जागतिक युद्ध आणि भारत

    19-Oct-2024
Total Views |
india and global conflict


दि. 7 ऑक्टोबर रोजी ‘इस्रायल-हमास’ युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आता या युद्धामध्ये इराण, हुथी आणि ‘हिजबुल्ला’ मोठ्या संख्येने भाग घेत आहे. रशिया युक्रेन युद्धाबरोबर इस्रायल-इराण युद्धाचा जगावरती आणि भारतावरती मोठा प्रभाव पडत आहे.भारत वेगवेगळ्या प्रभावाला कशा प्रकारे सामोरे जात आहे, याचे विश्लेषण करणारा हा लेख...

‘हमास’चा निःपात करण्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ले केले. हसन नसरल्ला आणि ‘हिजबुल्ला’च्या डझनभर कमांडरांना ठार करून, इस्रायलने आता ‘हिजबुल्ला’च्या सर्वनाशासाठी लेबेनॉनमध्ये सैन्य घुसवले आहे. येमेनमध्ये सक्रिय असलेल्या हुथी बंडखोरांविरोधात, इस्रायलचे हवाई हल्ले सुरू आहेत. अशा परिस्थितीत इराणविरुद्ध तितक्याच तीव्रतेचे हल्ले सुरू करण्याची इस्रायलची तयारी आहे. त्यामुळे या भागात राहणार्‍या भारतीयांच्या जीवनाला धोका, या देशांबरोबर असलेल्या व्यापार्‍यांमध्ये होणारी कपात, तेलाच्या किमती वाढणे, वेगवेगळे प्रकल्प बंद पडणे, असे अनेक प्रभाव पडत आहेत.


तेलाच्या किमती वाढल्या

इस्रायलवर इराणने केलेल्या हल्ल्यानंतर, मध्य-पूर्व भागात संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती तीन टक्क्यांनी वाढल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेन्ट क्रूड याची पाच टक्के उसळी पाहायला मिळाली. युद्ध झाले, तर त्याचा परिणाम इराक, सौदी अरेबिया, कतार आणि यूएईपर्यंत जाणवेल. हल्ले होतच राहिले, तर तेलाचा पुरवठा कमी होईल आणि तेलाचे भाव वाढतील व भारतावर त्याचा पिरिणाम होईल.

भारतात इंधनांची किरकोळ विक्री किंमत (आरएसपी) मार्चपासून बदललेली नाही. पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत भारतापेक्षा तिप्पट आहे. रशियाकडून स्वस्त कच्चे तेल आयात करून, स्पॉट मार्केटमध्ये स्वस्त कच्चे तेल घेऊन, भारताने इंधन सुरक्षेचे आव्हान इतर देशांपेक्षा चांगले पेलले आहे.


या देशात राहणार्‍या भारतीयांना धोका, फॉरेन एक्सचेंजची कमी

अर्थार्जनसाठी सौदी अरेबिया, यूएई, ओमान, बहरीन, कतार आणि कुवेतमध्ये, 90 लाख भारतीय आहेत. इराणमध्ये ही संख्या दहा हजार, तर इस्रायलमध्ये 20 हजार आहे. इथे राहणारे भारतीय लाखो डॉलर्स भारतात पाठवतात. त्यामुळे भारतातील परकीय गंगाजळी मजबूत होते. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झाले, तर त्याचा परिणाम परकीय चलनावर होईल. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार, डिसेंबर 2023 सालापर्यंत सौदी अरेबिया, यूएई, ओमान, बहरीन, कतार आणि कुवेतमुळे भारताला 120 अब्ज अमेरिकन डॉलर्स मिळाले.

मात्र, भारताचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आता 700 अब्ज डॉलर्स एवढ्या उंचीवर पोहोचले आहेत. याचे मुख्य कारण, अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी दाखवलेले व्यावसायिक कौशल्य. यामुळे आपल्याला परकीय गंगाजळीमध्ये कमी पडणार नाही. मात्र, जे नागरिक व्यवसायाकरता, शिक्षणाकरता किंवा पर्यटनाकरता परदेशात जात आहेत. त्यांनी वाढते डॉलर्स आणि युरो यांची किंमत लक्षात घेऊन, आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.


