गाथा स्त्री शक्तीची... भगवती भक्तीची

02 Oct 2024 22:26:10
gatha stree shaktichi navratra
 
 
शारदीय नवरात्र उत्सवाची आजपासून सुरुवात होत असून, आई भगवतीच्या पराक्रमाची पूजा मांडण्याचा हा उत्सव होय! हाच मूहूर्त साधत, भक्ताला ज्ञान आणि ऐश्वर्य यांचे दान करणारी अशी ज्ञानऐश्वर्यप्रदायिनी देवीची भक्ती या काळात केली जाते. कोणतीही स्त्री ही सर्व काळात पूजनीयच असते. अनेक भक्तांनी या जगदंबेची करूणा भाकली आणि जगताच्या कल्याणाचे वरदान मागितले. त्यापैकी आद्य शंकराचार्य यांच्या श्लोकाच्या माध्यमातून भगवतीभक्तीच्या मार्गाचे केलेले अवलोकन...

दै. ‘मुंबई तरुण भारत’ या वृत्तपत्राच्या समस्त रसिक वाचकांना नमस्कार. ’ज्ञानऐश्वर्यप्रदायिनी’ या अध्यात्मिक सदरासाठी मी घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून लेखमाला सुरु करीत आहे. या लेखमालेतून देवी उपासना, जगदंबेची विविध रुपे, आणि आदि शंकराचार्य यांच्या जगदंबेची स्तुतीपर रचनांचे सौंदर्य, आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भगवतीच्या कृपेने आणि आचार्यांच्या आशीर्वादाने मी स्वीकारली आहे.

आपण नवरात्रात देवीच्या ज्या नऊ स्वरूपाची आराधना करतो, त्याचे हे गुह्य स्वरूप आहे. नवदुर्गा ही वास्तवात स्त्रीच्या आयुष्यातील नऊ अवस्था आहेत. स्त्री या नऊ अवस्थांमध्ये वंदनीय आणि पूजनीयच आहे. जन्माला आलेली अबोध कन्या म्हणजे शैलपुत्री आहे. कौमार्य अवस्थेत ती ब्रह्मचारिणी आहे. विवाहपूर्व अवस्थेत ती चंद्राप्रमाणे निर्मल असल्याने ती चंद्रघंटा आहे. नवीन जीवाला जन्म देण्यासाठी गर्भ धारण करणारी ती कुष्मांडा स्वरूप आहे. अपत्याला जन्म देणारी ती स्कंदमाता आहे. संयम आणि साधना करून प्रपंच करणारी ती कात्यायनी स्वरूप आहे. केवळ संकल्पाच्या बळावर आपल्या पतीचे अपमृत्यूपासून रक्षण करणारी ती कालरात्री आहे. संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करणारी ती महागौरी आहे. मृत्योपरांत स्वर्गाला जाण्यापूर्वी आपल्या अपत्यांना सिद्धी अर्थात सर्व लौकिक सुखे प्रदान व्हावी, म्हणून आशीर्वाद देणारी ती सिद्धीदात्री आहे. आपली संस्कृती मातृउपासकांची आहे. म्हणूनच आपल्याकडे ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रम्यन्ते तत्र देवताः’ असे सन्मानपूर्वक सांगितले जाते. ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे, मी देवीच्या श्लोक आणि स्तोत्रांसंदर्भात या लेखमालेतून एक वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयास करणार आहे. आदि शंकराचार्यांनी ज्या स्वरूपात भगवतीला शब्दबद्ध केले, आणि त्यातून जनसामान्यांना प्रापंचिक क्लेशांपासून मुक्त होत आत्मउन्नतीचा मार्ग प्रशस्त करावा, अशी आळवणी केली आहे, त्याच विचारधारेला आपण अधिक विस्तारपूर्वक मांडणार आहोत.

या लेखमालेत आपण आदि शंकराचार्य विरचित देवीची सुप्रसिद्ध स्तोत्रे आणि काही दुर्मीळ स्तोत्र यांचा सुद्धा अंतर्भाव करत, त्यातील भाषासौंदर्य, ईश्वरी शक्तीला आवाहन करतानाचा आर्तभाव, आणि तिच्या गुणांचे साद्यंत वर्णन करत, तिला माझ्या क्लेशांचा परिहार कर, अशी केलेली भावपूर्ण आळवणी या अंगाने आपण या स्तोत्रांचा रसपरिपोष अनुभवणार आहोत.

