रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी - लोकशाहीची पाठशाळा !

18 Oct 2024 22:33:34
 
Rambhau Mhalgi Prabodhini Sanstha
 
तरुणांचा देश असणार्‍या भारतातील तरुण उर्जेला योग्य दिशा आणि ध्येय देण्याचे कार्य गेली ४१ वर्षे अविरत करणारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्था, आज तिचा ४२ वा स्थापना दिन साजारा करत आहे. या प्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक तरुणांनी राष्ट्रसेवेला वाहून घेतले आहे. राष्ट्रभक्त तरुण घडवणार्‍या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्याचा हा आढावा...
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची तत्त्वे व चिंतन, रामभाऊ म्हाळगी यांचे विचार व कृतिशीलता आणि प्रमोद महाजन यांची दूरदृष्टी व आधुनिकतेचा आग्रह या मूलभूत घटकांना केंद्रस्थानी ठेवून, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सक्षमतेसह निरंतर वाटचाल करीत आहे. दि. १९ ऑक्टोबर, २०२४ हा प्रबोधिनीचा ४२ वा स्थापना दिन! आज ’प्रबोधिनी दिन’ म्हणून साजरा होत आहे. गेल्या चार दशकांत प्रशिक्षण, प्रबोधन आणि संशोधन या त्रिसूत्रीसह ’व्यक्ती व समाजाला घडविणारी आणि लोकशाही बळकट करणारी अद्वितीय संस्था’ म्हणून, म्हाळगी प्रबोधिनीने एक स्थान निर्माण केले आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही म्हाळगी प्रबोधिनीने लौकिक प्राप्त केला आहे.
 
हा लौकिक किंवा उच्च स्थान प्राप्त करताना शेकडो व्यक्तींचे, हजारो हातांचे योगदान लाभले. कै. उत्तमराव पाटील, कै. वसंतराव पटवर्धन, कै. प्रमोद महाजन, कै. गोपीनाथ मुंडे या पूर्वअध्यक्षांचे, प्रबोधिनीच्या उभारणीतील योगदान अविस्मरणीयच! माजी अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनीही प्रबोधिनीची धुरा समर्थपणे सांभाळली. विद्यमान अध्यक्ष देवेंद्र फडणवीसही, संस्थेला सुयोग्य दिशा आणि अधिक गती देण्यासाठी पाठबळ देत आहेत. प्रबोधिनीचे माजी महासंचालक आणि सध्याचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचा गौरवपूर्ण उल्लेख निश्चितच करायला हवा. गेली ३६ वर्षे प्रबोधिनीत कार्यरत असलेले डॉ. सहस्रबुद्धे यांचा उत्साह, कल्पकता आणि प्रतिभा यामुळेच ‘प्रशिक्षण-प्रबोधन-संशोधन’ ही सूत्रे संस्थेत खर्‍या अर्थाने रुजली. कार्यक्रम-उपक्रमातील सातत्य आणि वैविध्य ही वैशिष्ट्ये कायम टिकून राहिली. ’प्रबोधिनी दिनाचे’ औचित्य साधताना, संस्थेचे माजी महासंचालक रवींद्र साठे यांचाही सन्मानपूर्वक उल्लेख अत्यावश्यक! कार्यक्रम संचालक, कार्यकारी संचालक आणि महासंचालक या पदांना खरे तर जबाबदारीला, यथोचित न्याय देत रवींद्र साठे यांनी संस्थेचा गौरव वाढवला. शिस्त, नियोजन, संस्थांतर्गत व्यवस्थापन व कार्यपद्धती यांबाबत त्यांचा प्रबोधिनीवर अमीट ठसा आहे.
 
