त्रिपुरात प्रथमच नोंदवला दुर्मीळ 'फेरेट बॅजर'

02 Oct 2024 10:42:11
Ferret-badger  from tripura



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
'विवेक पार्क फाऊंडेशन'च्या (वीपीएफ) 'वाईल्डलाईफ रिर्सच डिव्हिजन'च्या संशोधकांनी त्रिपुरा राज्यामधून प्रथमच 'फेरेट बॅजर' या दुर्मीळ सस्तन प्राण्याची छायाचित्रित नोंद केली आहे (Ferret-badger from tripura). 'वीपीएफ'च्या संशोधकांनी त्रिपुरा वन विभाग (टीएफडी) आणि 'दी हॅबिटॅट्स ट्रस्ट'च्या (टीएचटी) सहकार्याने तीन महिने जंगलात कॅमेरे लावून सस्तन प्राण्यांची नोंद केली (Ferret-badger from tripura). 'कॅमेरा ट्रपिंग' करुन त्रिपुरातील सस्तन प्राण्यांची नोंद करणारा हा पहिलाच वैज्ञानिक अभ्यास ठरला आहे (Ferret-badger from tripura). याच अभ्यासावर आधारित 'स्टेटस आॅफ मॅमलस् इन दी प्रोटेक्टेड एरियास् आॅफ त्रिपुरा: ए रॅपिड असिसमेन्ट' नावाचा अहवाल प्रकाशित झाला आहे. (Ferret-badger from tripura)
 
 
त्रिपुरासारख्या आव्हानात्मक राज्यात वन्यजीवांवर संशोधन करणे हे अत्यंत जिकरीचे काम आहे. मात्र, 'वीपीएफ'चे रिसर्च स्काॅलर ओंकार पाटील यांनी 'दी हॅबिटॅट्स ट्रस्ट'च्या 'टेक्नोलाॅजी फाॅर काॅन्झर्वेशन टीम'च्या सहाय्याने हे आवाहन उचलून त्रिपुरातील सस्तन प्राण्यांवर शोधकार्य राबविले. सस्तन वन्यजीवांचे तज्ज्ञ डाॅ. आशुतोष जोशी यांनी या प्रकल्पासाठी त्यांना मार्गदर्शन केले. या अभ्यासाचे सर्वेक्षण २०२४ सालच्या जानेवारी ते एप्रिल महिन्यादरम्यान त्रिपुरामधील सेपाहिजाला वन्यजीव अभयारण्य, क्लाउडेड लेपर्ड राष्ट्रीय उद्यान, रोवा वन्यजीव अभयारण्य, तृष्णा वन्यजीव अभयारण्य, बायसन राष्ट्रीय उद्यान आणि गुमती वन्यजीव अभयारण्यामध्ये पार पडले. या संशोधनाचा उद्देश त्रिपुरा राज्यातील सस्तन प्राण्यांच्या समृद्ध जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण करणे, वन्यजीव आणि तिथल्या वन परिसंस्थेला असलेले धोके समजून घेणे, तसेच दीर्घकालीन संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या उपयायोजनांची निर्मिती करणे असे होते.
 
 
या अभ्यासामधून अनेक नवी तथ्ये समोर आली आहेत. 'गुमती वन्यजीव अभयारण्या'तील अभ्यासादरम्यान 'फेरेट बॅजर' या दुर्मीळ सस्तन प्राण्याचे छायाचित्र टिपण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. त्रिपुरा राज्यातून प्रथमच 'कॅमेरा ट्रपिंग'च्या माध्यमातून या प्राण्याचे छायाचित्र टिपण्यात आले असून गुमती अभयारण्यात या प्राण्याच्या अधिवासाची पुष्टी झाली आहे. त्रिपुरातील वनक्षेत्रामध्ये प्रदीर्घ कालखंडानंतर अशा प्रकारचे संशोधन झाल्यामुळे सस्तन प्राण्यांच्या संशोधन क्षेत्रात आशादायी चित्र निर्माण झाले आहे. त्रिपुरा वन विभागाच्या मदतीने पार पडलेल्या या फलदायी संशोधनामुळे राज्यातील वन्यजीवांच्या संरक्षणाला बळकटी मिळणार आहे. सोबतच वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाच्या व्यवस्थापनासाठी हे संशोधन दीर्घकालीन धोरणात्मक सहकार्य देणार असल्याची माहिती 'वीपीएफ'चे संचालक विक्रम शंकरनारायणन यांनी दिली. तर त्रिपुरा हा जगातील जैवविविधतेचा एक हॉटस्पॉट असून राज्यात एनेक दुर्मीळ आणि संकटग्रस्त प्रजातींचा अधिवास आहे. त्यामुळे तेथील परिसंस्थेच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी त्रिपुरा वन विभागासोबत संयुक्तिकरित्या केलेला अभ्यास हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत 'दी हॅबीटॅट्स ट्रस्ट'चे हेड ऋषिकेश चव्हाण यांनी मांडले आहे. या दोन्ही संस्थांनी त्रिपुरा वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
 
