मायानगरीची सफर घडवणारे ‘मुंबई दालन’

19 Oct 2024 12:24:26
 
mumbai dalan
 
मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त ‘मुंबई दालन’ या नावाने एक नवीन दालन प्रेक्षकांसाठी दि. १५ ऑक्टोबर रोजी पासून खुले करण्यात आले आहे. त्या ‘मुंबई दालना’ची ही भटकंती...
 
‘मुंबापुरी’, ‘बम्बई’, ‘बॉम्बे’ अशा विविध नावांनी ‘मुंबई’ हे शहर ओळखले जाते. फक्त नावेच नाही, तर या शहराची रुपेसुद्धा अनेक. आपण ज्या ठिकाणी जातो, ज्या जागी राहतो आणि जी परिस्थिती पाहतो, त्याप्रमाणे हे शहर आपल्याला वेगवेगळे भासू लागते. हे शहर म्हणजे एक चालता-फिरता सिनेमाच जणू. कारण, इथल्या प्रत्येक कोपर्‍यात एक कथा घडत असते आणि इथे राहणारा प्रत्येकजण त्या कथेतले पात्र असते. मुंबई शहराच्या अशा अनेक कथा एकत्र करून ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’तील ‘मुंबई दालन’ साकारण्यात आले आहे.
 
खरं तर मुंबईला थोडक्यात व्यक्त करणे अजिबात शक्य नाही. कारण, मुंबई म्हटल्यावर अनेक गोष्टी आपसुकच डोळ्यांसमोर येतात. पण, तरीही ‘मुंबई’ म्हटल्यावर सर्वप्रथम डोळ्यांसमोर येणार्‍या आणि या शहराचा अविभाज्य भाग असणार्‍या काही महत्त्वाच्या गोष्टींमधून मुंबई उभी करण्याचा प्रयत्न या ‘मुंबई दालना’त केलेला दिसतो. ‘मुंबई दालन’ दोन भागांत विभागलेले आहे. बाहेरील भागात मुंबई शहरावर आधारित काही चित्रे आणि मुंबईचा इतिहास सांगणारे काही शिलालेख ठेवण्यात आले आहेत. कुठल्याही गोष्टीची ओळख करून देण्याची सुरुवात त्या गोष्टीच्या इतिहासापासून करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे या दालनाची सुरुवात मुंबईच्या इतिहासापासून करण्यात आली आहे.
 
मुंबईचा इतिहास समजून घेऊन आतल्या भागात प्रवेश केला, की सर्वात आधी आपल्याला दिसतात ते मुंबई लोकलमधून प्रवास करणारे मुंबईकर! मुंबई लोकलला या शहराची ‘लाईफलाईन’ म्हटले जाते. शरीरात रक्त वाहते तशी ही लोकल दिवसभर शहरात अव्याहतपणे धावत असते. त्यामुळे मुंबई लोकलमध्ये प्रवास करणारे मुंबईकरांशिवाय हे दालन पूर्णच होऊ शकले नसते.
 
