इतिहास ज्याच्या त्याच्या सोईचा

Total Views |
 
 History
 
 
इतिहासाच्या साधनांमध्ये लेणी, वास्तू यांचा समावेश होत असतो. आज ऐतिहासिककालीन या साधनांमधून त्यावेळीतील घटनांचा शोध घेतला जातो. त्यावेळची समाजरचना, राज्यपद्धती अशा अनेक पैलूंचा त्यातून उलगडा होत असतो. उत्खननात मिळणार्‍या प्रत्येक प्राचीन गोष्टींचा एक इतिहास असतो, प्रत्येक देश त्याचा सोयीनुसार अर्थ लावत नरेटिव्ह पसरवत असतो..
 
भारतात एकंदर १ हजार, ५००कोरीव गुंफा आहेत. सर्वात प्राचीन गुंफा बिहार प्रांतात गया या तीर्थक्षेत्रापासून, २४ किमी अंतरावर बराबर नावाच्या डोंगरात आहे. सातपुडा पर्वताच्या रांगा तापी नदीच्या खोर्‍यापासून, गाविलगड डोंगररांग, महादेव डोंगररांग, बैकल डोंगररांग आणि छोटा नागपूर डोंगररांग अशा नावांनी, पूर्वेकडे पसरत गेल्या आहेत. त्यातल्या छोटा नागपूर डोंगररांगेतील, बराबर नावाच्या डोंगरावरील ’लोमश ऋषी गुंफा’ ही भारतातली सर्वात प्राचीन गुंफा किंवा कोरीव लेणे मानले जाते. तिचा काळ इ. स. पूर्व २५० असा मानण्यात येतो.
 
पण, कोरीव गुंफा किंवा लेण्यांचा खरा विकास आणि विलास दिसून येतो तो सह्याद्रीतच. सह्याद्री पर्वताचा ’ट्रॅप’ किंवा ’अ‍ॅसाल्ट’ जातीचा दगड म्हणजे लेणे कोरणार्‍या कलावंतांना जणू वरदानच. त्यामुळे देशभरातल्या १ हजार, ५०० कोरीव लेण्यांपैकी अधिकांश लेणी ही महाराष्ट्रातच आहेत. कळसापासून कोरायला सुरूवात करुन, पायापर्यंत कोरुन घडवलेले कैलास लेणे हा कोरीवकामाची कला आणि अभियांत्रिकीचे शास्त्र यांचा थक्क करणारा आविष्कार आहे.
 
या सगळ्या लेण्यांबद्दल स्थानिक लोकसमजूत ही, अगदी समान आणि म्हणूनच जास्त थक्क करणारी आहे. कुठल्याही लेण्याच्या परिसरातील स्थानिक लोकांना विचारा की बुवा, ही लेणी कुणी खोदली? तुम्हाला हटकून एकच एक समान उत्तर मिळेल - पांडव वनवासात असताना इथे आले. इथेच राहण्याचे त्यांनी ठरवले. द्रौपदी म्हणाली, ’एका रात्रीत घर बांधून पूर्ण झाले तरच इथे राहायचे. पांडव वेगाने कामाला लागले. पण काम पूर्ण होण्याआधीच कोंबडा आरवला. काम तसेच सोडून पांडव पुढे निघून गेले. म्हणजे लेणी यांच्यामते उद्ध्वस्त नसून अपूर्ण आहेत.
 
