काँग्रेसमध्ये सन्मान होत नाही! बड्या ओबीसी नेत्याचा काँग्रेसला राम राम!

ज्येष्ठ ओबीसी नेते अजय सिंह यादव यांनी पक्षाध्यक्षांना पाठवला राजीनामा

    17-Oct-2024
Total Views |

congress yadav resign
 
 चंदीगड : हरियाणाच्या पराभवातून सावरत असतानाच, आता काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते अजय सिंह यादव यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्राद्वारे आपला राजीनामा यादव यांनी सुपूर्द केला आहे. गेली ७० वर्ष आपल्या कुटुंबाचा आणि काँग्रेसचा संबंध होता, तो तोडून टाकताना मनाला तीव्र वेदना होत आहे असे देखील त्यांनी नमूद केले.

असहमती आणि अपमान
अजय सिंह यादव यांचे वडील राव अभय सिंह काँग्रेस पक्षाकडून १९५२ साली निवडून आले होते. त्यानंतर त्यांची कुटुंबाने निष्ठेने काँग्रेसची सेवा केली. अजय सिंह यादव यांनी सुद्धा आपल्या नेतृत्वाची चुणूक इथूनच दाखवली. रेवाडी हा तर, सिंह यांचा बालेकिल्ला मानला जात होता. अजय सिंह यादव एआयसीसी ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मात्र, मागील काही काळापासून काँग्रेसमध्ये सातत्याने त्यांचा अपमान होत होता. अजय सिंह यादव दीपक बाबरिया आणि उदयभान यांच्या कार्यशैलीवर नाखुश होते. त्यांच्या राजकीय नेतृत्वाशी ते असहमत होते. हरियाणाच्या पराभवानंतर, अजय सिंह यादव यांनी उघडपणे, काँग्रेसच्या कमतरतांचा उल्लेख केला होता. यादव असे म्हणाले की, जनादेश यायच्या आधीच, मुख्यमंत्री पदावरुन भांडणे ही गोष्ट अयोग्य होती. या सोबतच, काँग्रेस नेते मामन खान यांनी केलेल्या भडकाऊ भाषणांच्या विरोधात सुद्धा यादव यांनी टिकेचा सूर आळवला होता. यामुळे पक्षात त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर ऐकायला मिळाला. यादव यांनी आपल्या X हँडल वरुन या संर्दभातली माहिती शेअर करत नापसंती दर्शवली, ते म्हणाले राजीनामा देणे ही गोष्ट खूप अवघड होती. परंतु सोनिया गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या नंतर पहिल्यांदाच, मला पक्षश्रेष्ठींकडून अपमानास्पद वागणूक मिळाली. पार्टी हाय कमांडने माझा भ्रमनिरास केला आहे.