ही लोकल पाहून पुढे गेल्यावर आपल्याला दिसतात ती एकमेकांपेक्षा अगदी विरुद्ध असणारी, पण एकमेकांशी तितकीच जोडली गेलेली मुंबईची आणखी काही रुपे. प्रथमदर्शनी पाहायला मिळतो तो मुंबईतला समुद्रकिनारा, त्या समुद्रकिनार्‍यावर राहणारे कोळीबांधव, त्यांचे राहणीमान, त्यांनी घराशेजारी वाळत घातलेले मासे. मुंबई म्हणजे जसा समुद्रकिनारा आणि कोळीबांधव आहेत, तसेच मुंबई म्हणजे गिरणगाव आणि गिरणी कामगारही. आता जरी गिरणसंस्कृती लोप पावत असली, तरीही एकेकाळी हे ‘गिरणगाव’ या शहराची ओळख होते. या गिरणगावातील चाळसंस्कृती, त्यांच्या घरी असलेला पाटा-वरवंटा, कंदील यांसारख्या जुन्या मुंबईची आठवण करून देणार्‍या अनेक वस्तू या दालनात मांडलेल्या आहेत. मुंबईत येणारी कुठलीही व्यक्ती उपाशी राहत नाही, असे म्हटले जाते. कारण, या शहराच्या प्रत्येक रस्त्यावर एखादातरी खाद्यविक्रेता असतोच. या विक्रेत्यांनाही या दालनात स्थान देण्यात आले आहे. काळाच्या ओघात या शहरात बरेच बदल झाले. या शहराचा चेहरामोहरा बदला. शहरातील लोकांचे राहणीमान बदलले. पण, त्या सगळ्यात एक बदल मुंबईकरांना प्रकर्षाने जाणवतो, तो म्हणजे ‘बसच्या तिकिटांमध्ये झालेला बदल’. ही जुनी बसची तिकिटे, सोबतच बसवाहकांचे बदलत गेलेले बिल्लेसुद्धा या प्रदर्शनात पाहायला मिळतात. या शहराची भाषा, त्या भाषेतले शब्द, शहरात गाजलेले सिनेमे, शहराच्या विकासासाठी योगदान देणारे अनेक लोक, शहरावर लिहिली गेलेली अनेक पुस्तके अशा अनेक गोष्टी या दालनात आहेत. दालनाच्या एका कोपर्‍यात एक मोठे गाठोडे ठेवलेले आहे. या शहरात दररोज अनेक लोक शिक्षणाच्या, नोकरीच्या आणि संधींच्या शोधात येतात. सोबत येताना ते स्वप्नांचे आणि आठवणींचे गाठोडे घेऊन येतात. इथे आल्यावर ते गाठोडे उघडतात आणि त्यांची सगळी स्वप्ने, सगळ्या आठवणी या शहराशी एकरूप होऊन जातात. त्याचेच प्रतिनिधित्व या दालनातील हे गाठोडे करते.
 
असे म्हणतात की, मुंबई शहर हे घड्याळापेक्षाही वेगाने धावणारे. हे शहर वर्तमानात कमी आणि भविष्यातच जास्त जगते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून भविष्यात हे शहर कसे असेल, कसे दिसेल याचे चित्रण या दालनाच्या शेवटच्या भागात करण्यात आले आहे. या संपूर्ण दालनाचा फेरफटका मारल्यावर मुंबईच्या अनेक भागांमधून फिरून आल्याचा भास होतो. दालनाला साजेशी आणि दालनात ठेवलेली प्रत्येक वस्तू अधिक प्रभावी वाटेल, अशी प्रकाशयोजना दालनात करण्यात आलेली आहे. सोबतच प्रत्येक गोष्टीची माहिती सांगण्याची सोय दालनाच्या विविध भागांमध्ये केलेली आहे. चित्र, शिल्प, खर्‍या आणि आभासी वस्तू अशा सगळ्या गोष्टींचा सुरेख मेळ साधून हे दालन उभे करण्यात आलेले आहे. तंत्रज्ञानाचा उत्तम वापर हे दालन उभे करण्यासाठी केलेला प्रकर्षाने जाणवतो.
 
तसेच दालनात फिरताना अनेक गोष्टी राहून गेल्या असेही जाणवते. पण, मुंबई या शहराला एका दालनात उभे करणे खरच शक्य नाही. या शहराला ‘मायानगरी’ही म्हटले जाते. कारण, हे शहर आईसारखी मायाही करते आणि अवर्णनीय अशा मायावी गोष्टींची अनुभूतीही देते. त्यामुळे या शहराने दिलेल्या, दाखवलेल्या सगळ्या गोष्टींची अपेक्षा एका प्रदर्शनाच्या चौकटीत बसवणे योग्य ठरत नाही. पण प्रत्येक मुंबईकरासाठी आणि मुंबईत आलेल्या प्रत्येकासाठी हे ‘मुंबई दालन’ म्हणजे एक पर्वणीच. हे दालन वस्तू संग्रहालयात कायमस्वरूपी असणार आहे. पण, ‘बदल’ हा या शहराचा नियम असल्यामुळे या दालनातील अनेक गोष्टीही बदलतील. संग्रहालयाच्या वेळेत म्हणजे सकाळी १०.१५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहाता येणार आहे. संग्रहालयाचे प्रवेशशुल्क सोडल्यास वेगळे कोणतेही शुल्क हे दालन पाहण्यासाठी आकारले जात नाही. प्रत्येकाने आवर्जून पाहावे, असे हे ‘मुंबई दालन!’
 
 
दिपाली कानसे
 
 
Powered By Sangraha 9.0