जेम्स बर्जेस आणि जेम्स फर्गसन (किंवा फर्ग्युसन) या दोघा ब्रिटिश विद्वानांनी, सन १८८० साली ’द केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया’ नावाचे अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित करून, कोरीव गुंफा, कोरीव लेणी, गुहा मंदिरे या भारताच्या सांस्कृतिक ठेव्याकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. आता यातला राजकीय सोयीचा भाग पाहा. ही लेणी पांडवांनी खोदलेली नसून मौर्य, वाकाटक, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार अशा विविध राजवंशांच्या काळात कोरली गेलेली आहेत. हे बर्जेस-फर्गसन यांनी दाखवून दिले. त्यासाठी त्यांनी विविध लेण्यांमधल्या शिलालेखांचा आधार दिला. या शिलालेखांमधून असेही दिसून आले की, कोरीव गुंफा निर्मितीच्या या कलेला, राजे-महाराजे यांच्यासह समाजातल्या अन्य प्रतिष्ठित, श्रीमंत व्यापारी लोकांचा किंवा त्यांच्या ’श्रेणी’ नामक संघटनांचाही आर्थिक आधार होता. या शिलालेखांमध्ये अनेक स्त्रियांचाही उल्लेख आहे. यावरून तत्कालीन हिंदू समाजात राजाची राणी, व्यापार्‍यांची किंवा तत्कालीन भाषेत ’श्रेष्ठी’ ची पत्नी, माता यांनाही सारखाच मान, अधिकार होता, हे कळून आले. या गुंफांमध्ये हिंदू, बौद्ध आणि थोड्या प्रमाणात जैन गुंफा आहेत. हिंदू गुंफांमध्ये मुख्यत: भगवान शिवाशी संबंधित मूर्ती, घटना कोरलेल्या आहेत. कर्नाटकातील बदामी, मध्य प्रदेशातील उदयगिरी अशा काही ठिकाणी भगवान विष्णूशी किंवा त्याच्या अवतारांशी संबंधित मूर्ती आहेत. बौद्ध गुंफांमध्ये अर्थातच भगवान बुद्ध आणि त्याच्याशी संबंधित घटना कोरलेल्या आहेत. बौद्ध गुंफांमध्येच स्तूप म्हणजेच, भगवान बुद्धाच्या एखाद्या शरीर अवशेषावर बांधलेली समाधी किंवा त्याची प्रतिकृती असते. जैन गुंफांमध्ये भगवान महावीर आणि त्याच्याशी संबंधित प्रतिमा असतात. आता बौद्ध आणि जैन गुंफांना जर तुम्ही ’बुद्धिस्ट केव्हस्’ आणि ’जैन केव्हस्’ म्हणून संबोधत असाल, तर हिंदू गुंफांना तुम्ही ’हिंदू केव्हस्’ किंवा निदान ’शैव केव्हस’, ’वैष्णव केव्हस्’ असे संबोधायला हवे. पण इंग्रजी कावा इथे दिसतो. बर्जेस आणि फर्गसन त्यांना म्हणतात, ’ब्रॅम्हॅनिकल केव्हस्.’
 
भारतातल्या लोकांमध्ये पहिल्यांदा हिंदू आणि मुसलमान अशी फूट पाडायची. मुसलमानांनो, तुम्ही या भारताचे राज्यकर्ते होतात. आम्ही इंग्रजांनी भारताची राजसत्ता तुमच्याकडून घेतली. तुम्ही या हिंदूंपेक्षा श्रेष्ठ आहात असे सांगत राहून, मुसलमानांना उचकवत राहायचे. दुसरीकडे हिंदूंपासून बौद्ध, जैन, शीख यांना वेगळे काढायचे. तुमचा एकच प्रेषित, एकच धर्मग्रंथ आहे, त्यामुळे असंख्य धर्मग्रंथ आणि कोट्यवधी देव असणार्‍या हिंदूंपासून तुम्ही वेगळे आहात, म्हणून त्यांच्यात फुटीरता पेरत राहायची. तिसरीकडे उर्वरित हिंदू समाजात आर्य-द्रविड, उत्तर-दक्षिण, आदिवासी-नगरवासी, बहुजन-अभिषण, ब्राह्मण-ब्राह्मणेतर असे नानाविध भेद पाडून, हिंदूंना सतत विभाजित, असंघटित ठेवायचे हा ब्रिटिश राजसत्तेचा ’मास्टर प्लॅन’ सुरूवातीपासून होताच. १८५७ सालच्या क्रांतियुद्धानंतर तो आणखी-आणखी पक्का होत गेला. मग आता या गुंफांना ’हिंदू केव्हस’ न म्हणता, ’ब्रॅम्हॅनिकल केव्हस्’ म्हणायचे. म्हणजे एकप्रकारे हिंदू समाजातल्या बहुसंख्य ज्ञानींना हा संदेश आहे की, या कोरीव गुंफा ब्राह्मणांच्या आहेत. तुम्हा ब्राह्मणेतरांचा या गुंफांमधील देवदैवते, परंपरा, श्रद्धा, कला, शास्त्र यांच्याशी काही संबंध नाही. आपल्या भाषेत यालाच ’नरेटिव्ह’ असे म्हणतात आणि हा नरेटिव्ह किती सूक्ष्म पातळीवरचा आहे पाहा. साधारण दीड-दोन हजार वर्षांपूर्वीचा स्थापत्यकलेचा अप्रतिम आविष्कार असणार्‍या गुंफांना, शैव, वैष्णव किंवा हिंदू केव्हस् न म्हणता, ‘ब्रॅम्हॅनिकल केव्हस्’ म्हणायचे. एका फटक्यात हिंदू बहुजन समाज मनाने त्या गुंफांपासून दूर गेला. याला म्हणतात इंग्रजी गनिमी कावा!
 
