"मी राजकारणात नक्कीच येणार, पण...", विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ता माळीचं मोठं विधान

    18-Oct-2024
Total Views |
 
prajakta mali
 
 
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिची निर्मिती आणि अभिनय असणाऱ्या फुलवंती या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांद प्राजक्ता निर्माती आणि स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शिकेच्या भूमिकेत समोर आल्या आहेत. दरम्यान, प्राजक्ता आजवर सुत्रसंचालक, अभिनेत्री, निर्माती या रुपात तर दिसलीच पण आता लवकरच ती राजकारणात देखील प्रवेश करणार अशी चिन्ह दिसत असून त्याबद्दल तिने स्वत: माहिती दिली आहे.
 
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून अनेक कलाकार विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. अलिकडेच आई कुठे काय करते फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत तिच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. आता प्राजक्ता माळीच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्राजक्ताने राजकारणात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे.
 
प्राजक्ता माळी हिने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, "मी नक्कीच राजकारणात येणार आहे. पण, सध्या माझ्यासाठी ही वेळ योग्य नाही, असं मला वाटतं. राजकारणात आल्यावर तुमच्याकडे निर्णय घेण्याची ताकद येते. त्यामुळे कोणालाही राजकारणात यावंसं वाटतं. लोकांची काम करण्याची संधी मिळते. मला समाजसेवा करण्यासाठी राजकारणात यायचं आहे. पण, त्याआधी या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करून मगच राजकारणात प्रवेश करेन", असं प्राजक्ता म्हणाली आहे.दरम्यान, प्राजक्ताने 'फुलवंती' चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून तिच्यासोबत या चित्रपटात गश्मीर महाजनी, स्नेहल तरडे, प्रसाद ओक, हृषिकेश जोशी, सविता मालपेकर, वनिता खरात अशी तगडी स्टारकास्ट आहे.