी प्रकाशन विश्वात पुस्तकखपाचे प्रमाण किती आहे? याचा विचार करण्याची गरज आहे. एक हजार पुस्तकांची आवृत्ती संपण्यासाठीदेखील पाच-दहा वर्षे लागतात. यामागील कारणांचा विचार केला, तर ज्यांची आर्थिक क्षमता आहे, ते इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेत, आर्थिक स्तर खालावलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांना पुस्तके विकत घेऊन वाचावी, असे वाटत असले, तरी त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम नाही. म्हणून पुस्तके विकत घेऊन वाचनाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. वाचनाची वाट नसेल, तर व्यक्तिमत्त्वाला पैलू पडण्याची शक्यता नाही.

इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊन त्यांना जगाच्या माहितीचा नवा डोळा निर्माण होतो. त्यातून रोजगारासाठीची वाट निर्माण होते. आज मराठी माध्यमात शिक्षण घेऊन हाताला काम मिळत नाही, असा एक सूर मांडला जातो आहे. खरे तर, हाताला काम इंग्रजी माध्यमात शिकले म्हणून मिळते का? याचाही विचार करण्याची गरज आहे. इंग्रजी साहित्य विश्वामुळे बालकांना आकाश अधिक खुले होते. त्यातून त्याची दृष्टी विशाल होते. त्यामुळे जगाच्या सीमा एकप्रकारे गळून पडतात. त्यातून नवनवीन ज्ञानाच्या दिशा खुणावू लागतात. त्यामुळे नवनवीन क्षेत्रात झेप घेण्याची दृष्टी मिळते. त्यामुळे हाताला काम प्राप्त करून देण्याची क्षमता इंग्रजी भाषेत आहे की, इंग्रजी भाषेत असलेल्या माहिती आणि नवसंशोधनात आहे, याचा विचार करायला हवा. आज जगभरातील विविध क्षेत्रांचा विचार केला, तर प्रत्येक क्षेत्रातील संशोधन, तंत्रज्ञानातील बदल, विविध व्यवसाय संदर्भातील माहिती इंग्रजी भाषेत सहजतेने मिळते. त्यामुळे आपल्या भाषेत, जगातील ज्ञान आणण्यासाठीचा प्रयत्न होण्याची गरज आहे. रोजगार हा ज्ञानसाधनेने मिळत असतो. ती साधना जगातील ज्ञान आपल्या भाषेत आल्याशिवाय घडणार नाही. त्यामुळे अभिजात भाषेच्या प्रवासासोबत आपली भाषा ज्ञानभाषा बनण्यासाठीचा प्रयत्न करावा लागणार आहे. मातृभाषेतून शिक्षण झाले, तरच साहित्याचा प्रवासदेखील उत्तम होईल. साहित्य उत्तम दर्जाचे निर्माण झाले, तर भाषेला प्रतिष्ठा आणि जगभरात स्थान निर्माण होण्याची शक्यता उंचावते.
 
जनमनाच्या भाषेसाठी जनतेच्या वेदनांबरोबर आनंदाचा विचार महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने भाषेत उत्तम दर्जाचे साहित्य निर्मितीचा विचार, समाजमनातूनच मांडला जाण्याची गरज असते. भाषेतून अभिजात दर्जाच्या साहित्यासाठी, आपल्याला स्वातंत्र्याचा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो. साहित्यिकाला समाज व राजकर्त्यांनी स्वातंत्र्य दिले, तरच साहित्याचा उत्तम प्रवास होण्याची शक्यता असते. आज आपल्या अस्मिता अधिक टोकदार बनत चालल्या आहेत. धर्म, जात, पंथ, परंपरेत वाईट काही घडत असेल, तर त्या विरोधात बोलण्याची हिंमत कोणी दाखवता कामा नये. आपण म्हणू तो धर्म असा विचार केला जाऊ लागला, तर विवेकी, शहाणपणाच्या दिशेने मांडणी करण्यास कोणीच पुढे धजावणार नाही. साहित्यासाठीच्या वाटा स्वातंत्र्याच्या नसतील, तर उत्तम साहित्याची निपज कशी होणार? साहित्य उत्तम नसेल, दिशादर्शन करणारे नसेल, विवेकाची वाट दाखवणारे नसेल, तर ते वाचले जाण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे साहित्य प्रवासात समाज, राज्यकर्ते म्हणून जितके स्वातंत्र्य अधिक असेल, तितक्या मोठ्या प्रमाणावर दर्जेदार साहित्य निर्माण होईल. इतिहासात निर्माण झालेल्या साहित्याचा विचार केला, तर अनेक समीक्षा, नाट्य, कथा, कादंबरीमध्ये स्वातंत्र्याची वाट चालणे घडलेले आहे. त्यामुळे त्या साहित्यांची प्रेरणा घेऊन आपलाही स्वातंत्र्याचा लढा लढला गेला आहे.स्वातंत्र्याच्या चळवळीत उत्तम दर्जाच्या साहित्यानेच, माणसांची मस्तके निर्माण करण्याची काम केले.त्यावेळी त्यांनी ज्या वाटा चालणे पसंत केले, त्या वाटा वर्तमानात चालण्याची गरज आहे.

अन्यथा आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही, अभिजात दर्जाचे साहित्य निर्माण झाले नाही, तर ते वाचले जाण्याची शक्यता नाही. प्रत्येक गोष्टीचा निर्भळ आनंद घेता आला पाहिजे. त्यादृष्टीने साहित्याचा विचार केला जाण्याची गरज आहे. मराठी भाषेचा विचार करता किती प्रमाणात आंतरराष्ट्रीय साहित्यविषयक पुरस्कार मिळाले आहेत? किती ज्ञानपीठ मिळाले आहेत? बंगाली वगळता ‘नोबेल’पर्यंत आपली साहित्य परंपरा पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे जगभरातील साहित्याचा विचार करून, उत्तम साहित्यनिर्मितीसाठी आपल्याला विचाराची माती अधिक कसदार करावी लागणार आहे. आज मराठी भाषेत वाचन करणार्‍या वाचकांचे प्रमाण किती आहे? तर साधारण सहा टक्के इतके आहे. अर्थात मराठीत जे साहित्य वाचले जाते, ते अधिकाधिक माहितीसंपन्न स्वरूपाचेच वाचले जाते. अनुवादित साहित्याला काही प्रमाणात वाचक आहेत. 13 कोटींच्या मराठी भाषिकांसाठी असलेल्या वाड्मयीन व्यवहारात पुस्तके विक्रीचे प्रमाण किती आहे? याचाही विचार करायची गरज आहे. इंग्रजी भाषेत शिक्षण झालेले विद्यार्थी इंग्रजी साहित्य वाचतात. भविष्याची झेप घेण्यासाठीचे अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत असतील, तर त्यांचे शिक्षण इंग्रजीतच होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारचे अभ्यासक्रम, मराठी भाषेत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. पालकांच्या दृष्टिकोनात बदल घडवण्याचे शिवधनुष्य पेलावेच लागणार आहे. मराठी भाषेला केवळ शासकीय स्तरावर नव्हे, तर समाजाच्या मनामनांत प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचेही काम करावे लागणार आहे. त्यासाठी आजच पेरणीचा विचार केला, तर भाषेचे ‘अभिजातत्व’ भविष्यातही अधोरेखित होईल. तो प्रवास घडण्यासाठी मराठी भाषेतील शिक्षणाचा विचार करण्याची गरज आहे.

संदीप वाकचौरे