या सस्तन प्राण्यांचा उलगडा
संशोधनामधून 'लेपर्ड कॅट', 'फिशिंग कॅट', खेकडा खाणारा मुंगूस अशा काही दुर्मीळ आणि क्वचितच नजेरस पडणाऱ्या प्राण्यांची छायाचित्रे टिपण्यात आली. 'लाईन ट्रान्सेक्ट' आणि पायी घातलेल्या गस्तीदरम्यान मोठ्या मांसाहारी सस्तन प्राण्यांच्या वावराच्या अप्रत्यक्ष चिन्हांचे (उदा. पाऊलट, विष्ठा) देखील दस्तऐवजीकरण करण्यात आले. 'क्लाउडेड लेपर्ड राष्ट्रीय उद्याना'त मार्जार कुळातील एका मोठ्या जंगली मांजराची (संशयित क्लाउडेड लेपर्ड) मध्यम ते मोठ्या आकाराची विष्ठा आढळून आली. यामुळे येथील राष्ट्रीय उद्यानात 'क्लाउडेड लेपर्ड'सारख्या दुर्मीळ प्राण्याच्या वावरासंबंधीचा आशेचा किरण निर्माण झाला आहे.



त्रिपुरा वन विभागाचे आभार
या संशोधन कार्याला समर्थन आणि प्रोत्साहन देणारे त्रिपुरा राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आर.के. सामल यांचे 'विवेक पार्क फाऊंडेशन' आणि 'दी हॅबिटॅट्स ट्रस्ट'ने आभार मानले आहेत. भविष्यात 'वीपीएफ'कडून त्रिपुरामध्ये करण्यात येणाऱ्या संशोधनात्मक अभ्यासांना देखील त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्रिपुराचे तत्कालीन प्रधान वन्यजीव रक्षक श्री. पी.एल.अग्रवाल आणि उनाको वनपरिक्षेत्राचे विभागीय वन अधिकारी श्री. के.जी.राॅय यांचेही दोन्ही संस्थांनी आभार मानले आहेत.
 
हा अभ्यास महत्त्वाचे पाऊल
"त्रिपुरा हा जगातील जैवविविधतेचा एक हॉटस्पॉट आहे. या राज्यात अनेक दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींचा अधिवास आहे. त्रिपुराची जैवविविधता आणि तेथील परिसंस्थेच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी त्रिपुरा वन विभागासोबत संयुक्तिकरित्या केलेला हा अभ्यास एक महत्त्वाचे पाऊल आहे.” - ऋषिकेश चव्हाण, हेड, दी हॅबीटॅट्स ट्रस्ट
 

पहिलाच वैज्ञानिक अभ्यास
त्रिपुरा राज्यातील सस्तन प्राण्यांच्या अधिवासासंदर्भातील हा पहिलाच नियोजितरित्या केलेला वैज्ञानिक अभ्यास आहे. ज्यासाठी आम्ही 'कॅमेरा ट्रॅपिंग' आणि 'लाइन ट्रान्सेक्ट' अशा सर्वेक्षण पद्धतींचा अवलंब केला. जोपर्यंत आपल्याला वन्यप्राण्यांची आणि त्यांच्या अधिवासांची परिस्थिती समजत नाही, तोपर्यंत त्यांचे संरक्षण करणे कठीण असते. त्यामुळेच आम्ही त्रिपुरातील संरक्षित क्षेत्रात अभ्यास करुन तेथील सस्तन प्राणी आणि त्याच्या अधिवासाला असलेले धोके, त्यावरचे उपाय यांचे दस्तऐवजीकरण केले आहे. - ओंकार पाटील, रिसर्च स्काॅलर, विवेक पार्क फाऊंडेशन- वाईल्डलाईफ रिर्सच डिव्हिजन.


Powered By Sangraha 9.0