आम्ही बहुमताने किंवा जास्त मते मिळवून निवडून येतो. त्यामुळे आम्ही जणू काही सर्वज्ञच आहोत. आम्हाला मार्गदर्शनाची गरजच नाही, अशी राजकीय क्षेत्रातील दृढभावना! आणि सामाजिक संस्थांचे कार्य म्हणजे समाजसेवा. सेवाकार्य करणार्‍याला कशाला हवे प्रशिक्षण? हा पक्का झालेला सामाजिक क्षेत्रातील विचार! या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने राजकीय,सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी, संस्थाचालक, विश्वस्त, लोकप्रतिनिधी इत्यादी घटकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य, वर्ष १९८२ सालापासून प्रबोधिनी आग्रहाने करीत आहे. लोकप्रतिनिधींचे कार्य निवडून आल्यानंतरच खर्‍या अर्थाने सुरू होते. निवडणुका या लोकशाही प्रक्रियेचा एक भाग आहेत एवढेच! पुढची आव्हाने अधिक महत्त्वाची असतात. सर्व स्तरांवरील लोकप्रतिनिधींनी संविधानाचा अभ्यास करायलाच हवा. संसदीय किंवा विधिमंडळ कार्यपद्धती, योजनांची अंमलबजावणी, अर्थसंकल्प, निधीचे नियोजन, रस्ते, पाणी, वीज यासह विकासकामांतील नावीन्य, आधुनिकता व कालसुसंगतता, शासन-प्रशासन समन्वय व संपर्क, संबंधित कायदे इत्यादी सर्वच घटकांबद्दलचे प्रशिक्षण, प्रत्येक स्तरावरील लोकप्रतिनिधींनी घ्यायलाच हवे असा आग्रह प्रबोधिनीने कायम धरला आणि त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रमही कार्यान्वित केले. ग्रामपंचायत सदस्यांपासून ते राज्यस्तरीय मंत्रिमंडळ सदस्यांपर्यंत सर्वांनाच प्रशिक्षित करणे अत्यावश्यक आहे, अशीच प्रबोधिनीची धारणा आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनीही कार्यालय व्यवस्थापनापासून ते निवडणूक व्यवस्थापनापर्यंत आणि प्रेसनोट लिहिण्यापासून ते सोशल मीडियाच्या प्रभावी वापरापर्यंत कामातील अचूकता, नियोजन आणि व्यावसायिकता यांना महत्त्व द्यायलाच हवे. हा दृष्टिकोन ठेवूनच प्रबोधिनीने आत्तापर्यंत, हजारो कार्यकर्ते-पदाधिकार्‍यांना नियोजन व व्यवस्थापनाचे धडे दिले आहेत.
 
राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्याची आकांक्षा असलेल्या तरुणांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी, देशाच्या विविध भागात गेली अनेक वर्षे ’नेतृत्व साधना’ या आठवडाभराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत या शृंखलेत १५ कार्यक्रम झाले. वैचारिक दृष्टिकोनातून सजग, राजकीय व सामाजिक कार्यासाठी सक्षम आणि आधुनिक कौशल्यांसह, सुसज्ज कार्यकर्ता पदाधिकारी, लोकप्रतिनिधी निर्माण करणे हे प्रबोधिनीचे प्रमुख उद्दिष्ट! या प्रक्रियेतून व्यक्तिविकास तर घडतोच. त्याचबरोबर लोकशाहीचे सशक्तीकरणही घडते. तसेच महत्त्वाचे म्हणजे, ’सुशासनाची’ बीजे रुजतात, मूळ धरतात आणि वाढतात. या अर्थाने प्रबोधिनी लोकशाहीची प्रभावी पाठशाळाच आहे.
 
स्वयंसेवी संस्था, सामाजिक विश्वस्त संस्था, विविध एन.जी.ओ. इत्यादी सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांनाही कार्यक्षमता वाढवण्यासाठी, नेमकेपणासाठी आणि नित्यनूतन राहण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहेच. ही गरज प्रबोधिनीने ओळखलीच तसेच, सामाजिक संस्था विश्वाच्या लक्षातही आणून दिली. पत्र, मसुदा लेखन, प्रकल्प प्रस्ताव लेखन ते प्रकल्प अहवाल लेखन आणि प्रकल्प व्यवस्थापन ते संस्था व्यवस्थापन, अशा सर्वच बाबतीत प्रबोधिनी सूक्ष्म घटकांसह तपशीलवार प्रशिक्षण देते आहे. सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते, कार्यालयीन पदाधिकारी, विश्वस्त या सर्वांनाच क्षमता विकास आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येते. सी एस आर अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल स्टॉक एक्सचेंज या आधुनिक, नव्या संकल्पनांचाही प्रशिक्षणात आवर्जून अंतर्भाव असतो. तसेच, भूगोलीय तंत्रज्ञान, जिओ स्पेशल टेक्नॉलॉजी आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा ग्रामविकासासाठी प्रभावी वापर या संदर्भातील प्रशिक्षणही, अतिशय सोप्या भाषेत सामाजिक कार्यकर्त्यांना प्रबोधिनीमार्फत दिले जात आहे.
 
