कला, संस्कृती आणि बदलत्या दृष्टिकोनांचा एक अनोखा अनुभव : बॉम्बे आर्ट सोसायटीत 'आर्ट कार्निव्हल' चे आयोजन

20 Oct 2024 18:52:38

art carnival
 
 
मुंबई : ( Art Carnival )"कला आपल्याला एकाच वेळी स्वतःला शोधण्यास आणि विसर्जित करण्यास अनुमती देते." काळात विलीन झालेल्या फ्रान्सच्या सुप्रसिद्ध लेखकाचे वाक्य आज आठवते. कारण ह्याच दुहेरी अनुभवाचा आनंद लुटण्याकरिता १८ ते २४ ऑक्टोबर सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेमध्ये कलेची आवड असणाऱ्या लोकांची पावले जगभरातून मुंबईच्या वांद्रे रिक्लेमेशनच्या दिशेने वळणार आहेत.
 
'बॉम्बे आर्ट सोसायटी'तर्फे एक आठवड्याकरिता आयोजित करण्यात आलेले कला प्रदर्शन 'आर्ट कार्निवल' नामांकित चित्रकारांनी चितारलेल्या विविध अभिव्यक्तींना एक व्यासपीठ प्रदान करत आहे. आर्ट कार्निवलचा प्रमुख उद्देश स्वप्ननगरीमध्ये रुतलेले कलेबद्दलचे दृढ प्रेम तसेच ह्या शहराचे कलाप्रेमींशी असलेल्या शाश्वत संबंधांचा एक आनंदोत्सव साजरा करणे हा आहे.
 
कलात्मक उर्जेने भरलेल्या मुंबईत प्रतिभाशाली व्यक्तींना नेहमीच स्वागतार्ह स्थान मिळाले आहे. अगदी गल्लीबोळातील छोट्या स्टॉल्स पासून ते प्रसिद्ध आर्ट गॅलरी पर्यंत विस्तारित असलेला शहराचा कलात्मक सार एखाद्या झऱ्यासारखा उदंड प्रवाहित होत असतो. कलाकार आणि कलाप्रेमींना एकाच छताखाली आणत, हे प्रदर्शन शहराच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक दर्शविते.
 
बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील सांगतात की, “मुंबईसारख्या शहरात त्यांची कलाकृती सादर करणे म्हणजेच अनेक कलाकारांचे स्वप्न सत्यात उतरणे. तरीसुद्धा, प्रदर्शन क्षेत्रांसाठीचे महागडे शुल्क असंख्य प्रतिभावान व्यक्तींसाठी त्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीसाठी एक व्यासपीठ शोधण्यात आव्हाने निर्माण करते. कोणत्याही आर्थिक अडथळ्याशिवाय कलाकारांना त्यांची सर्जनशीलता मोठ्या प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करता यावी, हेच 'आर्ट कार्निव्हल' मार्फत बॉम्बे आर्ट सोसायटी संघाचे ध्येय आहे.”
 
या प्रदर्शनात देशभरातील ३५ कलाकारांच्या ९० प्रभावी कलाकृती असतील, ज्यात रसिकांसाठी जलरंग, ऍक्रेलिक, तैलरंग आणि इतर माध्यम वापरून साकारण्यात आणलेल्या ऍबस्ट्रॅक्ट पासून ते हायपर रिॲलिस्टिक शैलीतील विविध चित्रकृतींचे अनोखे मिश्रण असेल. येथील प्रदर्शित प्रत्येक चित्रकला प्रेमींना एक वेगळा दृष्टीकोन प्रदान करेल.
 
या वर्षीच्या प्रदर्शनाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे जाहिरात उद्योगातील तज्ज्ञ नरेंद्र लिंदाईत यांचे पदार्पण, जे प्रथमच कला प्रदर्शनाच्या दुनियेत पाऊल टाकत आहेत. 'द फ्लेम्स ऑफ लाइफ' आणि 'ल्युमिनस टाइड्स' या त्यांच्या अमूर्त कलाकृतींच्या जोडीने मानवी भावना आणि जीवनाच्या तालांचे सौंदर्य दृश्यमानपणे चित्रित केले आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्या कलाकृतींमधून उत्पन्न झालेली सर्व कमाई मुंबईतील स्वयंसेवी संस्थेला दान केली जाईल, ज्यामुळे समुदायाची उन्नती तसेच गरजू व्यक्तींना मोठ्या संख्येने मदत होईल.
 
बॉम्बे आर्ट सोसायटी त्यांच्या अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापन समितीच्या उल्लेखनीय योगदानातून मागील अनेक वर्षांपासून जगभरातील कलाकार आणि भारताला लाभलेल्या कलेच्या सर्वस्वाचा सन्मान करणाऱ्या व्यक्तींसाठी एक व्यासपीठ बनला आहे.
 
बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रतिष्ठित समितीत सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या रामदास फुताणे, आदरणीय कलाकार आणि अभिनेते पद्मश्री मनोज जोशी, चित्रकला शिक्षण क्षेत्रातील एक ख्यातनाम शिक्षक प्रा. प्रकाश राजेशिर्के, आणि प्रसिद्ध कला समर्थक श्रीमती. उर्मिला कनोरीया यांचा समावेश आहे.
 
कल्पनाशक्तीची सीमा ओलांडून भारताच्या कलात्मक काठाशी जोडल्या गेलेल्या आणि विचारपरिवर्तक कलाकृतींमध्ये गुंतलेल्या कलाकारांच्या अविश्वसनीय प्रतिभेचे साक्षीदार होण्याकरिता 'आर्ट कार्निवल' चे आयोजक वांद्रा रेक्लेमेशन मध्ये प्रेक्षकांचे उत्साहाने स्वागत करीत आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0