मुंबई : (Mukhyamantri Tirth Darshan Yojana) राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी अयोध्येत रामललांच्या दर्शनासाठी जाणार आहे.
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची तिर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये देशातील एकूण ७३ आणि महाराष्ट्रातील ६६ तीर्थस्थळांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्ह्यातून १५०, मुंबई उपनगर जिल्ह्यातून ३०६ आणि ठाणे जिल्ह्यातून ४७१ अर्ज अयोध्येला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातून ८०० ज्येष्ठ नागरिक अयोध्येला रवाना होणार आहेत.
यासाठी विशेष रेल्वे दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रवाना होईल. दि. ८ ऑक्टोबर रोजी अयोध्येतून ते मुंबईला परत येतील. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातून ज्येष्ठ नागरिकांचे दीक्षाभूमी नागपूर, महाबोधी मंदीर गया, शेगाव, पंढरपूर या तीर्थ क्षेत्रासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून २ हजार ५०५ अर्ज प्राप्त झाले आहेत.