ज्येष्ठ वाचाळवीर

    02-Oct-2024
Total Views |
ubt spokesperson sanjay raut statement


"राज्याचे सरकार हे बैलबुद्धीचे असून ते चालवणारे बैलपुत्र आहेत,” असे विधान शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले. हे विधान करण्याचे कारण महाराष्ट्रातील महायुती सरकारने देशी गायीच्या संगोपन व संवर्धनासाठी ’राज्यमाता-गोमाता’ हा दर्जा दिला. आता यावर खरे म्हणजे पोटशूळ उठण्याचे काही कारण नाहीच. मात्र, प्रत्येक गोष्टीला विरोध करत बसण्याचा नवा छंदच जणू संजय राऊत यांना जडला असल्याचे हे प्रतीक आहे. मुळातच देशी गोवंशाचे संवर्धन व्हावे, संगोपन व्हावे, यासाठी सरकार काही धोरणनिश्चिती करत असेल, तर हा निर्णय कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल. देशी गायींच्या दुधाची उपयुक्तता ही जगासमोर आली आहे. तसेच देशी गायींच्या पालनाने शेतकर्‍यास होणारा लाभ हादेखील निश्चितच चांगला असेल. त्यामुळे सरकारचा हा निर्णय योग्यच म्हणता येईल असाच आहे. मात्र, तसे कौतुक करतील तर ते राऊत कसले? “आम्हीदेखील गोमातेला मानतो, याबाबत आम्हाला सरकारने सांगायची गरज नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी सरकारच्या या धोरणावरदेखील केली. आणि ही टीका करताना, सर्व सरकारातील नेत्यांना बैलदेखील म्हटले. हे असे काहीतरी बोलायचे आणि माध्यमांमध्ये चर्चेत राहण्याचे व्यसनच राऊतांना जडले असून राऊतांच्या या व्यसनाचा त्रास उभा महाराष्ट्र सहन करतो आहे. बरं, ही टीका करताना संजय राऊत यांनी सावरकर समजून घेण्याचा सल्ला सरकारमधील मंत्र्यांना दिलाही. एवढेच सावरकरांच्या विचारांवर संजय राऊत यांना समजले असतील, तर मग राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसताना त्यांना का नाही सावरकर समजावत? महायुती सरकारवर कायमच घसरणारी संजय राऊत यांची धारधार जिव्हा, सावरकरांच्या अपमानाबाबत राहुल गांधी यांच्यावर संधान का नाही करत? मुळातच स्वातंत्र्यवीरांचे विचार हे संजय राऊत यांनी समजून घेणे गरजेचे आहे. विरोधकांचे काम सरकारवर अंकुश ठेवणे हे असतेच, त्यासाठी प्रसंगी कठोर टीका हा न्यायोचित मानली गेली आहे. मात्र, सातत्याने टीकाच करणे म्हणजे चांगले विरोधक होणे, हे नवीन समीकरण संजय राऊत रूजवू पाहात आहेत. कोणाला ‘बैल’, तर कोणाला ‘बैलबुद्धी’ संबोधणे राऊत यांच्यासारख्या ज्येष्ठांना शोभत नाही. तेव्हा राऊतांनी यात स्वतःचा लांडगा होणार नाही, याची आधी काळजी घेणे आवश्यक आहे.


श्रेष्ठ वाचाळवीर


विरोधकांमध्ये सध्या वाचळवीरांची स्पर्धा भरली असून, कोण सर्वात जास्त थापेबाजी करतो हे विजेत्यांचे निकष आहेत. या स्पर्धेत अनेक स्पर्धक असूनही, इथे मात्र काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी अग्रक्रम राखून ठेवला आहे. अर्थात थाप मारण्यात राहुल गांधी यांची बरोबरी करणे कितीही स्पर्धा केली तरी इतरांना शक्य होईल, असे वाटत नाही. इतके राहुल गांधी या स्पर्धेत इतके पुढे गेले आहेत की, त्यांनी ‘श्रेष्ठ वाचाळवीर’ म्हणून बिरुदावली मिरवण्यात कसलीही शरम बाळगू नये. सध्या त्यांनी ही कला पुढे नेत, एक नवीन थाप हरियाणाच्या प्रचारसभेत मारली असून, त्यात त्यांनी भाजप आणि रा. स्व. संघाची माणसे राहुल गांधी यांच्या सभेला लपत येत असल्याचे सांगितले. वर इतके बोलून थांबतील, ते राहुल गांधी कसले? वर त्यांनी हेसुद्धा सांगितले की, “या लपलेल्या माणसांना आम्ही बरोबर ओळखतो.” मग मात्र त्यांचे चेहरे पडतात असेही पालूपद त्या थापेसरशी जोडून ते मोकळे झाले. आता राहुल गांधी यांची थाप मारण्याच्या कलेशी तर संपूर्ण भारतच परिचित आहे म्हणा. तरीही यावेळी त्यांचे कथन काही काळासाठी सत्य मानले, तर राहुल गांधी यांची भाषणे का ऐकावी, असा प्रश्न जिथे खुद्द काँग्रेसवासीयांनाच पडत आहे, तिथे बाकीचे जातीलच कशाला?  वरकडी करताना राहुल गांधी असेही म्हणाले की, “काही लोक काँग्रेसमधून भाजपकडे गेले. मात्र आज त्यांना पंतप्रधान मोदींसमोर शांत बसून राहावे लागत आहे.” मुळात देशाच्या पंतप्रधानांचे बोलणे शांतपणे ऐकण्याचा विवेक ज्यांच्याकडे होता, त्यांनीच काँग्रेस सोडली म्हणणे उचित ठरेल. कारण, श्रीलंकेच्या शिष्टमंडळाला भेट देताना, एक सामान्य खासदार असलेल्या राहुल गांधी यांच्या मातोश्रींनी पंतप्रधानांचा केलेला अपमान समुच्चय भारताने पाहिला आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाचा सन्मान राखायचा असतो हे तुम्हाला समजेल कुठून? ज्या कुटुंबाने देशाच्या राष्ट्रपतींनी अभिवादन केले नाही, संसदेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती करून देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा अपमान केला, ज्यांनी देशाच्या संसदेने काढलेले अध्यादेश पत्रकार परिषदेत फाडून संसदेचा अपमान केला, अशा गांधी घराण्याचे वंशज राहुल गांधी आज ‘मोहब्बत की दुकान’ चालवण्याची अजून एक लोणकढी थाप मारत सभा घेत आहेत.

कौैस्तुभ वीरकर