मुंबई : अॅनिमल चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. अॅनिमल चित्रपटात छोटेखानी भूमिका जरी केली असली तरी तृप्तीला अनेक नव्या हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या. विकी कौशलसोबत 'बॅड न्यूज' या चित्रपटात ती झळकली होती. आता सध्या तृप्ती राजकुमार राव सोबत 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या आगामी चित्रपटात काम करणार आहे. सध्या हा चित्रपट, त्यातील गाणी आणि तृप्ती एका विशेष कारणामुळे चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या राजकुमाक राव आणि तृप्ती डिमरी प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशातच तृप्ती डिमरी एका प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली असूनजयपूरच्या इव्हेंट आयोजकांनी तृप्तीने फी घेऊनही कार्यक्रमाला हजेरी न लावल्याचा गंभीर आरोप केला आहे.
तर झालं असं की, तृप्ती डिमरीने जयपूरमधील एका कार्यक्रमासाठी ५.५ लाख रुपये मानधन स्वरुपात आकारले होते आणि त्यानंतर ती त्या कार्यक्रमाला गैरहजर राहिली आणि त्यामुळे उपस्थित महिलांनी संतप्त होत जयपूरमधून तृप्ती आणि तिच्या सर्व चित्रपटांना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात काही महिला अभिनेत्रीवर आरोप करताना आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा दावा करताना दिसत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला म्हणत आहे की, 'तिचे चित्रपट कोणीही पाहणार नाही. आश्वासन देऊनही ती आली नाही तिने आपला वेळ सांभाळायला शिकावं. ती कोणी दिग्गज व्यक्तिमत्व तर नाहीये आणि तिचं नावंही कोणाला माहित नाही. ती कोण आहे हे पाहण्यासाठी आलो आहोत. ती सेलिब्रिटी म्हणवण्याच्या लायकीची नाही. व्हिडीओमध्ये ती महिला तृप्तीच्या चित्राला काळ्या मार्करने लिहिताना दिसतेय आणि म्हणतेय, 'तिचा चेहरा काळा करा'.
तर व्हिडिओतील दुसरी महिला म्हणत आहे की, 'आम्ही तिच्यावर गुन्हा दाखल करू. जयपूरने तिच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकावा. तिने आज आमच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवली आहे. तिने आमच्यकडून ५.५ लाख रुपये घेतले असून आता ते पैसे घेऊन पळून जात आहे. तिने आमचा अनादर केला आहे. आता ती पळ काढत आहे. आता आपण तिच्या सिनेमांपासून दूर पळू”. दरम्यान, घडलेल्या या सर्व प्रकारावर तृप्ती डिमरीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच, तिचा आगामी ‘भूल भूलैय्या ३’ आणि ‘धडक २’ हा चित्रपट लवकरच येणार आहे.