ठाणे : (Sanjay raut) उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिकेला शिवसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. “संजय राऊत तुम्ही गोमातेला नाही तर, सोनिया मातेला मानणारे आहात. राऊत आता केवळ तुमची सुंता करायची बाकी राहिली आहे. खुर्चीसाठी तुम्ही तेही करणार आहात, यात काहीही शंका नाही,” असा टोलाही खा. म्हस्के यांनी राऊत यांना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारची प्रगतीची घोडदौड सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार ज्याप्रकारे झपाटून काम करीत आहेत, त्यामुळेच सर्वांचा जळफळाट होत आहे. त्यात उबाठाच्या संजय राऊत यांचा सर्वाधिक जळफळाट होत आहे. गोमाते वरून ते वाटेल ते बरळत असल्याने खा. म्हस्के यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. केवळ मतांसाठी मुल्ला मौलवींकडे किती लाचारी पत्करणार, तुम्हाला गायीचे महत्त्व कधीच कळणार नाही, असे प्रत्युत्तर खा. म्हस्के यांनी संजय राऊत यांना दिले आहे.