’जी २०’ समूहाच्या शिखर परिषदेला संलग्न असलेल्या, सी-२० अर्थात सिव्हील सोसायटी-२० उपसमूहाचे संचालन करण्याची जबाबदारी, वर्ष २०२३ साली म्हाळगी प्रबोधिनीकडे देण्यात आली होती. या अंतर्गत, विविध विषयांनुसार प्रामुख्याने सामाजिक विषय केंद्रस्थानी ठेवत १६ कार्य गट स्थापन करून, १६ ठिकाणी राष्ट्रीय परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चांमधून आलेल्या शिफारशींचा समावेश असलेला, एक २४० पानी ’धोरण मसुदा’ जी-२० समूहाला सादर करण्यात आला. प्रबोधिनीची ही कामगिरी निश्चितच ऐतिहासिक आणि अभिमानास्पद!
 
आर्य चाणक्य, स्वातंत्र्यवीर सावरकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदी व्यक्तींचे विचार व कार्य, महिला सक्षमीकरण, हिंदुत्व, विकसित भारत, पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, समान नागरी कायदा इत्यादी त्या-त्या काळातील, राजकीय सामाजिकदृष्ट्या ऐरणीवर असलेल्या विषयांवर भारतीय नागरिकांचे प्रबोधन करण्याचे कार्य प्रबोधिनी अविरतपणे करीत आहे. चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्याने, सभा-संमेलने आदी मार्गांनी, समाजात विधायक आणि रचनात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रबोधिनीचा प्रामाणिक प्रयत्न असतो. नक्षलवाद, दहशतवाद, संघटनशास्त्र, अटलजींची राजकीय भाषणे, मानसिक स्वास्थ्य, शेती विकास, शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा, ईशान्य भारत, सांस्कृतिक राष्ट्रवाद अशा वैविध्यपूर्ण विषयांवर, प्रबोधिनीने एकूण ८५ संशोधनात्मक पुस्तके प्रकाशित केली आहेत. या माध्यमातूनही सामाजिक प्रबोधनही घडतेच. संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो तरुणांना आणि सामाजिक संशोधकांना, पाठ्यवृत्ती शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. यातून तरुण अभ्यासकांवर सखोल व सर्वांगीण संशोधनाचे संस्कार घडले आणि महत्त्वाच्या विषयांवरील छोटे प्रबंध निर्माण झाले.
 
म्हाळगी प्रबोधिनीमध्ये गेली आठ वर्षे भारतीय लोकतांत्रिक नेतृत्व संस्थान (Indian Institute of Democratic leadership - IIDL) या अंतर्गत, नऊ महिन्यांचा अभ्यासक्रम संचालित करण्यात येत आहे. नेतृत्व क्षमता विकास, लोकशाही, राजनीती, सामाजिक धोरणे, शासन-प्रशासन आदी विषयांबाबत, तरुण विद्यार्थ्यांना यामध्ये मार्गदर्शन केले जाते. संबंधित विषयतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते-पदाधिकारी, पत्रकार आदींचे मार्गदर्शन आणि अभ्यास, सहली व दौरे यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनाचा परीघ वाढतो. पूर्वीच्या सात तुकड्यांमधील अनेक विद्यार्थी सध्या राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते यांच्याशी जोडून कार्यरत आहेत. काही जण थेट राजकारणात उतरलेही आहेत. गेली सहा वर्षे अटल प्रतिभा पोषण केंद्राच्या (Atal Incubation Centre-IC) माध्यमातून, एक वेगळा आयाम प्रबोधिनीत कार्यरत आहे. या केंद्राद्वारे, उद्योजकता विकासाच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणार्‍यांना मार्गदर्शन केले जाते. मुख्यतः नवोदित स्टार्टअप्सना इथे सहकार्य केले जाते. आतापर्यंत कृषी, शिक्षण, आरोग्य, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ३० हून जास्त स्टार्टअप्सना सहकार्य करण्यात आले आहे.
 
’सु-मन’ (Supporting programme for Mental wellbeing of students And Nurturing whole campus concept - SUM-N) हा शिक्षण संस्थांमधील, संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या प्रशिक्षणाचा अनोखा उपक्रम प्रबोधिनीने अलीकडेच कार्यान्वित केला आहे. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत एकूण १८ प्रशिक्षण कार्यक्रम झाले असून, सुमारे ७५० मुख्याध्यापक-शिक्षकांना मानसिक स्वास्थ्य, भावनिक संतुलन, सकारात्मकता, कल्पकता, प्रतिभा यांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. ’आनंदी शिक्षक, आनंदी विद्यार्थी, आनंदी शाळा परिसर, आनंदी समाज’ असा प्रवास घडवणे, हेच ’सु-मन’ उपक्रमाचे अंतिम उद्दिष्ट आहे.
 