हा इंग्रजी कावा पुढच्या काळात सोव्हिएत रशियाने आणि त्यांच्या प्रादुर्भावाने जगभरच्या साम्यवाद्यांनी, अगदी टोकाला नेऊन भिडवला. सोव्हिएत साम्यवादी पक्षाने मुळी रशियाचा इतिहासच नव्याने लिहून काढला. धर्म, राजसत्ता, भांडवलदार, कारखानदार, व्यापारी, सरदार, जहागीरदार, जमीनदार हे सगळे कसे चोर आहेत आणि साम्यवादी हेच कसे सज्जन-साब आहेत, हा आराखडा समोर ठेवूनच त्यांनी नवा इतिहास लिहिला. या सर्वांना त्यांनी ’बूर्जा’ ही ठेवणीतली शिवी हासडली. या राशियन शब्दाला भारतीय प्रतिशब्द म्हणून, आपल्याकडच्या डाव्या विचारवंतांनी ’शेटजी-भटजींचा पक्ष’ हे संबोधन रूढ केले.
 
असो, तर सध्या चीनमध्ये साम्यवादी सरकार आहे. वास्तविक साम्यवादाला ज्याप्रमाणे एकाच विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मान्य नाही. तशीच एकाच विशिष्ट वंशाचे वर्चस्वही अपेक्षित नाही. साम्यवादी राज्य हे श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, कामगार, दुर्बल, शोषित अशांचे राज्य असते, मग वंशाने ते कुणीही असोत. पण चिनी साम्यवाद्यांनी व्यापाराच्या सोयीसाठी जसा खुशाल भांडवलवादाचा स्वीकार केलेला आहे, तसेच हान या मानववंशाचे श्रेष्ठत्व त्यांना अबाधित राखायचे आहे. हिटलरला जशी आपल्या आर्य वंशाची घमंड होती, तशीच चीनला आपल्या हान या वंशाची आहे. चीनमध्ये धर्माला बंदी असली, तरी बहुसंख्य जनता बौद्ध मत अनुयायी आहे. पण याचा उल्लेख करताना, ते ’हान बुद्धिस्ट’ असा करतात. म्हणजे या शब्दप्रयोगाच्या नॅरेटिव्हने ते इतर बौद्धांना सांगत असतात की, आम्ही नुसतेच तुमच्यासारखे असे-तसे बौद्ध नव्हे, तर हान बौद्ध आहोत.
 
