कांद्याची आयात अत्यल्प

02 Oct 2024 14:37:33

onion
 
नाशिक, दि. १ : (Onion Import) देशांतर्गत बाजारपेठेमध्ये अफगाणिस्तानमधून कांदा आयात करण्यात आला आहे. यामुळे भारतीय कांद्याचे दर पडण्याची भीती कांदा उत्पादक शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, आयात करण्यात आलेल्या कांद्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने त्याचा परिणाम दर कोसळण्यावर होणार नसल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
 
केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्य रद्द आणि निर्यात शुल्क निम्म्याने घटविल्याने भारतीय बाजारपेठेत कांद्याचे दर चढायला सुरुवात झाली. त्यामुळे बाजारपेठांमध्ये कांद्याला समाधानकारक दर मिळत आहेत. याचा फायदा कांदा उत्पादक शेतकर्‍यांना झाला. परंतु, ग्राहकांना रास्त दरात कांदा मिळावा यासाठी नाफेडने आपला बफर स्टॉक बाजारात विक्रीसाठी आणला. तसेच, अफगाणिस्तानवरून कांद्याची आयात केली आहे. या आयात करण्यात आलेल्या कांद्याचे प्रमाण इतके अत्यल्प आहे की, त्यातून एका शहराची दिवसभराची गरजदेखील भागविली जाणार नसल्याचे निर्यातदारांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली होती. त्यामुळे अजूनही २५ ते ३० टक्के शेतकरी वर्गाकडे कांदा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हजारो टन कांदा विक्रीसाठी येत असल्याचे दिसून येते. या बाजारसमित्यांमध्ये साधारणपणे कांद्याला पाच हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. कांदा आयात केल्यानंतरही हे दर अजूनही टिकून आहेत. अशा स्थितीत पंजाबमधील जालंधर आणि अमृतसर या शहरांमध्ये ११ ट्रक मधून ३५० टनाच्या आसपास अफगाणिस्तानातून आयात केलेला कांदा दाखल झाला आहे.
 
दरम्यान, या आयात कांद्याच्या तुलनेत एकट्या नाशिक जिल्ह्यातून तब्बल ६० ते ७० टक्के म्हणजेच जवळपास ३५ ते ४० हजार क्विंटल आवक झालेला कांदा देशाच्या कानाकोपर्‍यात पाठवला जातो. तर अफगाणिस्तान येथून आयात केलेला कांदा अगदी किरकोळ स्वरूपात असल्याने देशांतर्गत बाजारपेठेवर याचा विपरीत परिणाम होण्याची सद्यस्थितीत शक्यता नसल्याचे दिसून येत आहे.
 
 
..तरीही दरवाढीची संधी
 
अफगाणिस्तानातून येणार्‍या कांद्यामुळे आठवडाभरात ८०० ते १ हजार रुपयांनी कांद्याच्या दरात घसरण झाली. परंतु, तरीही कांदा दरवाढीला संधी आहे. आता चाळींमध्ये शेतकर्‍यांनी थोडाफार कांदा जोखीम म्हणून ठेवला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाबरून न जाता आपला कांदा थोडाथोडा विक्री करणे योग्य राहील. नवीन लाल कांद्यालाही चांगले दर मिळतील. त्यामुळे शेतकर्‍यांनी अपरिपक्व कांदा विक्रीसाठी आणण्याची घाई करू नये.
 
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
कांदा उत्पादक शेतकरी संघटना
 
 
अफगाणचा कांदा तुलनेने बेचव
 
सध्या बाजारामध्ये अफगाणिस्तानच्या कांद्याला ३० ते ३५ रुपये किलो इतका दर मिळत आहे. तसेच, त्याचा रंग भडक लाल असून, चवीला भारतीय कांद्याच्या तुलनेत तो अगदी फिका आहे. त्यामुळे ग्राहकवर्ग त्याला फारशी पसंती देताना दिसत नाही. त्यामुळे हा कांदा बाजारपेठेत आला तरी, त्याचा भारतीय कांद्याच्या किमतीवर फारसा परिणाम होताना सध्या दिसत नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0