ठाण्यात दिवाळी आधीच विकासाचे फटाके

02 Oct 2024 16:00:23

thane metro
ठाणे, दि.०१ : (Thane) महायुती सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाण्यातील तीन महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मुख्य मेट्रोला जोडण्यात येणाऱ्या वर्तुळाकार मेट्रोसाठी १२ हजार ५०० कोटी, ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटीचे कर्ज तसेच केमिकल रिसर्च केंद्राला भूखंड देण्यास मान्यता, अशा महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या निर्णयामुळे ठाण्याचे रूपडे बदलणार असून दिवाळी आधीच ठाण्यात विकासाचे फटाके वाजू लागल्याची चर्चा रंगली आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ३८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात कोट्यवधींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. मागील अनेक वर्ष रखडलेल्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापूर्वी केंद्राने देखील या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
 
वाढते शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगाने सुरू आहे. मुंबई सोबतच ठाणेकरांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाण्यासाठी वर्तुळाकार मेट्रोची आखणी करण्यात आली आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा करताना मेट्रो कोचची संख्या वाढवावी असे मुख्यमंत्र्यांचे नियोजन आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे सहकार्य लाभत आहे.
 
दुसरीकडे ठाणे (टिकूजींनी वाडी) ते बोरिवली हे अंतर अवघ्या २० मिनिटात पूर्ण करणाऱ्या या मार्गाच्या कामासाठी १५ हजार कर्ज घेण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. एमएमआरडीएचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आग्रही आहेत. दरम्यान शिळफाटा येथे केमिकल रिसर्च सेंटर उभारण्यासाठी लागणारा भूखंड देण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0