आदि शंकराचार्य विरचित प्रत्येक स्तोत्राचा भाव आपण लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. आचार्य आपल्या स्तोत्रात त्या ईश्वरी शक्तीशी थेट संवाद साधतात. तिच्या गुणांचे अत्यंत चपखल असे वर्णन अत्यंत सुंदर अशा काव्यात्म भाषेत करतात. त्यानंतर एक भक्त म्हणून ते आपल्या इच्छा आकांक्षांचे निवेदन त्या ईश्वरी शक्तीच्या पुढे करतात, आणि तिला आवाहन करतात की, माझ्या कामनांची पूर्तता कर. आचार्यांच्या सर्व लेखनाचा हा आत्मा आहे.

ईश्वरी शक्तीच्या दृश्य स्वरूपाचे केलेले वर्णन हे आपल्यासारख्या भाविकांना, ईश्वराचे रूप आपल्या चित्तात स्थिर करायला अत्यंत साहाय्यप्रद होते. ईश्वराकडे आचार्यांच्या स्तोत्रात आचार्यांनी केलेली मागणी आणि इच्छा-आकांक्षा या आचार्यांच्या नसून, जनसामान्यांच्या आकांक्षा आचार्य त्यांच्या शब्दात मांडत आहेत. एक संसारी व्यक्ती म्हणून आपल्या ईश्वरी शक्तीकडून असणार्‍या सर्व अपेक्षा, आचार्य अत्यंत मोजक्या आणि प्रभावी शब्दांत मांडताना, त्यांच्या पूर्ततेचे आवाहन करतात. यातील सुंदर भाव समजून घेतले पाहिजे. आचार्य पहिले ईश्वरी शक्तीच्या अफाट सामर्थ्याचे वास्तविक वर्णन करतात. तिच्या स्वरुपाची व्याप्ती आणि तिच्या मूर्त रूपातील सौंदर्य आणि ऐश्वर्य अत्यंत प्रभावी शब्दांत मांडतात, जेणेकरून आपल्यातील श्रद्धाभाव जागा होईल. आपण नतमस्तक होऊ. आणि नंतर त्या ईश्वरी शक्तीकडे आपले प्रतिनिधी म्हणून आपल्याच मनातील इच्छा, अत्यंत मोजक्या शब्दांत मांडून या इच्छांच्या पूर्ततेचे आवहन करतात.

आचार्य हे आपण आणि ईश्वरी शक्ती यातील दुवा म्हणून कार्यरत आहेत. आपल्या शिष्याला ईश्वरापर्यंत पोहोचवणे, त्याला ईश्वराचे सान्निध्य मिळवून देणे, हेच गुरुचे कार्य! आचार्य आपल्यासाठी हे धन स्तोत्रांच्या स्वरूपात ठेवून गेले आहेत. आपण फक्त त्याचा वापर करून, ईश्वराच्या कृपेमध्ये न्हाऊन निघायचे आहे.

आदि शंकराचार्य हे देवीची उपासना करताना किती तादात्म्य पावून करत असत, याचे उदाहरण म्हणजे हा श्लोक आहे.


॥सौंदर्यलहरी श्लोक क्रमांक 27॥
जपो जल्पः शिल्पं सकलमपि मुद्राविरचना
गतिः प्रादक्षिण्य-क्रमण-
मशनाद्या हुति-विधिः ।
प्रणामः संवेशः सुखमखिल-
मात्मार्पण-दृशा
सपर्या पर्याय-स्तव भवतु
यन्मे विलसितम् ॥ 27॥
ईश्वराच्या पूजेचे दोन प्रकार आहेत. एक अन्तःपूजा आणि दुसरा बाह्यपूजा. अन्तःपूजेलाचमानसपूजा म्हणतात. तंत्रशास्त्रात याचा उल्लेख समयाचार असा केला जातो. आपल्या इष्टदेवतेला परब्रह्मस्वरूप कल्पून, सहस्रदल कमलात ते तत्व अधिष्ठित असून, संपूर्ण जीवन व्यवहार ही त्या इष्टदेवतेची पूजाच आहे, अशी भावना मनात ठेवून जीवन व्यतीत करणे, म्हणजे समयाचार. कौलाचार पद्धतीत सर्व बाह्य पूजेची साधनसामग्री एकत्र करून, थाटामाटाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करणे. बाह्यपूजेपेक्षा अन्तःपूजा श्रेष्ठ मानली जाते. या श्लोकात आचार्यांनी अन्तःपूजेकडे निर्देश केला आहे.

