नवरात्रोत्सवादरम्यान ‘मेट्रो’च्या वाढीव फेर्‍या

02 Oct 2024 12:58:45

metro
 
मुंबई, दि. १ : (Mumbai Metro)नवरात्रोत्सवादरम्यान ‘मेट्रो-२अ’ आणि ‘मेट्रो-७’ वरील ‘मेट्रो ट्रेन’ सेवेच्या वाढीव फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. सणाच्यासुदीच्या काळात मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक सेवेची वेळ वाढविण्याचे महत्व लक्षात घेत ‘महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड’तर्फे (एमएमएमओसीएल) वाढीव फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे.
 
नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशीरा प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुविधेसाठी सोमवार, दि. ७ ऑक्टोबर ते शुक्रवार, दि. ११ ऑक्टोबर या कालावधीत अतिरिक्त ‘मेट्रो’ सेवा पुरविण्यात येईल. या कालावधीत दररोज १२ अतिरिक्त ‘मेट्रो’ सेवा चालविण्यात येतील. यावेळी दोन ‘मेट्रो’ सेवांमध्ये १५ मिनिटांचा वेळ असेल. यामुळे या उत्सवात सहभागी होऊन मध्यरात्री प्रवास करणार्‍या प्रवाशांना सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासाचा लाभ घेता येईल.
 
या निर्णयाबाबत ‘एमएमएमओसीएल’चे अध्यक्ष आणि ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की, “नवरात्रोत्सव लोकांना एकत्र आणतो आणि सर्व भाविकांना व नागरिकांना कार्यक्षम तसेच, सुरक्षित वाहतूक प्रदान करणे आमची जबाबदारी आहे. ‘मेट्रो’च्या सेवा वाढवून आम्ही प्रवाशांना उत्सवादरम्यान रात्री उशीरा होणार्‍या प्रवासासाठी सोयीस्कर आणि आरामदायक वाहतूक पर्याय प्रदान करीत आहोत.”
 
‘एमएमएमओसीएल’च्या व्यवस्थापकीय संचालक, रुबल अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, “प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आणि नवरात्रोत्सवादरम्यान ट्रेनच्या सेवा वाढवण्याचा निर्णय प्रवासी अनुभव सुधारण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या अतिरिक्त सेवांमुळे उत्सवात सहभागी होणार्‍यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सुनिश्चित होईल.”
 
वाढीव ‘मेट्रो’ सेवांचे वेळापत्रक
 
रात्री ११ नंतर नियोजित वाढीव ‘मेट्रो’ सेवा

अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली
११.१५ - ००.२४
११.३० - ००.३९
११.४५ - ००.५४
००.०० - ०१.०९
००.१५ - ०१.२४
००.३० - ०१.३९
 
गुंदवली ते अंधेरी (पश्चिम)
११.१५ - ००.२४
११.३० - ००.३९
११.४५ - ००.५४
००.०० - ०१.०९
००.१५ - ०१.२४
००.३० - ०१.३९
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0