वारशाचे जतन करा

    19-Oct-2024
Total Views |
maharashtra state ideological heritage

आपल्या देशात अनेक राज्ये आहेत. या राज्यात महाराष्ट्रासारखा समृद्ध वारसा लाभलेले एखाद दुसरेच राज्य असेल. महाराष्ट्राला ज्ञानदेवांपासून उज्ज्वल धार्मिक वारसा लाभलेला आहे. ज्ञानदेवांपासून सुरू झालेल्या सर्व जातीय संतांचा वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वधर्म, स्वभाषा, स्वराज्य आणि सुराज्याचा वारसा आपल्याला दिलेला आहे. न्या. रानडे, लोकमान्य टिळक, सावरकर यांनी राजकीय चळवळीचा वारसा दिलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक चळवळीचा वारसा दिलेला आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचा वारसा दिलेला आहे. आजच्या काळात धर्मभाव जागृतीचा वारसा पाडुंरंग शास्त्री आठवले, श्रद्धेय धर्माधिकारी, श्रद्धेय वामनराव पै. यांनी दिलेला आहे.

हा वारसा ज्याला माहीत आहे तो जर आजच्या महाराष्ट्रात आला, तर त्याला असे दिसेल की, महाराष्ट्र ही शिव्या-शापांची भूमी झालेली आहे. महाराष्ट्रातून अभंग, भूपाळी, भजने लुप्त झाली असून, शिवी महात्म्याचे प्राबल्य वाढले आहे. शिव्या देण्यासाठी सर्व प्रकारच्या प्राण्यांचा उपयोग केला जातो. मी वाईट शब्द वापरतो की, तू वापरतोस अशी स्पर्धाच चालू आहे. शिवीगाळपणा हा आपला वारसा नव्हे. तो सामान्य मराठी माणसांचा देखील वारसा नव्हे. त्याची इच्छा नसतानाही त्याला हे शिवी संकीर्तन रोज ऐकत बसावे लागते. ऐकत बसण्यापलीकडे त्याच्या हाती काही नसते. परंतु, अशी परिस्थिती कायम राहत नाही. संधी येत असते.

अशी संधी नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. आपल्याला आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे. हा मतदानाचा हक्क फक्त राजकीय हक्क आहे असे नाही. फक्त राजकीय हक्काचा विचार केला, तर या हक्काची अंमलबजावणी करून सत्ता कोणाकडे द्यायची हे आपण ठरवू शकतो. असे आपण आतापर्यंत ठरवितही आलो आहोत. आपल्या आवडीचे शासन आपण आतापर्यंत आणले. 2019 साली देखील आम्हाला कोणाचे शासन पाहिजे, याचा निर्णय आपण दिला. पण, त्यात गडबड झाली. ही गडबड कोणती, हे इथे सांगण्याची काही गरज आहे, असे नाही.

अशी गडबड पुन्हा होऊ नये, यासाठी निर्णायक मतदान करावे लागेल. मतदानाची टक्केवारी लोकसभा निवडणुकीप्रमाणे कमी राहिली, तर 2019 साली जशी गडबड झाली तशीच पुन्हा होईल आणि नंतर आपल्याला शिवीपुराणच ऐकत बसावे लागेल. मतदानाचा दुसरा विषय केवळ सत्ताधारी निवडण्याचा नाही. आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे. सामान्य परिस्थितीत लोकशाहीत एक पक्ष सत्तेवर येतो आणि दुसरा सत्तेपासून दूर जातो, हा लोकशाहीचा खेळ आहे. आताची निवडणूक ही विचारधारांच्या संघर्षाची निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक म्हणणार्‍या धार्मिक घटकांनी अन्य कसलाही विचार न करता, एका विचारधारेला पराभूत करायचे आहे असे ठरवून मतदान केले, तर ते मतदान धोकादायक असते. महाराष्ट्रातील काही पक्ष त्यांच्या बाजूंनी ठाम उभे राहिले. त्यांना चिथवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खोटे नॅरेटिव्ह रचण्यात आले. या सर्वांचे परिणाम आपल्या समोर आहेत.

