मुंबई : काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा द्वेष, अवहेलना, मत्सरच केला, असा घणाघात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसला विचारसरणी सुधारण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.
प्रविण दरेकर म्हणाले की, "हळूहळू का होईना काँग्रेसचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानायला लागलेत. सावरकरांचा व्यापक विचार स्वीकारायला लागलेत. त्यातूनच काँग्रेस नेतृत्वाला शहाणपण आले तर ठीक. सावरकर द्वेष्टे असणारा गांधी परिवार सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखी भुमिका घेतील असे वाटत नाही. काँग्रेसने सातत्याने सावरकरांचा द्वेष, अवहेलना, मत्सरच केला आहे," असे ते म्हणाले.
बहिणींच्या सबलीकरणासाठी लाडकी बहिण योजना मैलाचा दगड ठरेल!
लाडक्या बहिणींना दिवाळीच्या आधीच नोव्हेंबर महिन्याचे पैसे देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. यावर बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, "लाडक्या बहिणींची उत्तम प्रकारे काळजी घेण्याचे काम महायुतीचे सरकार करते. पहिल्या दिवसापासून ही योजना अपयशी ठरावी यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केला. वेगवेगळ्या वावड्या उठवल्या, संशय व्यक्त केला. परंतू, योजना जाहीर झाल्यापासून रीतसर पैसे मिळत आहेत. आताही दिवाळीला मिळतील. माझ्या बहिणींच्या सबलीकरणासाठी ही योजना निश्चितच मैलाचा दगड ठरेल." तसेच लाडक्या बहिणीने, भावाने भाऊबीजेचे आशीर्वाद घेणे यामध्ये काही गैर असल्याचे वाटत नाही. बहिणीचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणावर निवडणुकीला महायुतीच्या उमेदवारांना मिळणार आहे," असे ते म्हणाले.