अभ्युदय बँकेची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल; वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

    02-Oct-2024
Total Views |
abhyudaya bank annual general meeting


मुंबई :     
 सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची वाटचाल उज्ज्वल भविष्याकडे सुरू असून आर्थिक वर्षाअखेरीस सकारात्मक निकाल नोंदविले गेले आहेत, असे बँकेच्या ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवी मुंबई, वाशी येथील बँकेच्या सभागृहात पार पडली. सभेचे अध्यक्षपदी प्रशासक सत्य प्रकाश पाठक यांनी भूषविले तसेच रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेले सल्लागार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य महाव्यवस्थापक आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
दरम्यान, बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षात भरलेल्या या सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित राहिल्याने त्यांचा बँकेवरील विश्वास, आपुलकी आणि पाठिंबा दिसून आला. अहवाल काळातील समितीच्या कामगिरीतून आर्थिक वर्षाअखेरीस सकारात्मक निकाल नोंदविले गेले आहेत, असे यावेळी प्रशासकांनी सांगितले.
 

 

बँकेच्या आर्थिक स्थितीवर नजर टाकल्यास अहवालवर्षी झालेला निव्वळ तोटा व संचित तोटा हा रिझर्व्ह बँकेच्या नियमांप्रमाणे गतवर्षीच्या आवश्यक तरतूदी २०२३ - २४ या आर्थिक वर्षात कराव्या लागल्या नसत्या तर बँकेचा निव्वळ तोटा रू. २२४.१५ कोटी ऐवजी रू. ९.७२ कोटी इतकाच राहिला असता. अशाही परिस्थितीत सदर तोटा पूर्ववर्षीच्या तोटयापेक्षा रू. १२.२५ कोटींनी कमीच आहे, असे बँक प्रशासकांकडून स्पष्ट करण्यात आले.

नाविन्यपूर्ण उपक्रम, उत्तम आर्थिक व्यवस्थापन आणि उत्कृष्ट ग्राहकसेवा यांच्या बळावर उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याचे बँकेचे ध्येय आहे . आर्थिक व बँकिंग क्षेत्रातील उपलब्ध संधीचा योग्य वापर करून बँकेची व्यवसायवृद्धी आणि व्यवसायविस्तार करण्यासाठी बँक वचनबद्ध आहे, असे आश्वासन प्रशासकांनी दिले.