निखळ प्रेमाची संघर्षगाथा!

19 Oct 2024 23:13:31
panee marathi movie


शहरात राहणार्‍या नागरिकांना तसं पाहायला गेले तर, सर्वच सुख, सोयी-सुविधा असतात. आयुष्य जगण्यासाठी लागणार्‍या अन्न, वस्त्र निवारा आणि पाणी या मुलभूत गरजा आपण पूर्ण करतो. पण देशातील, महाराष्ट्रातील लोक या गरजांना अपवाद आहेत. महाराष्ट्रातील अनेक गावातील स्त्रियांना चार-पाच किलोमीटर पायपीट करत, पाणी भरण्यास जावे लागते. खरं तर, अन्य मुलभूत गरजांमध्ये सर्वाधिक महत्वाची आहे. ती पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करावे लागते. पाणी म्हणजे जीवन. मात्र, याच पाण्याशिवाय एका व्यक्तीला जीवनात काय हालअपेष्टा भोगाव्या लागल्या, याची सत्य कथा सांगणारा ‘पाणी’ हा आदिनाथ कोठारे दिग्दर्शित चित्रपट दि. 18 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित झाला.

नांदेडमधील एक लहानसं गाव नागदरेवाडी. जिथे पाणी आणण्यासाठी गावातील स्त्रियांना तीन-चार किलोमीटर लांब असलेल्या गावांमध्ये जाऊन, तिथल्या विहिरीतून पाणी आणावे लागते. आता गावात पाण्याचा टिपूसही नसल्यामुळे, गावातील मुलांना कुणी मुली देण्यासही तयार नव्हते. परिणामी मुलांची लग्नच होत नव्हती. शिवाय पाण्याअभावी रोजगार, शिक्षण यांचा अभावच होता. या सगळ्याचा दुष्परिणाम म्हणजे, गावातील पुरुष व्यसनांच्या आधीन गेलेले. पण या सगळ्या खडतर परिस्थितीत, हनुमंत केंद्र (बाबू) हा एक तरुण कायमच गावाचा विकास कसा होईल, यावर भर देणारा. बरं, त्याचा मोठा भाऊ बालाजी हा सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे, लोकांचं भलं कसं होईल? याचा विचार करण्याची वृत्ती घरातूनच बाबूला अवगत झाली होती. तर असा हा बाबू, लग्नासाठी मुलगी पाहात होता. नांदेड शहरात राहणार्‍या सुवर्णाचं स्थळ त्याला चालून आले आणि तिच्यावर त्याचा जीव जडला. लग्नाची सगळी बोलणी झाली, पण ज्यावेळी बाबू नागदरेवाडीचा आहे हे सुवर्णाच्या घरच्यांना समजले, त्यावेळी त्यांनी लग्नाला नकार दिला. परंतु, लग्न करेन तर सुवर्णाशीच असा मनाशी पक्का निश्चय करणार्‍या बाबूने, आपल्या होणार्‍या बायकोसाठी गावात पाणी आणण्याचा घाट घातला. अथक परिश्रमाने तो पूर्ण देखील केला. मात्र, गावात पाणी आणण्याचा त्याचा प्रवास किती खडतर होता, गावकर्‍यांना एकत्रित ठेवून, गावात प्रत्येकाच्या घरात पाणी हवे, यासाठी बाबूने केलेला संघर्ष अनुभवण्यासाठी ‘पाणी’ चित्रपट नक्की पाहा.

शिवाय आपल्या होणार्‍या बायकोसाठी संपूर्ण गाव बदणार्‍या नवर्‍याचा, अभिमान असणार्‍या सुवर्णाची सहनशीलताही आपल्याला खूप काही शिकवून जाते.

नागदरेवाडीतील एका असमान्य माणसाच्या संघर्षाची कथा दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांनी मांडली आहे. खरं तर त्यांचे वडील महेश कोठारे हेही निर्माते-दिग्दर्शक. शिवाय त्यांची चित्रपट दिग्दर्शित करण्याची शैली आणि कथेची निवड निराळीच. त्यामुळे भविष्यात आदिनाथ यांनी एखादा चित्रपट दिग्दर्शित केला, तर तो त्याच पठडीतला विनोदी-अ‍ॅक्शनपट असेल असा अंदाज होता. पण, मराठवाड्यातील असं एक गाव, ज्याचे कुणी कधी नाव देखील ऐकलं नसेल, अशा गावातील पाण्याची सत्य भीषण परिस्थिती आणि ती दूर करण्यासाठी कष्टाचे पाणी करणारे जलदूत हनुमंत केंद्रे यांची संघर्षगाथाच, म्हणजेच एका अर्थाने बायोपिकच आदिनाथ प्रेक्षकांसमोर आणतील असं वाटलं नव्हतं.