श्लोकार्थ-हे माते, मी तुझी पूजा काय करणार? निसर्गतः माझ्याकडून जे काही कर्म घडत आहे, ती तुझी पूजाच आहे, असे समजून तू तिचा स्वीकार कर. मुखातून बाहेर पडणार्‍या सार्थक आणि निरर्थक शब्दांना जल्प असे म्हणतात. वर्णमालेतील एकेका शब्दाचे उच्चारण हे एकाक्षरी मंत्र समजले जातात. त्यामुळे मी व्यवहाराच्या निमित्ताने जे काही बोलतो, तो तुझा मंत्रजप आहे, असे समज. पूजन करताना हस्ताभिनय करत अनेक मुद्रा ईश्वराला दर्शवल्या जातात. या मुद्रा एक प्रकारे हातांची क्रियाच आहे. त्यामुळे व्यवहारात मी जे काही हातवारे करत आहे, त्या तुझ्या संतुष्टीसाठी धारण केलेल्या मुद्राच आहेत, असे समज.
 
हे भगवती, तुझे अस्तित्व सर्वत्र आहे. त्यामुळे चलनवलन करताना तुझीच प्रदक्षिणा होत असते. त्यामुळे, मी कार्यनिमित्ते पायांची हालचाल करत आहे, ती तुला घातलेली प्रदक्षिणाच आहे, असे समज.

जठराग्नि हा पाचन कर्म करणारा अग्नी आहे. हा अग्नि अन्न पचवून आत्म्याला एक प्रकारे बली प्रदान करून, देहाला कार्यरत ठेवणारी ऊर्जा प्रदान करतो. हवनातील अग्निचे कार्यसुद्धा हव्य देवतेपर्यंत पोहोचवणे हेच आहे. त्यामुळे मी जे खातो-पितो, ते तुझ्या उपासनेसाठी केले जाणारे हवनकर्म समज.

साष्टांग प्रणाम करताना दोन हात, दोन्ही पाय, छाती, ग्रीवा आणि मस्तक अशा अष्ट अंगांनी भूमीला स्पर्श केला जातो. भगवती सर्वत्र विद्यमान असल्याने उठताना आणि निद्रिस्त होताना जमिनीवर घातले जाणारे लोटांगण म्हणजे तुला केलेला साष्टांग प्रणामच आहे. माझा हा संपूर्ण जीवनविलास म्हणजे आत्मार्पणदृष्टीने केली जाणारी तुझी साधनाच आहे, असे समज. मी तुला माझ्या देहातील प्राणशक्ती आत्मा समजून हे सारे अर्पण करत आहे, असे समज.

आचार्य विरचित श्लोक आणि स्तोत्रांचे आपण निरुपण ज्यावेळी समजून घेण्यास प्रारंभ करू, त्यावेळी आपल्याला आचार्यांनी ईश्वरी विग्रहाशी तादात्म्य पावून त्याच्या रूप-गुणांच्या केलेल्या परिपूर्ण वर्णनाला आत्मसात करू तेव्हा आपल्याला एक वेगळाच आत्मानंद प्राप्त होईल. आचार्यांच्या कवनांना आत्मसात करताना हा आनंद आम्ही नित्य अनुभवतो, तो शब्दबद्ध करून आपल्याला प्रदान करण्याचा तुच्छ प्रयास मी या लेखमालेच्या माध्यमातून करणार आहे. मला विश्वास आहे की, आपल्याला ही लेखमाला नक्की आवडेल.
धन्यवाद. श्री मात्रे नमः


सुजीत भोगले
(लेखकांनी श्री ललिता सहस्त्रनाम भावार्थ निरुपण खंड 1 ते 4, अमृतकुंभातील तुषार, धर्मो रक्षति रक्षितः,शक्ती उपासना या पुस्तकांचे लेखन केले आहे.)
9370043901
Powered By Sangraha 9.0