"...म्हणून शिंदे साहेबांना आपली भूमिका घ्यावी लागली!" नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर
02-Oct-2024
Total Views |
मुंबई : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे स्वत:च्या पक्षांच्या आमदारांना वेळ देऊ शकले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना आपली भूमिका घ्यावी लागली, असे प्रत्युत्तर भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिले आहे. संजय राऊतांनी गृहमंत्री अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली होती. यावरूण राणेंनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
नितेश राणे म्हणाले की, "अमित शाह हे देशाचे गृहमंत्री असण्यासोबतच भाजपचे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते आहेत. त्यामुळे गृहमंत्रीपद सांभाळत असताना त्यांना त्यांच्या कर्तव्याचीसुद्धा जाणीव आहे. ते पक्ष आणि संघटना मजबूत करण्यासाठी वेळ देतात. पण संजय राऊतांना हे कळणार नाही. कारण यांचे मालक पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री या दोन्ही पदांवर होते. परंतू, मुख्यमंत्री असताना ते स्वत:च्या पक्षाला आणि आमदारांना वेळ देऊ शकले नाहीत. त्यामुळे शिंदे साहेबांना शिवसेना संघटना टिकवण्यासाठी आपली भूमिका घ्यावी लागली," असे ते म्हणाले.
"बुथ स्तरावर भाजपला मजबूत करा. जेवढा बुथ मजबूत असेल तेवढी निवडणूक सोपी जाईल, असा अमित शाहांच्या बोलण्याचा अर्थ होता. निवडणूकीच्या प्रक्रियेत महायूती म्हणून आमचं मतदान कसं वाढेल याबाबतीत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. पण ज्या संजय राऊतांनी साधी सरपंचाचीही निवडणूक लढवली नाही त्यांना निवडणूकीचं अंकगणित कधीच कळणार नाही. राज्यसभेच्या निवडणूकीत ते अर्ध्या मतांनी निवडून आलेत. तीसुद्धा त्यांना चांगल्याप्रकारे जिंकता आली नाही. मुंबई आणि महाराष्ट्राला उद्धव ठाकरे नावापासून खरा धोका आहे. ते कधीही महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षित आणि सुखात राहू देणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना लंडनला पाठवून द्या," असेही ते म्हणाले. तसेच अमित शाहांच्या कालच्या दौऱ्यानंतर महायूतीचं सरकार भक्कमपणे परत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.