मात्र, आदिनाथ यांनी अतिशय उत्तम दिग्दर्शनाची आणि अभिनयाची देखील बाजू सादर केली आहे, यासाठी खरंच त्यांचं विशेष कौतुक. मुळात महाराष्ट्रातील एका गावातील ती सत्य कथा असल्यामुळे, जितकी ती प्रेक्षकांना खरी वाटेल तितकीच प्रेक्षक ती आत्मसात करतील, याचा विशेष विचार लेखन आणि दिग्दर्शनातून दिसतो. चित्रपटाचा मूळ गाभा आहे पाणी. पण त्या मुळ कथेला धक्का न लावता, हनुमंत केंद्रे आणि सुवर्णा यांची प्रेमकथा देखील सफाईदारपणे चित्रपटात मांडली आहे. गावाकडे नुकतेच लग्न ठरलेले किंवा दोन अनोळखी स्त्री-पुरुष एकमेकांशी कसे बोलत असतील, वागत असतील, कोणत्या मर्यादा पाळत असतील हे अभ्यासपूर्वक मांडले आहे. तसेच, नागदरेवाडीत गावकरी ज्या भाषेत बोलत असतील, त्या बोलीभाषेवरही मेहनत घेतलेली दिसून येते. चित्रीकरणाबद्दल बोलायचे झाल्यास, संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण नागदरेवाडीतील रिअल लोकेशन्सवर केल्यामुळे, ते भयाण वास्तव मनावर खोल परिणाम करते. ज्यावेळी गावात पाणलोट प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यावेळी पाणी घरात आणण्यासाठी आधी गावातील स्त्रियांनी घराचा उंबरठा ओलांडून एकत्र येणं गरजेचं आहे, हा विचारच भावतो. शिवाय आपल्याच घरात पाणी येणार आणि त्यासाठी आपण मेहनत करुन पैसे देखील कमावू शकतो, ही बाब गावकर्‍यांना माहीत नसते. ते खरंतर या चित्रपटात दाखवल्याने, आजही महाराष्ट्रात जर का अशी परिस्थिती असेल, तर त्या गावकर्‍यांना नक्कीच संदेश देणारी आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे, सत्य घटना मांडत असताना, प्रेमकथाही त्या कथेचा महत्वाचा भाग असूनही कथा कुठेही भरकटली नाही हे विशेष.

इथे आवर्जून तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला एक प्रसंग नमूद करावासा वाटतो. गावात पाणी येण्यासाठी आधी पावसाचे पाणी मुरवण्याची प्रक्रिया सुरू असते. त्यासाठी बरेच खड्डे खणले जातात. बाबू, सर्व गावकर्‍यांच्या मेहनतीला यश येतं, पाऊस पडतो. ज्यावेळी पाऊस पडतो, तेव्हा पावसाचं पाणी त्या खड्ड्यांमधून कसे जमिनीत मुरते याचे चित्रण, ग्राफ्रिक्सच्या माध्यमातून अप्रतिम करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, पाणी मिळावे यासाठी विहीर खणावी लागते. कौतुकाची बाब म्हणजे खरी विहीर खणत चित्रीकरण केल्यामुळे, पाण्याचा तो कष्टाचा प्रवास अगदी जिवंत भासतो.

चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे. सुवर्णा यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री, ऋचा वैद्य हिच्या तोंडी संवाद जरी कमी असले तरी, गावातील मुलीचे अगदी हुबेहुब पात्र तिने साकारले आहे. हनुमंत केंद्रे यांच्या भूमिकेत झळकलेले आदिनाथ कोठारे यांनी खर्‍या बाबूने गावात पाणी आणण्यासाठी संघर्ष करत असताना, त्याची मानसिकता काय असेल याचाही अभ्यास करून हे पात्रही अगदी जिवंत केले आहे. त्यामुळे जिद्द आणि प्रेम या दोघांचे मिलन होणारी ‘पाणी’ ही कहाणी आणि त्यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांनी नक्की पाहावी. सध्याच्या मसालापट, भयपट किंवा विनोदीपटांच्या यादीत, पाणी हा चित्रपट प्रेक्षकांना आयुष्याच्या एका वेगळ्याच प्रवासाला घेऊन जातो.
चित्रपट - पाणी
दिग्दर्शक - आदिनाथ कोठारे
कलाकार - आदिनाथ कोठारे, ऋचा वैद्य, सुबोध भावे, किशोर कदम
रेटिंग - ***


Powered By Sangraha 9.0