धारावीकरांचा उपयोग करून मुंबईत ‘व्होट जिहाद’

20 Oct 2024 19:28:55
 
ashish shelar
 
 
मुंबई: ( Ashish Shelar ) “शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार उबाठा सेनेची लढाई ही अदानीसाठी आहे. आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबईत ‘व्होट जिहाद’ केला जातोय,” असा गंभीर आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी शनिवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
 
धारावीबाबत आ. शेलार यांनी मुंबई भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांना थेट सवाल केले. “कोणीही विचारले नसताना आपले पिताश्री वारंवार सांगतात, हा मर्दांचा पक्ष आहे. म्हणून जर तुम्ही मर्दांचा पक्ष असाल, तर खुल्या चर्चेला या. तुम्ही सांगाल तिथे चर्चेला यायला मी तयार आहे,” असे ते म्हणाले. “आदित्य ठाकरे यांना उत्तरे देता येत नाहीत, म्हणून आमच्या वर्षाताई गायकवाड यांना पुढे करून अडचणीत आणू नका,” असेही अ‍ॅड. शेलार म्हणाले.
 
“आपल्याच परिवारातील प्राणीमित्र युवकासाठी धारावीतील नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड बळकवण्याचा प्रयत्न उद्धवजींच्या पक्षाकडून होतोय. त्यासाठीच धारावी पुनर्विकासाला विरोध केला जातोय,” असा पुनरुच्चार आशिष शेलार यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, “फेक नरॅटिव्ह रोखणे माझे काम आणि मुंबईकरांच्या हितासाठी बोलणे माझे कर्तव्य आहे. आता राष्ट्रीय पक्षांचे काही नेते पण शहरी नक्षलवाद्यांचे अजेंडा मांडू लागलेत. म्हणून पळ काढणार्‍या आदित्य ठाकरे यांना खुले आव्हान हिंमत असेल तर चर्चेला या, अन्यथा निर्बुध्द म्हणून तुम्हाला दिलेली पदवी खरी ठरेल.”
 
“अदानीला अधिकचा एफएसआय दिला असे खोटे पसरवले जाते आहे. पुनर्विकासाच्या प्रचलीत नियमापेक्षा एक इंचही अधिकचा एफएसआय धारावीसाठी देण्यात आलेला नाही. त्यामुळे केवळ खोटे पसरवून, धारावीकरांची माथी भडकवून मते मिळवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करीत आहेत. मुंबईकरांनी सावधान झाले पाहिजे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असा जो शिक्का धारावीच्या माथी आहे, तो पुसण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत,” असे ते म्हणाले.
 
४३० एकर जागेपैकी २३० एकर जागेमध्ये मोकळया जागा, मैदान, बगीचा, मेट्रो, बस, मोनो, रेल्वे, भूयारी मेट्रोचा मल्टी कॉरिडॉर ट्रान्सपोर्ट हब येथे होणार आहे त्याला विरोध करून त्यापासून मुंबईकरांना वंचित ठेवले जातेय. या भागातून मुंबई महापालिकेला एकही रुपयांचा मालमत्ता कर,सिव्हरेज टॅक्स, दुकान लायन्सन फी मिळत नाही, हे उत्पन्न वाढवणारे तसेच रेंटल घर योजनेतून, घरांच्या विक्रीतून मुंबई महापालिकेला १५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे, त्याला विरोध केला जातोय. त्यामुळे “मुंबईकर तुम्ही तुमच्या मुलभूत अधिकारासाठी व्यक्त व्हा आणि धारावीकर हो तुम्ही तुमच्या हक्कासाठी व्यक्त व्हा,” असे आवाहन अ‍ॅड. शेलार यांनी केले.
 
विरोधकांची लढाई अदानासाठी आहे आमची लढाई गरिबांच्या घरासाठी आहे. काँग्रेसने २००० साला पूर्वीच्याच झोपडयांना संरक्षण दिले होते. भाजप सरकारने २०११ सालापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे धारावीला २०११ सालापर्यंतच्या रहिवाशांना धारावीतच घरे मिळतील. त्यानंतरची जी घरे आहेत म्हणजे ज्यांनी दोन मजले बांधले आहेत, जी अशा पुर्नविकासात पात्र ठरत नाहीत, अशा घरांनाही मुंबईतच घर मिळणार असून अशा प्रकारची घरे देणारी ही पहिली योजना असणार आहे. मग धारावीतील गरिबांना घरे मिळत असताना अदित्य ठाकरे यांचा विरोध का? असा सवाल त्यांनी केला.
 
आदित्य ठाकरेंना आव्हान
 
“आदित्य ठाकरे मराठी, मुस्लीम, दलितविरोधी आहेत काय? आदित्य ठाकरे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बेघरांना घर या भूमिकेचे विरोधक आहेत. तुम्ही एवढे अती बुद्धिमान असाल, तर मुंबई शहरात एक तरी प्रोजेक्ट दाखवा, जो तुमचे पिताश्री मुख्यमंत्री असताना वरच्या मजल्यावरच्या किंवा २०११ सालानंतरच्या झोपडपट्टीवासीयांना संरक्षित करून घर देण्याचा केला.” असे आव्हानच आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना दिले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0