गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा मिळणार!

02 Oct 2024 17:21:20
 
Fadanvis
 
मुंबई : राज्यातील धर्मादाय कार्यालयाचे काम कौतुकास्पद आहे. विभागांनी किती काम केले यापेक्षा किती लोक लोकाभिमुख काम करत आहेत, हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. धर्मादाय रुग्ण योजनेच्या अंमलबजावणीकरीता ऑनलाईन प्रणाली, रुग्णाकरिता २४ तास हेल्पलाईन सुविधा, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कागदपत्रे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन या उपक्रमाचे उदघाटन वरळी येथील सस्मिता इमारतीत पार पडले. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत मोफत आणि सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय संघटना आणि वैद्यकीय कक्ष समन्वयाने काम करत आहेत. आपल्याकडे धर्मादाय रुग्णालयात गरजू आणि निर्धन असणाऱ्या लोकांसाठी आरक्षित बेड असतात. हे ७०-८० टक्के बेड हे रिकामे असतात कारण त्याची माहिती नसते. आम्ही अधिवेशनात कायदेशीर तरतूद करून हे बेड पारदर्शकपणे भरले जातील यासाठी शासनाला अधिकार दिले. शासनाच्या माध्यमातून चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून हे व्यवस्थापन केले जाते. यासंदर्भांतील एका पोर्टल आपण तयार केले आहे. सर्व आरक्षित बेडची माहिती या पोर्टलवर देण्यात येईल. हे अत्यंत पारदर्शकपणे होईल. या व्यक्तीकडून कोणीही पैसे वसूल करू शकणार नाही. कोणीही हे बेड रिकामे ठेवू शकणार नाही. उपमुख्यंमत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्णतः पारदर्शकपणे राबविली जाईल," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत! वाचाळवीरांवर साधला निशाणा
 
"ऑनलाईन प्रणालीमुळे योजनेचा लाभ घेण्याकरिता कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी होणार असल्याने खऱ्या गरजू रूग्णांना योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच धर्मादाय योजनेतील रिक्त खाटांची रिअल टाईम माहिती रुग्णांना उपलब्ध होईल आणि खऱ्या गरजू रुग्णांना योजनेचा लाभ मिळेल," असे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
 
वैद्यकीय मदत कक्षाच्या स्थापनेमुळे धर्मादाय रुग्ण योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल. धर्मादाय रुग्णालयातील राखीव खाटांचे कक्षाकडून वाटप होणार असल्याने सर्व गोरगरीब रुग्णांना खात्रीशीर मोफत आणि सवलतीच्या दरातील बेड उपलब्ध होणार आहे. गरीब रुग्णांना मोफत तसेच सवलतीच्या दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे सुकर होणार आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कक्षाचे औपचारिक उदघाटन करण्यात आले. उद्घाटनपूर्वीच कक्षाचे कामकाज सुरू झाले असून गेल्या १० महिन्यात कक्षामार्फत ३२३ रुग्णांना गंभीर आजारांसाठी मदत करण्यात आली आहे. तसेच मदतीची रक्कम १२ कोटी ७३ लक्ष एवढी असल्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले. https://charitymedicalhelpdesk.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळास भेट दिल्यावर राज्यातील धर्मादाय रुग्णालये, त्यांच्याकडील राखीव बेडची संख्या, यांची माहिती मिळणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0