विमान तिकिटे महागली

इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा जागतिक हवाई प्रवासावर, विशेषत: युरोप, पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियामधील उड्डाणांवर लक्षणीय परिणाम होत आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया कमजोर असल्यामुळे, परदेश प्रवासाची किंमत वाढली आहे. परदेश शिक्षणाकरता जाणार्‍या विद्यार्थ्यांना सुद्धा, 15 ते 20 टक्के एवढा जास्त पैसा खर्च करावा लागत आहे.
 
 
भारतीय प्रकल्पांना फटका

इराणमधील चाबहार बंदर सामरिकदृष्ट्या भारतासाठी महत्त्वाचे आहे. इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाले, तर इराणचा प्राधान्यक्रम बदलून त्यांचे चाबहारवरचे लक्ष कमी होईल.

2023 साली दिल्लीत झालेल्या ‘जी-20’ परिषदेदरम्यान भारत, मध्य-पूर्व, युरोप ‘आर्थिक कॉरिडॉर योजने’वर सह्या झाल्या होत्या. त्यात भारत, अमेरिका, सौदी अरेबिया यांच्याबरोबर युरोपियन महासंघ, इटली, फ्रान्स आणि जर्मनीची भागीदारी होती. त्याच्या मदतीने भारतातील माल गुजरातच्या कांडला बंदरातून यूएई, सौदी अरेबिया, इस्रायल आणि ग्रीसमार्गे युरोपात अगदी सुरळीत पोहोचू शकेल.

युद्ध झाले, तर सर्वांत जास्त नुकसान भारत, मध्य-पूर्व, युरोप ‘आर्थिक कॉरिडॉरचे’ होईल. कारण, त्याचे संपूर्ण वेळापत्रक बिघडेल. त्याशिवाय ‘ख2,’ ‘ण2’ यांसारख्या व्यापारी गटांनाही, अडचणींचा सामना करावा लागेल. या गटात भारत, इस्रायल, अमेरिका आणि यूएई आहे.

सध्या तरी ‘चाबहार प्रकल्प,’ ‘आय मेक प्रकल्प’ आणि ‘आई टू-यु-टू योजना’ सुरू होण्याचे काही संकेत दिसत नाही. जर युद्ध थांबले तरच, या प्रकल्पावर काम केले जाऊ शकते.

‘शिया दहशतवादी गट’ इस्रायलच्या विरोधात जेव्हा अरब स्प्रिंग झाले, तेव्हा आयएसआय समोर आले. इस्लामिक स्टेटचा उदय झाला. सध्या तरी ‘इस्लामिक स्टेट’ सारखी संघटना दबून आहे. जगातील बहुतेक ‘शिया दहशतवादी गट’ आता, इस्रायलच्या विरोधात कारवाई करण्यामध्ये गुंतलेले आहे. त्यामुळे, त्यांचे इतर ठिकाणचे लक्ष कमी झालेले आहे.


आंतरराष्ट्रीय शिपिंगवर हल्ले

‘इराण समर्थित गट’ येमेनमधील हौथींनी, होडेदाह बंदरावरील जहाजांवर हल्ले केले आहेत. गाझा पट्टीत इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यातील युद्धात ,पॅलेस्टिनींबरोबर हौथींनी येमेनजवळील आंतरराष्ट्रीय शिपिंगवर हल्ले सुरू केले आहेत. संघर्षात आणखी वाढ झाल्यास, इराणचे सैन्य, हुथी आणि इराकी निमलष्करी, पश्चिम आशियातील तेल उत्पादकांवर म्हणजेच सौदी अरेबियावरही हल्ले करू शकतात.

युरोप आणि अमेरिकेकडे जाणार्‍या व्यापारी जहाजांना आता, लाल समुद्र आणि सुएझ कॅनॉलमधून जाता येत नाही. कारण हौथी दहशतवाद्यांचे क्षेपणास्त्र हल्ले. व्यापारी जहाजांना आता आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा मारून जावे लागते. ज्यामुळे वाहतूकीची किंमत ही 30 ते 40 टक्के वाढली आहे, आणि वेळ पण जास्त लागत आहे. इराणची मदत घेऊन आपल्या व्यापारी जहाजांवरती होणारे हल्ले थांबवता येतील का?
 

