“अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांच्या संशोधनासाठी केंद्र सरकार....”केंद्रीय शिक्षण आणि भाषा मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांचे आश्वासन

19 Oct 2024 19:21:49

bhartiy bhasha samiti meeting 
 
दिल्ली : "भारतीय भाषा या कुणातही भेद निर्माण करत नाहीत. विविध भाषेतील एकता हीच भारताची शक्ती आहे. त्यामुळे ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे त्या भाषांचे संशोधन व संवर्धन व्हावे आणि त्यासाठी केंद्र सरकार संबंधित राज्यांना योग्य ते सहकार्य करेल” असे आश्वासन केंद्रीय शिक्षण आणि भाषा मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांनी ‘भारतीय भाषा समिती’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिले. अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांच्या पुढील वाटचालीवर चर्चा करण्यासाठी भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष आणि भाषाभ्यासक पद्मश्री चमू कृष्ण शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठी बरोबरच बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत या भाषेच्या अभ्यासकांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. पाच राज्याचे मिळून एकूण २५ प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. रविन्द्र शोभणे, सरस्वती सन्मान प्राप्त साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे प्राध्यापक व साहित्यिक डॉ. पृथ्वीराज तौर, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. संगीता बर्वे, प्रा. नरेंद्र पाठक, बैठकीत शिक्षण विभागाचे मुख्य सचिव के. संजय मुर्ती, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम. जगदेश कुमार आदी मान्यवरांनी या बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकी नंतर डॉ. रविन्द्र शोभणे यांची विश्वकोष मंडळावर अध्यक्ष म्हणुन नियुक्ती झाल्याबद्दल अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0