मनुष्यबळ विकास हा प्रबोधिनीच्या कार्याचा एक मूलभूत घटक! या संबंधित उद्दिष्टे साधण्यासाठी वक्तृत्वकला, संवादकौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास, समाजभान शिबिरे, अभिरुची जोपासना कार्यशाळा, मंदिर व्यवस्थापन प्रशिक्षण, शेतकरी महिलांना प्रशिक्षण असे अनेक विषय, प्रबोधिनी यशस्वीपणे हाताळते आहे. गेल्या दोन वर्षांपासून कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली , प्रबोधिनीचा परीघ अनेक अर्थांनी विस्तारतो आहे.
 
प्रशिक्षण योजताना प्रत्येक विषयातील अनुभवी, कुशल, उच्च प्रतीचे तज्ज्ञ आणि ज्याला प्रशिक्षण देण्याची हातोटी आहे, अशा मार्गदर्शकांची उपलब्धता हे प्रबोधिनीचे प्रमुख वैशिष्ट्य! या दीर्घकालीन प्रक्रियेचा परिणाम म्हणजे, पूर्वी प्रशिक्षणार्थी म्हणून आलेल्यांपैकी अनेक जण आता प्रशिक्षक म्हणून प्रबोधिनीत येत आहेत.
 
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे निसर्गसंपन्न आणि प्रशिक्षण साधनांनी सुसज्ज असे प्रशिक्षण संकुल ’ज्ञान-नैपुण्य केंद्र’ हे, प्रबोधिनीचे एक विलोभनीय वैशिष्ट्य! प्रबोधिनीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र ग्रंथालयही, विपुल ग्रंथसंपदेसह सर्व सोयीसुविधांसह कार्यरत आहे. वाचक-सभासदांसाठी वाचनालय, ग्रंथालय क्षेत्रातील घटकांचे प्रशिक्षण देणारे केंद्र आणि वाचन चळवळ चालवणारी संस्था , अशा अनेक भूमिका हे ग्रंथालय निभावत आहे. हेही प्रबोधिनीचे एक अभिमानास्पद वैशिष्ट्यच!
 
मनुष्यबळ विकास, सामाजिक प्रबोधन, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील घटकांचे राष्ट्रविकासातील योगदान आणि सोयीसुविधांचा विकास साधत असताना, समाजभान व राष्ट्रभान ही उद्दिष्टे समोर ठेवूनच, प्रबोधिनी गेली ४२ वर्षे निष्ठेने कार्यरत आहे. या कालखंडात प्रबोधिनीने समाजातील विविध घटकांना प्रशिक्षित तर केलेच. पण, संस्थेत कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांनासुद्धा काळानुरूप प्रशिक्षण देण्याची योजना, प्रबोधिनी सातत्याने आखत आली आहे. त्याचबरोबर संस्थेच्या कार्यकाळात गेल्या २०-२२ वर्षांपासून अधिक काळ कार्यरत असणार्‍या, अधिकारी व कर्मचारी यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.
 
प्रबोधिनी केवळ मार्गदर्शन करून थांबलेली नाही. प्रबोधिनी एक संस्था म्हणून, स्वत:ही सामाजिक उत्तरदायित्वाची भावना मानते. तळागाळातील समाज घटकांच्या आणि वंचितांच्या विकासासाठी कार्य करणार्‍या व्यक्तींना, प्रबोधिनीच्या वतीने ‘अंत्योदय पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. सामाजिक क्षेत्रात हा पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो.
 
चार दशकांचा प्रदीर्घ काळ अविरतपणे आणि गुणात्मक दृष्टीने, चढत्या आलेखासह कार्यरत असलेल्या संस्थेबद्दल एखाद्या लेखात संपूर्ण माहिती देणे, हे कठीण काम आहे. अनेक विषय, घटक, मुद्दे यांना ओझरता स्पर्श करत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे स्वरूप व कार्य मांडण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे केला आहे. आपले कार्य आणि ध्येयाप्रती वाटचाल या माध्यमातूनच, म्हाळगी प्रबोधिनी ’सशक्त लोकशाहीयुक्त विकसित भारत’ आणि ’विश्वगुरू भारत’ निर्माण करण्यामध्ये, मोलाची व मध्यवर्ती भूमिका बजावत आहे, हे मात्र निश्चित!
 
विनय मावळणकर 
 
(लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी पदावर कार्यरत आहेत)
Powered By Sangraha 9.0