इस्रायलची सक्षम ‘क्षेपणास्त्र बचाव यंत्रणा’

अमेरिकेच्या अंदाजानुसार, इराणकडे तीन हजार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. ताज्या घटनेत इस्रायलवर त्यांनी 180 क्षेपणास्त्रे डागली. पण, यातून अपेक्षित परिणाम साधलेला नाही. इस्रायल हा क्षेपणास्त्र बचाव प्रणालीच्या बाबतीत जगात सर्वात सक्षम देश मानला जातो. दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे भेदण्यासाठी, इस्रायलने अमेरिकेच्या बरोबरीने ‘अ‍ॅरो-थ्री प्रणाली’ विकसित केली आहे. मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपासून बचाव करण्यासाठी, ‘डेव्हिड्स स्लिंग’ आणि ‘अ‍ॅरो-टू’ प्रणाली आहे. तर कमी क्षमतेच्या आणि लघू पल्ल्याच्या क्षेपणास्त्र व ड्रोनपासून बचावासाठी ‘आयर्न डोम’ ही प्रणालीचा इस्रायल वापर करतो.

दोन्ही देश परस्परांपासून खूप दूर असल्यामुळे, त्यांची सैन्ये थेट भिडण्याची शक्यता नाही. याउलट आकाशातील युद्धामध्ये इस्रायलचा वरचष्मा आहे. इस्रायलकडे 241 लढाऊ विमाने आणि 48 लढाऊ हेलिकॉप्टर आहेत. याउलट इराणकडे अनुक्रमे 186 लढाऊ विमाने आणि 129 लढाऊ हेलिकॉप्टर आहेत. इस्रायलकडे अमेरिकी बनावटीची अत्याधुनिक विमाने आहेत. तुलनेने इराणकडे जुनी सोव्हिएत बनावटीची लढाऊ विमाने आहेत. क्षेपणास्त्रे आणि क्षेपणास्त्र बजाव प्रणालीच्या बाबतीत, इस्रायलचे वर्चस्व दिसून येते.यामुळे युद्ध इस्रायल जिंकेल असा अंदाज आहे. मात्र, यामुळे इस्रायल विरुद्ध दहशतवादी हल्ले थांबतील का?


भारतासमोर मुत्सद्देगिरीचे आव्हान

पश्चिम आशियात लवकरच स्थिरता परत यावी, अशी भारताची इच्छा आहे. त्यामुळे भारत, मध्य-पूर्व, युरोप ‘आर्थिक कॉरिडॉर’ यांसारख्या कनेक्टिव्हिटी उपक्रमांवर भर देऊ शकेल आणि त्याच्या समृद्धीवर काम करू शकेल.

भारताचे इराण आणि इस्रायल दोन्ही देशांबरोबर चांगले संबंध आहेत. भारताला तेल पुरवठा करणार्‍या देशांपैकी, इराण आघाडीवर आहे. अणुचाचण्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्बंध असतानाही, भारत आणि इराणचे संबंध सुरळीत आहेत. इस्रायल हा भारताला शस्त्रे आणि तंत्रज्ञानात साहाय्य करणारा, आघाडीचा देश आहे. दोन्ही देशामध्ये राजनैतिक संतुलन ठेवणे हे सध्या भारतासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. आतापर्यंत हे काम भारताने, अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने केले आहे. दोन्ही देशांमध्ये संतुलन ठेवणे हीच मुत्सद्देगिरी आहे. युद्ध भडकल्यास कोणा एका देशाची बाजू भारत घेण्याची शक्यता नाही. तटस्थ परराष्ट्र धोरण आणि युद्धाऐवजी चर्चेने प्रश्न सोडवण्याची भूमिका यात बदल होण्याची तीळमात्र शक्यता नाही.

(नि.) ब्रि. हेमंत महाजन