चंद्रपुरातील वाघांचा तारणहार

02 Oct 2024 22:49:55
chandrapur tiger reserve
 
 
मानव-वन्यजीव संघर्षांच्या पेचात अडकलेल्या 71 वाघांची सुखरूप सुटका करणारे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव पशुवैद्यक डॉ. रविकांत शामरावजी खोब्रागडे यांच्याविषयी...

चंद्रपूर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात मानव-वाघ संघर्षांच्या घटनांमधून बड्या खुबीने वाघाला जेरबंद करण्यामध्ये या माणसाचा हातखंडा. संपूर्ण आयुष्य प्राण्यांसाठी काम करण्याचे व्रत घेतलेला हा माणूस, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील वन्यजीवांचा तारणहार ठरला आहे. विदर्भातील वन्यजीवांची खर्‍या अर्थाने ‘नस पकडणारा’ माणूस म्हणजे डॉ. रविकांत खोब्रागडे.
डॉ. खोब्रागडे यांचा जन्म दि. 13 एप्रिल 1977 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात झाला. त्यांचे वडील शामरावजी खोब्रागडे गावाचे कृषिसेवक होते. खेड्यातील वातावरणातच डॉ. खोब्रागडे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. याच वातावरणात त्यांच्या आसपास पाळीव प्राण्यांची रेलचेल होती. त्यामुळे साहजिकच त्या प्राण्यांविषयी डॉक्टरांच्या मनात उमाळा होता. याचा फायदा त्यांना पुढच्या काळात आपली करिअरची वाट चोखंदळण्यामध्ये आली. डॉक्टरांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण ब्रम्हपुरीत झाले. त्यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
 
नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामधून पशुवैद्यकीय शास्त्राच्या पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढे पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणासाठी अकोल्यामधील महाविद्यालयात प्रवेश मिळवून ’व्हेटनरी सायन्स’ विषयाचे शिक्षण पूर्ण केले. 2006 साली त्यांनी चंद्रपुरमध्ये पाळीव प्राण्यांसाठीचा पहिला दवाखाना सुरू केला. सोबतच जिल्हा परिषदेमध्ये ते साहाय्यक प्रकल्प अधिकारी (पशुसंवर्धन) म्हणून रूजू झाले. जिल्हा परिषदेचे हे काम फार काही प्राण्यांशी थेट निगडित असणारे नव्हते. चौकटीमध्ये बसवलेल्या या कामात, डॉक्टरांचे मन रमत नव्हते. दरम्यानच्या काळात वन विभागाकडून डॉक्टरांना वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी बोलावणे येत असे. मानव-वन्यजीव संघर्षामधून जेरबंद केलेल्या वा जखमी अवस्थेत आढळलेल्या, वन्यजीवांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी डॉक्टरांना पाचारण करण्यात येत असे. या माध्यमातूनच डॉ. खोब्रागडे यांच्यासमोर वन्यजीव उपचाराची कवाडे खुली झाली, आणि वन्यजीव उपचार क्षेत्रात त्यांचा प्रवास सुरू झाला.