आपल्या पुढे दोन विचारधारा आहेत. एक विचारधारा जातीजातीत संघर्ष निर्माण करणारी, जातीय अस्मिता वाढवणारी, उच्च जातींना शिव्या देणारी आहे. ही विचारधारा धार्मिक अल्पसंख्याकांना शिरजोर करणारी, गणेशोत्सव, दुर्गापूजन मिरवणुकांवर दगडफेक करण्यास प्रवृत्त करणारी आहे. ही विचारधारा, घटना बदलली जाणार आहे, आरक्षण रद्द केले जाणार आहे, शैक्षणिक सवलती काढून घेतल्या जाणार आहेत, असा शंभर टक्के खोटा प्रचार करणारी आहे. ही विचारधारा जर सशक्त झाली, तर जातीजातीत मारामारी होईल. आजवर रोखल्या गेलेल्या दंगली सुरू होण्याची शक्यता राहील. खोटी कथानके रचून लोकांची दिशाभूल केल्यामुळे, दिशाभूल झालेल्या लोकांचे कोणतेच कल्याण होणार नाही.

दुसरी विचारधारा समाजाचा एकात्मिक विचार करणारी आहे. जातीजातीत समाजाचे तुकडे पाडून समाजाचा विचार न करणारी आहे. प्रत्येकाला उपासना स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाने आपआपल्या रूचीप्रमाणे परमेश्वराची आराधना करावी, असे माननारी ही विचारधारा आहे. राज्यघटना हा देशाला बांधून ठेवणारा सर्वोच्च कायदा आहे, असे ही विचारधारा मानते. राज्यघटनेप्रमाणे देश चालवायचा आहे, यावर या विचारधारेचा ठाम विश्वास आहे. तसा त्यांचा इतिहास देखील आहे. महाराष्ट्राराचा समृद्ध वारसा जतन करणारी आणि त्याला समृद्ध करणारी ही विचारधारा आहे.

महाराष्ट्र घडवायचा, बिघडवायचा की अधोगतीला घेऊन जायचा याचा निर्णय मतदार म्हणून, आपल्या सर्वांना करायचा आहे. आपल्यापुढे दोन स्पष्ट पर्याय आहेत. त्यापैकी एका पर्यायाची निवड करावयाची आहे. सामान्य खरेदी करत असताना, उदा. कपडे, घरातील वस्तू, याबाबतीत आपण चोखंदळ असतो. अनेक पर्याय बघून निवड करतो. राजकीय पक्षांच्या बाबतीत देखील विचार करून निर्णय केला पाहिजे. विचार करताना जात, भाषा त्याच्यापासून होणारे लाभ, व्यक्तिगत आवड वगैरे सर्व गोष्टी बाजूला ठेवता आल्या पाहिजेत. केवळ एकाच निकषाचा विचार केला पाहिजे तो म्हणजे, महाराष्ट्राचे सार्वत्रिक कल्याण करण्याचे सामर्थ्य कुणात आहे?

असा निर्णय करणे अवघड नाही. अवघड यासाठी नाही की, हा जसा मोठा जटील विषय आहे, तसाच तो सोपा विषय आहे. आपण आपल्या मनाशी संवाद केला पाहिजे. आपल्या मनालाच विचारले पाहिजे की, कुणाच्या बाजूने गेले असता महाराष्ट्राचे कल्याण होईल? आपल्यापैकी प्रत्येकात चांगल्या प्रवृत्ती आणि विकार निर्माण करणार्‍या प्रवृत्ती असतात. ही निवडणूक चांगल्या प्रवृत्तींना आव्हान करणारी आहे.

आपला वारसा कोणता आहे? पुन्हा एकदा सांगायचे, तर आपला वारसा देशाला गती देण्याचा आहे. स्वातंत्र्याची उर्मी शिवाजी महाराजांनी निर्माण केली. स्वराजाची आग टिळकांनी पेटविली. समृद्धीचा महामार्ग आण्णासाहेब किर्लोस्कर, वालचंद हिराचंद यांनी निर्माण केला. शिक्षणाची गंगा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रवाहित केली. साहित्यात राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, दया पवार, शरणकुमार लिंबाळे यांनी केवळ महाराष्ट्रच समृद्ध केला नाही, तर देशातील अनेक भाषांना गती दिलेली आहे. आपण अशा समृद्ध, सुसंस्कृत आणि पराक्रमी महाराष्ट्राचे वारसदार आहोत, याचे स्मरण नित्य ठेवावे. त्यातच आपले सार्वत्रिक कल्याण आहे.

रमेश पतंगे