आता चीन हा एक भलामोठा देश आहे. त्याच्या पश्चिम सरहदी कझाकस्तान, किरागिजस्तान आणि ताजिकीस्तान या देशांना भिडलेल्या आहेत. हे देश तुर्क वंशीय इस्लामी देश आहेत. या देशांच्या सरहद्दीवर चीनचा जो प्रांत आहे, त्याचे नाव झिनझियांग. काश्गर हे अतिशय प्राचीन आणि प्रख्यात शहर या भागात आहे. प्राचीन काळी चीन हा उत्कृष्ट अशा रेशमाची पैदास करणारा देश म्हणून प्रसिद्ध होता. चीनचे रेशमी कापड मध्य आशियातल्या तुर्क देशांमधून युरोपमध्ये जायचे. त्या लांबच लांब, खडतर प्रवासी मार्गाला म्हणायचे ’सिल्क रूट’ किंवा रेशीम मार्ग. काश्गर हे या मार्गावरचे एक महत्त्वाचे ठाणे होते.
 
सध्या या झिनझियांग प्रांतातले स्थानिक उघूर नावाचे मुसलमान, चीन विरुद्ध आंदोलन करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ने तुर्क आहेत, हान नव्हेत. शिवाय ते धर्मप्रेमी मुसलमान आहेत. त्यांना धर्मविरोधी साम्यवादी चिनी राजसत्ता मान्य नाही. म्हणून त्यांना त्यांचा वेगळा देश किंवा स्वायत्त प्रांत हवा आहे. आता असले फुटीर विचार खपवून घ्यायला, चिनी सरकार म्हणजे काँग्रेस सरकार नव्हे. त्यामुळे उघूर आंदोलकांना खास साम्यवादी शैलीत रेमटवून चिरडले जात आहे. त्याविरोधात अमेरिका आणि अन्य पाश्चिमात्य देश आपल्या पाळीव, एन. जी. ओंच्याद्वारे ‘चीनचे मानवताविरोधी धोरण’ वगैरे बोंबाबोंब करत असतात. चीन तिकडे कानाडोळा करतो.
 
पण उघूर आंदोलनाला वेगळ्या रीतीने उत्तर देता आले, तर तो मार्ग देखील चीनला वर्ज्य नाही. काश्गर शहरापासून जवळच वाळवंटात, चिनी पुरातत्त्वशास्त्रज्ञ २०१९ सालापासून एका विशिष्ट जागी उत्खनन करत होते. आत्तापर्यंत तांब्याची नाणी, दगडी हत्यारे, खंडित बुद्धमूर्ती असे बरेच काही मिळत होते. पण आता गिरणीच्या धुरांड्याच्या म्हणजे चिमणी आकाराचा एक स्तूप आणि त्याच्याजवळ एक बुद्धमंदिरच सापडले आहे. या वस्तू आणि वास्तू किमान १ हजार,७०० वर्षांपूर्वीच्या असाव्यात, असा अंदाज चिनी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
 
चीन सरकारने यातून ताबडतोब निष्कर्ष काढला आहे. १ हजार वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सनाच्या सातव्या शतकात, प्रसिद्ध भिख्खू झुआनझांग याने काश्गरला भेट देऊन, चिनी साम्राज्याच्या या अतिपश्चिमी प्रदेशात बौद्घ धर्माचा प्रचार केला होता. त्यावेळच्याच या वास्तू असल्या पाहिजेत. या वास्तू हान शैलीमधल्याच आहेत. याचाच अर्थ झिनझियांग प्रांत-काश्गर हा सातव्या शतकापासून चीनचाच भाग आहे आणि उघूर हे तुर्क नसून, हानवंशीय चिनीच आहेत. मध्य आशियाई तुर्क टोळीवाल्यांच्या नादाने, त्यांनी १५व्या शतकात इस्लाम स्वीकारला आणि राजधानीपासून हा प्रांत फार दूर असल्याने, चीनच्या तत्कालीन क्विंग राजांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
 
तर नॅरेटिव्हचा अर्थ काय की, उघूर हे वेगळे नाहीत. तेव्हा त्यांनी फुटीर बनू नये आणि त्यांना फुटीरपणा करण्यासाठी इतरांनी उचकवू नये.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.