2013 साली डॉ. खोब्रागडे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्यजीव पशुवैद्यकपदावर रुजू झाले. वन्यजीव आणि मानव-वन्यजीव संघर्षामध्ये सापडलेल्या वन्यजीवाभोवती त्यांचे दैनंदिन जीवनच्रक गुंतले. रुजू झाल्यानंतर पहिलेच आव्हान त्यांच्यासमोर आले, ते म्हणजे मानव-वन्यजीव संघर्षातून पकडलेल्या बिबट्यांना ’रेडिओ कॉलर’ लावण्याचे. वन्यजीवांच्या शरीरावर ’रेडिओ कॉलर’ लावण्याचे काम करणे जिकरीचे असते. कारण, वन्यजीवांना बेशुद्ध करून भविष्यात त्या ’रेडिओ कॉलर’मुळे त्यांना इजा पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. त्यातही मानव-वन्यजीव संघर्षातून पकडलेल्या बिबट्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे संवेदनशील असते. अशा परिस्थितीत डॉ. खोब्रागडे यांनी दोन बिबट्यांचे नियोजितरित्या ’रेडिओ कॉलरिंग’ करुन, त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या संवेदनशील आणि मानव-व्याघ्र संघर्षाने घेरलेल्या क्षेत्रात काम करणे कठीण आहे. अशा क्षेत्रात काम करण्याची कसब डॉ. खोब्रागडे यांनी अंगीकारली आहे. मानव-वाघ संघर्षाच्या अनेक घटनांमधून त्यांनी वाघांची सुखरूप सुटका केली आहे. काही प्रसंगी जीवावर बेतून, शक्कल लढवून वन्यजीवांचा बचाव केला आहे. त्यामधीलच एक घटना म्हणजे ’सीटी 1’ सांकेतिक क्रमांक असलेल्या वाघाच्या बचावाची.

साधारण चार जिल्ह्यांत 17 लोकांना ठार करणार्‍या ’सीटी 1’ या वाघाला , डॉ. खोब्रागडे आणि त्यांच्या चमूने अत्यंत चतुराईने जेरबंद केले. या वाघाला पकडण्याचे अनेक प्रयत्न झाल्याने, हा वाघ मानवी हालचालींना सरावलेला होता. शिवाय, त्याला पकडण्यासाठी वापरलेल्या अनेक पद्धतींमधून तो सराईतपणे निसटलादेखील होता. अशा परिस्थिती खोब्रागडेंनी जमिनीत बंकर तयार करुन, त्यामध्ये पिंजरा टाकला. त्या पिंजर्‍यात स्वतः दहा ते 12 तास बसून वाघाला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन त्याला जेरबंद केले. डॉ. खोब्रागडेंवर वाघाचा हल्लादेखील झाला. अत्यवस्थ असलेली एक वाघीण जंगलातील एका नाल्यात कित्येक दिवसांपासून बसून होती. उपचार करण्यासाठी तिला पकडणे गरजेचे होते. ज्यावेळी डॉ. खोब्रागडे त्याठिकाणी पोहोचले, तेव्हा वाघीण त्यांच्यावर चालून आली वाघिणीसोबत झालेल्या झटापटीमध्ये त्यांना आपल्या डाव्या पायाचे बोट गमावावे लागले. या घटनेमधून डॉ. खोब्रागडेंनी अनेक प्रकारचे धडे घेतल,े आणि त्यातून आपल्या कामात त्यापद्धतीने सुधारणादेखील केली.

गेल्या दहा वर्षांत खोब्रागडेंनी मानव-वन्यजीव संघर्षामध्ये अडकेले 71 वाघ, 25 हून अधिक बिबटे, दहापेक्षा अधिक अस्वले आणि पिसाळलेल्या हत्तींचा सुखरुप बचाव केला आहे. हत्तीचा कर्दनकाळ ठरलेल्या हरपीज विषाणूचा संसर्ग डॉ. खोब्रागडे यांनीच पहिल्यांदा शोधून काढला आणि त्याविषयीचा संशोधन अहवालदेखील लिहिला. मानव-वन्यजीव संघर्षामध्ये अडकलेल्या वन्यजीवांना ठार करण्यापेक्षा, त्यांना सुखरूप जेरबंद करण्याकडे डॉ. खोब्रागडेंचा प्रयत्न असतो. अशा घटनांमधून त्यांनी अनेक जीवांना जीवदान दिले आहे. मानव-वन्यजीव संघर्षामधून वन्यजीव आणि माणूस या दोन्ही जीवांचे नुकसान होते, त्यामुळे या दोघांचा विचार करुन मध्यममार्ग काढण्याकडे त्यांचा कल असतो. मानवासोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पेचात अडकलेल्या वन्यजीवांसाठी डॉ. खोब्रागडे आशेचा किरण आहेत. पुढील वाटचालीकरिता त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!


Powered By Sangraha 9.0