गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत! वाचाळवीरांवर साधला निशाणा
02-Oct-2024
Total Views |
मुंबई : महात्मा गांधींजींच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वाचाळवीर नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. त्यामुळे त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
आज महात्मा गांधींची जयंती. 'बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला', असं गांधीजी म्हणायचे.
त्यांच्या या म्हणण्यातला 'मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर....' याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण… pic.twitter.com/nwWNK1RwJL
राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला, असं गांधीजी म्हणायचे. त्यांच्या या म्हणण्यातला मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर... याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं, हे सध्या सुरु आहे आणि महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे. माध्यमं यांना प्रसिद्धी देतात आणि सोशल मीडियाची भर पडल्याने हे होतंय. या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही."
"त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा. गांधीजींनी जो विचार रुजवला तो त्यांच्या नंतर ७५ वर्षांनीदेखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल," असे ते म्हणाले.